*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम बालकविता*
*शाळेची सुट्टी*
चला दोस्तहो खेळ खेळूया
सुट्टी पडली शाळेला
अभ्यासाची कटकट गेली
दफ्तर टांगू खुंटीला
गृहपाठ आणि पाठांतर
ठेऊ जरासे बाजूला
विचारणार नाही मास्तर
म्हणे लाडक्या राजूला
उठा चला रे उशीर झाला
म्हणणार नाही कोणी
पाठीवरती धपाटा पण
आज्जी घालत ना नानी
आंबे जांभूळ फडशा पाडू
काजू करवंद खाऊ
सायंकाळी एकत्र जमून
सारे नदीवर न्हाऊ
मस्ती आमची चालू असते
खेळ खेळता मळ्यात
झोप येते मग शांत रात्री
सारवलेल्या खळ्यात
भाऊ बहिणी सगे सोयरे
सुट्टीवर येती घरी
घर मामाचे भरून जाते
मज्जा असे तीच खरी
©दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६

