*ज्येष्ठ लेखिका कवयित्री पत्रकारा स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्वप्नझूला*
एक अबोला
एक झूला
कधीतरी झुलेल
येईल एक हवेचा
सुंदरसा झोका
मनाचे पाखरुं
उडेल त्या झोक्यावर
स्वार होऊन,
आयुष्य संपता संपता
कां होईना,
वाट पहात बसलीय
ती अजून.
कसल्यातरी आशेवर
मनाला धरले
तिने थोपवून
अश्रूंना टाकलेय
आतल्या आत
गिळून,
स्वप्नांना ठेवलेय
पापण्यांत लपवून
हुंकार दाटलेत,
ठेवलेत हृदयात दडवून.
कधीतरी येईल
जिवलगाची साद
वाट पाहून
डोळे गेलेत शिणून
तरीपण उसने
अवसान आणून
कधीतरी, जीवनसाथी
येईल हाती गुलाब घेऊन,
आणि सांगेल खूप
वाट पाहिलीस
पण आता कधीच नाही
जाणार कुठे
तुला सोडून.
या क्षणाची वाट
पहात ती अनेक वर्षे
अशीच थांबलेली,
बावरलेली, भांबावलेली
मनातल्या वेदना आतल्या आत
मारुन, संवेदना शून्य बनलेली,
नसलेले अस्तित्व
उगाच घडवू पाहणारी
येईल कां तो हवेचा झोका,
तिच्या आयुष्यात, सुंदर
सुगंधी स्वप्नांना घेऊन,
बहरेल कां तिची जीवन वेल
पुन्हा नवा जन्म घेऊन.
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर.

