You are currently viewing विनापरवाना पोट कालवा खोदाईचे काम शेर्लेत रोखले

विनापरवाना पोट कालवा खोदाईचे काम शेर्लेत रोखले

बांदा

शेर्ले शेटकरवाडीत शेतकर्‍यांची परवानगी न घेता पोटकालव्यासाठीच्या खोदाईचे काम संतप्त ग्रामस्थांनी रोखले. संबंधित कंपनीचा ठेकेदार मात्र उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलीस संरक्षणात काम करण्याची धमकीही देत होता. अखेर सरपंच उदय धुरी यांनी कामासंदर्भात परवानगी पत्र मागताच ठेकेदार कंपनीचे पितळ उघडे पडले. शेतकर्‍यांना विश्वासात घेतल्याशिवाय काम करु न देण्याचा इशारा ग्रा. पं. सदस्य मिलींद आरोसकर व महादेव धुरी यांनी दिला. शेर्ले – शेटकरवाडी येथे पोटकालवा कामासाठी संबंधित शेतकर्‍यांना कोणतीही कल्पना न देता खासगी कंपनीने खोदाईचे काम हाती घेतले होते. शेतकर्‍यांना याची माहिती मिळताच काम बंद पाडण्यात आले. संबंधित ठेकेदार यावेळी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. आमच्याकडे सर्व आवश्यक परवानग्या असून काम रोखल्यास पोलीस संरक्षणात काम करण्याची धमकी देत होता. यावेळी ग्रा. पं. सदस्य मिलिंद आरोसकर व महादेव धुरी यांनी ठेकेदारावर प्रश्नांची सरबत्ती केली. अखेर सरपंच उदय धुरी यांनी घटनास्थळी धाव घेत ठेकेदार कंपनीला परवानग्या सादर करण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायत प्रशासनाने कोणत्याही परवानग्या दिल्या नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर कंपनीचे पितळ उघडे पडले. शेतकर्‍यांना विश्वासात घेतल्याशिवाय काम करु न देण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी शेतकरी आबा धुरी, साई धुरी, निखील आरोसकर, औदुंबर परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा