*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री नीला बर्वे लिखित अप्रतिम लेख*
*अक्षय्य तृतीया*
“न माधव समो मासो न कृतेन युगं समम् ।
न च वेद समं शास्त्रं न तीर्थ गंगयां समम् ।।”
वैशाखसारखा महिना नाही, सत्ययुगासारखा युग नाही, वेदांसारखा धर्मग्रंथ नाही आणि गंगाजीसारखे तीर्थक्षेत्र नाही. त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेसारखी तिथी नाही.
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात.धार्मिक मान्यतेनुसार सत्ययुग आणि त्रेतायुग अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सुरू झाले.अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. जैन धर्मामध्ये या दिवसाला आखा तीज असेही म्हणले जाते. या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे.
या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक होते श्री गणपती!
हा दिवस म्हणजे श्री अन्नपूर्णा (देवी) , बसवेश्वर आणि, हयग्रीव यांचा जन्मदिवस !नर-नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला असे मानले जाते. भगवान परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले .या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरात, म्हणजे सूर्यास्तानंतर लगेचच परशुरामांच्या मूर्तीची पूजा केली जाते. हा विशेषतः भारताच्या दक्षिण भागात साजरा केला जातो.
या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो अशी भारतीयांची धारणा आहे.
या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते.
हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात आणि त्यांना सुग्रास भोजनाचा नैवेद्य दाखवितात.
या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील श्री बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.
अक्षय्य तृतीयेचा हा दिवस क्षमेचा दिवस मानला जातो. असे म्हटले जाते की या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या किंवा त्याच्या प्रियजनांनी जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या चुकांसाठी मनापासून देवाकडे क्षमा मागितली तर त्याच्या सर्व चुका धुऊन जातात आणि त्याला देवाकडून पुण्य प्राप्त होते. म्हणूनच, जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या चुकांसाठी माफी मागण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे.
महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून सुवासिक फुले, आंब्याची डाळ (किंवा भिजवलेले हरबरे) आणि पन्हे देतात. त्या हळदीकुंकू समारंभांचा (गौरी उत्सवाचा) अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो.
या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे म्हणूनच महाराष्ट्रात या दिवशी नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे ,विवाह, व्रतबंधन आदी मंगलकार्ये, गृहप्रवेश, सुवर्ण, चांदी खरेदी, वाहन खरेदी केली जाते. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात या दिवशी केली जाते तसेच पूर्ण दिवस शुभ असल्याने वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नसते.
दक्षिणेकडील प्रांतात या दिवसाची वेगळी ओळख आहे. त्यांच्या मते, या दिवशी कुबेर (भगवानाच्या दरबाराचा खजिनदार) यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते. कुबेराच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले. कुबेरांनी श्री लक्ष्मीकडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले. तेव्हा श्री शंकरांनी कुबेराला श्री लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला. म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय्य तृतीयेला श्री लक्ष्मीची पूजा केली जाते. श्री लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे, म्हणूनच श्री लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूची पूजा केली जाते. दक्षिणेला या दिवशी श्रीयंत्रची पूजा केली जाते, ज्यामध्ये विष्णू, लक्ष्मीसोबत कुबेराचेही चित्र असते.
भारतातील ओरिसामध्ये अक्षय्य तृतीयेचा दिवस शेतकऱ्यांसाठी शुभ मानला जातो. या दिवशी श्री लक्ष्मी देवतेची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते. या सणाला मुठी चूहाणा म्हणले जाते. या दिवशी पालेभाज्या आणि मांसाहार यांचे सेवन केले जात नाही..ओरिसातील जगन्नाथपुरी येथूनही या दिवशी रथयात्रा काढली जाते.देवाच्या नौकाविहारासाठी पाच बोटी यानिमित्ताने सुशोभित केल्या जातात.
पंजाबमध्येही या दिवसाला खूप महत्त्व आहे. हा दिवस नवीन हंगामाच्या सुरुवातीचा सूचक मानला जातो. या अक्षय्य तृतीयेला ब्रह्म मुहूर्तावर जाट कुटुंबातील पुरुष मंडळी त्यांच्या शेताकडे जातात.
पश्चिम बंगालमध्ये व्यापारी वर्गात अक्षय्य तृतीया महत्त्वाचा दिवस मानला जातो. हालकटा या नावाने या दिवशी श्री गणपतीची आणि श्री लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. व्यापारी लोक नव्या हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात.महाराष्ट्रातील खानदेशांत अक्षय तृतीयेच्या सणाला “आखाजी” म्हणून संबोधले जाते. खानदेशांत आखाजी हा सण दीपावलीइतकाच महत्त्वाचा गणला जातो. सालदार, बलुतेदार अक्षय तृतीया या दिवसापासून नवी सुरुवात करतात.राजस्थानातही हा दिवस शुभ मुहूर्ताचा समजतात. तेथे या दिवसाला आखा तीज असे म्हणतात. राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागांत या दिवशी विवाह करण्याची पद्धती आहे.बौद्ध धर्मामध्येही आखाजी या दिवसाचे विशेष महत्व मानले जाते.
असे म्हटले जाते की या दिवशी केलेल्या कामाचे शाश्वत फळ मिळते. ‘न क्षय इति अक्षय’ म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, तो अक्षय आहे. म्हणून, या दिवशी जे काही शुभकार्य, पूजा, दान इत्यादी केले जाते ते सर्व शाश्वत होते.
सुग्रास भोजन करून या गटातील सर्वजण काहीतरी नवीन गोष्ट सुरु करायचे ठरवित असतीलच. सर्वांच्या मनोकामना सुफळ संपूर्ण होवोत आणि आपल्या या गटातील सर्वांचे प्रेम, माया, आपुलकी अक्षय राहो ही श्री विष्णू, श्री लक्ष्मी चरणी प्रार्थना!
.
….. नीला बर्वे,
सिंगापूर.
…..स्रोत : आंतरजाल.
