You are currently viewing अक्षय तृतीया (आखाजी)

अक्षय तृतीया (आखाजी)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

अक्षय तृतीया (आखाजी)

 

शुभ कार्याचा करु या

आज मंगल सोहळा

चैतन्याचा वाहु दे झरा

सण आजचा आगळा

 

आला वैशाखीचा सण

सांगे कोकीळ गुंजन

रानातल्या गौराईचं

चला करु, गं पुजन

 

आला आखाजीचा सण

लेक बोलते मनात

धाड ना गं मुळं आई

सांगे वाऱ्याच्या कानात

 

माझ्या माहेराची वाट

नागमोडी वळणाची

भाऊराया मुळं येई

गाडी ढवळ्या पवळ्याची

 

आली माहेरवाशीण

भेटेमाय माऊलीला

सासरच्या गुजगोष्टी

सांगे सखी मैत्रीणीला

 

झोका रानात बांधला

भीडे उंच आभाळाला

गौराईची गाणी गाई

निनादली आमराई

 

जमल्या माहेरवासिनी

गुंज सांगती कानात

वंदती गौराबाईस

सोहळा असे रानात

 

झिम्मा फुगडीची घाई

लिंबलोणाची पुण्याई

गौर गौरी गं, गौरी गं

हिरव्या रानाचीचं आई

 

सुख संपदा नांदू दे

माझ्या माहेरच्या घरी

सासरच्या अंगणात

आनंद तिन्ही प्रहरी

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा