“सुंभ जळाला तरी पिळ जात नाही”… अॅड. नकुल पार्सेकर.
पाकिस्तान आपल्या धार्मिक कट्टरतेमुळे भिकेला लागलेला देश. पाकिस्तानचा आतापर्यंत इतिहासच रक्तरंजित. डोक्यावर प्रचंड कर्ज, बेरोजगारी, कुपोषण आणि प्रत्येक दिवशी होणारे बाॅम्बस्फोट व अंतर्गत सुरक्षा यामुळे समस्यांमध्ये रूतलेला हा देश आणि त्यांचे हरामखोर नेते अतिरेक्यांना पाठबळ देऊन दहशतवाद पसरवत आहेत तो थांबण्याचे नाव घेत नाही.
दिनांक २२एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मध्ये ज्या आमच्या २६ निष्पाप भारतीय पर्यटकांची निर्घृण हत्या केली ही अतिशय संतापजनक घटना आहे. पाकिस्तानने या हल्ल्यात आमचा संबंध नाही म्हणून जरी हात झटकले तरी त्या नेहमीप्रमाणे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. जागतिक शांततेत नेहमीच अडसर असलेल्या आणि भिकेकंगाल झालेल्या या पाकड्याना खरे तर कायमचा धडा शिकवण्याची गरज आहे.
ही गोष्ट मान्य करायलाच पाहिजे की गेल्या दहा वर्षात पूर्वीपेक्षा काश्मीर खोऱ्यात शांतता नांदत आहे. अनेक दहशतवादी संघटना सरेंडर झाल्या. विधानसभा निवडणुकीत मतदानही मोठ्या प्रमाणात झाले. या दहा वर्षात पर्यटकांचाही ओघ वाढला. शांतता पुनर्स्थापित होत असताना नापाक पाकिस्तानने घडवून आणलेले हे अमानुष हत्याकांड गांभीर्याने विचार करायला लावणारे आहे.
देशाच्या पंतप्रधानांनी याबाबत तातडीने कठोर पावले उचलली आणि जे निर्णय घेतले याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. सिंधू नदी जलवाटप करार रोखल्याने अर्धा पाकिस्तान जेव्हा पाण्याशिवाय तडफडत राहिल तेव्हा गोळ्या घालून तडफडत प्राण सोडणाऱ्या आमच्या निष्पाप भारतीय पर्यटकांना खरी श्रध्दांजली मिळेल. देशात असलेल्या सगळ्या पाकड्याना शोधून काढून हाकलून देण्याचा निर्णयही शंभर टक्के स्वागतार्हच आहे. हीच वेळ आहे यांची नाकेबंदी करण्याची.
हे सर्व करत असताना या देशातील प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांनी या घटनेकडे पहाताना आपल्या चष्म्याची नेहमीची राजकीय भिंग जरा बाजूला ठेवणे गरजेचे आहे. कारण अशावेळी आम्ही सगळे भारतीय एक आहोत हा संदेश जाणे गरजेचे आहे. काँग्रेसचे नेते मा. श्री खर्गे यांच्या भूमिकेचे स्वागत आहे त्यांनी तातडीने पञकार परिषद घेऊन सरकारने तातडीने कारवाई करावी आम्ही सरकारच्या सोबत आहोत असे जाहीर केले हे योग्यच केले माञ गांधी घराण्याचे स्मार्ट दामाद राॅबर्ट यांनी उधळलेली मुक्ताफळे काँग्रेस अध्यक्षांच्या भूमिकेला छेद देणारी आहेत. राहुल गांधींनी घटना घडल्यावर देशाच्या मा. गृहमंत्र्यांना फोन करून माहिती घेतली आणि वैचारिक आणि राजकीय मतभेद कितीही असले तरी जेव्हा परकीय शक्ती भारताकडे वाकड्या नजरेने बघते तेव्हा आम्ही सर्व भारतीय एक आहोत हा संदेश सकारात्मक आहे.
धर्म विचारून गोळ्या घालणे ही अतिशय संतापजनक घटना आहे. खुनशी पाकड्याना जर धडा शिकवायचा असेल तर त्यासाठी आपली अंतर्गत सुरक्षा आणि सौहार्दाचे वातावरण आपण आपल्या देशात टिकवले पाहिजे. जगातील कट्टर धार्मिकतेचा आग्रह धरणारे काही देश रसातळाला गेले आहेत त्यापैकी एक पाकिस्तान. अठरापगड जाती, पंथ, धर्म असूनही आपला भारत देश आज जगात ताठ मानेने वाटचाल करत आहे त्याचे कारण म्हणजे आपली मानवतावादी भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचे जतन करणे हे आम्हां प्रत्येक भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे.
पहलामा हल्यात मृत झालेल्या आमच्या निष्पाप बंधू- भगिनींना भावपूर्ण आदरांजली!
