ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र वापरण्यास मनाई
सिंधुदुर्गनगरी
भारतीय सैन्यदलाकडून नुकतेच “ऑपरेशन सिंदूर” राबविण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण देशात दक्षता घेण्यात येत आहे. अशा वेळेला ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्रे (UAV) याचा वापर काही असामाजिक तत्वांकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धर्मस्थळे, पर्यटन स्थळे तसेच लोकवस्ती असलेली ठिकाणे यांना धोका निर्माण होवू शकतो. तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्रे (UAV) अशा उपकरणांचा अनियंत्रित वापर टाळण्यासाठी त्वरित त्यास प्रतिबंध करणे गरजेचे असल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये दिनांक १५ मे २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजल्यापासून ०३ जून २०२५ रोजी रात्री १२:०० वाजेपर्यत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हद्दीत कोणत्याही व्यक्तीस ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्रे (UAV) यंत्र चालविण्यास, उडविण्यास किंवा वापरण्यास मनाई करण्यात येत असल्याचे माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
या कालवधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत काही अपरिहार्य कारणासाठी ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्रे (UAV) याचा वापर करावयाचा असल्यास पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांची परवानगी घेणे आवश्यक राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ तसेच इतर लागू असलेल्या कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील, असे ही प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

