आम. निलेश राणे यांची वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा
बाबा मोंडकर यांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार
मालवण :
मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ नसल्याने महिला रुग्णांना तसेच गरोदर स्त्रियांना उपचारासाठी समस्या निर्माण होत होत्या. अनेक वर्षांपासून हा प्रश्न कायम होता. याबाबत नागरिकांनी तसेच भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. दरम्यान, आमदार निलेश राणे यांनी याबाबत वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा केली. मालवण ग्रामीण रुग्णालय येथे स्त्रीरोग तज्ञ नियुक्त बाबत तात्काळ कार्यवाही गरजेची असल्याचे सांगितले. त्यानुसार मालवण ग्रामीण रुग्णालय येथे स्त्रीरोग तज्ञ नियुक्ती बाबत निर्णय घेण्यात आला आहे. स्त्रीरोग तज्ञ आठवड्यातून दोन ते तीन दिवस मालवण ग्रामीण रुग्णालयात सेवेत असणार आहेत. याबाबत आदेशपत्र दोन दिवसात प्राप्त होईल. अशी माहिती वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. अशी माहिती देताना बाबा मोंडकर यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले. अनेक वर्ष रिक्त असलेल्या या पदावर नियुक्ती मिळणार आहे. स्त्रीरोग तज्ञ कायमस्वरूपी मिळावी तसेच ग्रामीण रुग्णालयातील रिक्त जागा व अन्य समस्या ही आमदार निलेश राणे आरोग्य मंत्र्यांच्या माध्यमातून सोडवतील. त्याबाबत आमदार यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु असल्याचे मोंडकर यांनी माहिती देताना सांगितले.