You are currently viewing अनामत रकमेच्या मागणीमुळे वीज ग्राहकांचा महावितरण विरोधात संताप

अनामत रकमेच्या मागणीमुळे वीज ग्राहकांचा महावितरण विरोधात संताप

अनामत रकमेच्या मागणीमुळे वीज ग्राहकांचा महावितरण विरोधात संताप

वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत ग्राहकांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

सावंतवाडी । प्रतिनिधी :

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना व सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या संयुक्त बैठकीत सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांनी महावितरण कंपनीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्राहकांकडून पुन्हा अनामत रक्कम (डिपॉझिट) भरण्याची मागणी केल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गुरुवारी येथील नगर परिषदेच्या पत्रकार कक्षाजवळील सभागृहात झालेल्या बैठकीत वीज ग्राहकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
या बैठकीत जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे प्र.अध्यक्ष संजय लाड, जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा सचिव दीपक पटेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर आदी उपस्थित होते.

दिलीप वाडकर या ग्राहकाने सांगितले की, वीज वितरण कंपनीने अनामत रक्कम भरण्यासाठी ग्राहकांना स्वतंत्र बिले पाठवली आहेत. यापूर्वीही डिपॉझिट भरण्यासंदर्भात बिले आली होती आणि ग्राहकांनी ती भरली होती. असे असताना पुन्हा डिपॉझिट भरण्याची नोटीस का बजावण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
इतर ग्राहकांनीही या मागणीला अन्यायकारक ठरवले.
जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत सांगितले की, या संदर्भात मुंबई येथील व्यवस्थापन संचालक आणि प्रतापगड येथील मुख्य कार्यालयातील संचालकांना माहिती दिली जाईल व डिपॉझिटची रक्कम न घेण्याची विनंती केली जाईल.
या बैठकीत ग्राहकांनी इतरही अनेक समस्या मांडल्या. संतोष तावडे यांनी ओटवणे येथे ट्रान्सफॉर्मर नसल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याची तक्रार केली. महेश खानोलकर यांनी जिल्ह्यातील अनेक ट्रान्सफॉर्मरला संरक्षक कंपाउंड नसल्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली. या तक्रारी लेखी स्वरूपात अधीक्षक अभियंत्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन ॲड.वेंगुर्लेकर यांनी दिले.
दिलीप वाडकर यांनी सावंतवाडी शहरातील वीज ग्राहकांना वाली नसल्याचे सांगितले. झाडी तोडण्याच्या नावाखाली दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होतो, अनेक वीज खांब कमकुवत झाले आहेत आणि वीज वाहिन्या लोंबकळत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले. त्यांनी पावसाळ्यापूर्वी शहरात झाडी तोडण्याची आणि अनामत रकमेच्या मागणीवर पुनर्विचार करण्याची मागणी केली.

  1. हरिश्चंद्र मांजरेकर आणि उल्हास सावंत यांनीही लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या व वाकलेल्या खांबांमुळे ग्रामीण भागात निर्माण झालेल्या धोक्याकडे लक्ष वेधले. शैलेश कुडतरकर यांनी सावरवाडमध्ये कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नळ योजनेचा पंप चालत नसल्याची समस्या मांडली.
    ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी सांगितले की, वीज ग्राहकांच्या समस्यांबाबत येत्या २५ एप्रिल रोजी कुडाळ येथे अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन चर्चा केली जाईल. ग्राहकांनी आपल्या लेखी तक्रारी महावितरणकडे देऊन पोहोचपावतीची प्रत संघटनेकडे द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
    प्र.अध्यक्ष संजय लाड यांनी स्मार्ट मीटरला संघटनेचा विरोध असल्याचे सांगितले. जिल्हा सचिव दीपक पटेकर यांनी ग्राहकांनी आपल्या समस्यांबाबत जागरूक राहून लेखी तक्रारी देण्याचे आवाहन केले, जेणेकरून त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करता येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा