You are currently viewing मालवणच्या समुद्रात रत्नागिरी येथील दोन एलईडी नौका पकडल्या…

मालवणच्या समुद्रात रत्नागिरी येथील दोन एलईडी नौका पकडल्या…

मालवणच्या समुद्रात रत्नागिरी येथील दोन एलईडी नौका पकडल्या…

मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई; नौकांसह अन्य साहित्य जप्त…

मालवण

महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग किल्ल्या समोर अंदाजे ८ ते ९ सागरी मैल समुद्रात अनधिकृतरित्या एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील दोन एलईडी नौकांवर जिल्ह्याच्या मत्स्य विभागाने काल रात्री कारवाई केली आहे. या नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करून मालवण येथील सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. दोन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण ६५ खलाशी आहेत. तर अंदाजे ७ लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. या नौकांना ५ ते ६ लाख रुपयांचा दंड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बुधवारी रात्री मालवण समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी रविंद्र मालवणकर हे नियमित गस्त घालत होते. यावेळी रत्नागिरी येथील परवाना असलेल्या नौका हाजि जावेद नोंदणी क्रमांक आयएनडी – एमएच – ४ एमएम- ५८४३ व वायएम – मातीन- एच- इस्माईल द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात येथील किल्ल्यासमोर अंदाजे ८ ते ९ सागरी मैल येथे अनधिकृतरित्या एलईडी लाईटद्वारे मासेमारी करत असताना पकडले.

अंमलबजावणी अधिकारी रविंद्र मालवणकर यांनी पोलिस कर्मचारी अमित हरमलकर तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांच्या सहकार्याने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर या नौकेबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या कोर्टात ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती मत्स्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा