हरकत आणि सूचना लेखी स्वरुपात कळविण्याबाबत
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग यांच्याकडील पत्रान्वये मौजे वाघेरी नांदगाव रेल्वे स्टेशन नजिक ता. कणकवली येथील मुख्य बाजार आवारास मंजूरी, अधिसूचित करण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मासिक सभा दि. 25 जानेवारी 2025 रोजी पार पडली. या बैठकीमधील ठराव क्रमांक 14 अन्वये सर्वानुमते वरील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत ग्रामपंचायत वाघेरी ता. कणकवली यांनी ना-हरकत दाखला दिलेला असल्याची माहिती सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपन शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 5(2)व कृषी व सहकार विभागाकडील अधिसूचनेनुसार प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंधुदुर्ग यांच्या कार्यक्षेत्रात नियमन करण्यात आलेल्या शेतमालाची खरेदी-विक्रीकरीता बाजार क्षेत्रातील उपरोक्त निर्दिष्ट केलेली क्षेत्र शेतमालाची खरेदी-विक्रीकरीता मुख्य बाजार आवार म्हणून स्थापन करण्याचा इरादा जाहिर करण्यात येत आहे.
वरील अधिसूचनेबाबत संबंधीतांनी त्यांची कोणतीही हरकत अगर सूचना, असल्यास त्या लेखी स्वरुपात आवश्यक कागदपत्रांसह, महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांचे आत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयास दाखल कराव्यात. मुदतीनंतर प्राप्त हरकत अगर सूचनांचा विचार करण्यात येणार नाही, असही प्रसिध्दी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.
