You are currently viewing विनाश (भुजंगप्रयात)

विनाश (भुजंगप्रयात)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*विनाश* (भुजंगप्रयात)

 

उभा तो जिथे स्फोट झाला कुकर्मे

किती ही घरे हो जळाली कुणाची

कसे माणसा *क्लेश* झाले विनाशी

रिकामी स्मशाने हवेली भुतांची॥१॥

 

उरे तो कसा एकटा जीव त्याचा

कुटुंबीय त्याचे नुरे ना बिचारा

असा शोक त्याचा कसा कोण ऐके

भुकेल्या मुला कोण देईल थारा॥२॥

 

कशाला लढाया हव्या मानवाला

किती जीव ते मारले या भ्रमाने

कसे या मुलाने जगावे अनाथी

कसा मोकळा श्वास घ्यावा तयाने॥३॥

 

गुन्हा काय त्याचा मनाला विचारा

विनाकारणे तो जगी पारखा रे

सुखाचा तयाने कसा ध्यास घ्यावा

मिळावी कशी शस्त्र शांती खरी रे॥४॥

 

नको स्वार्थ सत्तांधता ही बळीची

हवी प्रेम माया मनीची जगाला

जपावी धरा ही असावी फुलांची

नको रक्तधारा तिच्या काळजाला॥५॥

 

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा