*महाराष्ट्र शासनाचा शंभर दिवसांचा कृति आराखडा*
ग्राहक पंचायत करणार विश्लेषण- अनोखा उपक्रम
वैभववाडी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील शंभर दिवसांचा सात कलमी कृति आराखड्याचे विश्लेषण, फेरतपासणी (काऊंटर चेक) करण्याचा एक अभिनव उपक्रम ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने हाती घेतला आहे अशी महिती संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी ऑनलाईन बैठकीत दिली.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या विभाग, जिल्हा, महानगर व तालुका शाखा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची ऑनलाईन बैठक नुकतीच डॉ.विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यातून जवळपास १०० पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वामी विवेकानंद व ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांना अभिवादन करून आँनलाईन सभेला सुरुवात झाली. सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत व आँनलाईन सभेचा उद्देश राज्य सहसचिव प्रा.एस. एन. पाटील यांनी विशद केला. राज्य सचिव श्री.अरुण वाघमारे यांनी राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या मार्गदर्शनाने, व प्रकल्प प्रमुख डॉ. ज्ञानचंद्र पाटील (सांगली) यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी परिपत्रक काढून क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयां करिता शंभर दिवसांचा कृति आराखडा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १०० दिवसांचा ७ कलमी कृति आराखड्यात संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयी-सुविधा, गुंतवणूक प्रसार व क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या मुद्द्यांवर प्रभावी कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
या कृति आराखड्याचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने विश्लेषण, फेरतपासणी (काऊंटर चेक) करुन वस्तुनिष्ठ अहवाल मा.मुख्यमंत्री, मा.मुख्य सचिव, मा. जिल्हाधिकारी व राज्य सचिव यांच्याकडे पाठवला जाणार आहे.
या ७ कलमांपैकी, ४ थे कलम-जनतेच्या तक्रारींचे निवारण याला अनुसरुन सर्व तालुका, महानगर व जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी आपआपल्या क्षेत्रातील १७ आवश्यक सेवा विभागांपैकी जास्तीत जास्त कार्यालयात जाऊन कार्यालय प्रमुखांची भेट घेऊन
या अनोख्या उपक्रमाची माहिती द्यावी.सोबत संस्थेने तयार केलेली ३३ प्रश्न असलेल्या प्रश्नावलीवर चर्चा करून पूर्ण भरावी. शेवटी त्याच्यावर सही, शिक्का घ्यावा. तत्सम विभागाला त्या प्रश्नावलीची एक प्रत द्यावी, असे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी सांगितले.
राज्याने हाती घेतलेला हा ग्राहकाभिमुख उपक्रम यशस्वी करावा काही अडचण आल्यास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन राज्य सहसंघटिका मेधाताई कुलकर्णी यांनी केले. या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा शाखा व तालुका शाखा आपापल्या कार्यक्षेत्रातील कार्यालयांना भेटी देऊन आपला अहवाल वेळेत सादर करणार आहे. या कामी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालय प्रमुखांनी सहकार्य करावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केले आहे. यावेळी कोषाध्यक्ष सुनीता राजेघाटगे, सदस्य प्रमोद कुलकर्णी, हेमंत मराठे तसेच विभाग, जिल्हा, महानगर व तालुका शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी सचिव श्री.अरुण वाघमारे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
