सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांच्या मातोश्री मा. लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई यांचा 13 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 8.30 वा. दिल्लीचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अमरावतीला श्याम नगरातील तक्षशिला महाविद्यालयात सर्व संस्थांच्या वतीने सत्कार होत आहे. त्यानिमित्त…
मातृहृदयाच्या धनी : मा. लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई
13 एप्रिल 1991 हा दिवस अमरावती शहराच्या इतिहासामध्ये नोंद करून ठेवावा लागेल .कारण या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 13 एप्रिल रोजी रात्री बारा वाजता साजरा करण्याचा व मैलाचा दगड ठरावा असा निर्णय घेण्यात आला आणि यासाठी पुढाकार घेतला तो आजच्या मा. लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांनी. या 35 वर्षात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 13 एप्रिलला मध्यरात्री साजरा करण्यात येतो. कमलताईंनी पुढाकार घेऊन एका चांगल्या पायंड्याची निर्मिती केली आहे. हा पुढाकार घेण्यासाठी स्मृतीशेष माजी राज्यपाल श्री रा. सू .गवई यांची समर्थ साथ त्यांना लाभली. 1991 या वर्षात दळणवळणाची साधने नव्हती. प्रसारमाध्यमे नव्हती .पण कमलताईनी दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण नियोजन केले आणि अमरावती मधला पहिला 13 एप्रिल मध्यरात्रीचा जन्मोत्सव सुरू झाला. दादासाहेबांच्या व ताईसाहेबांच्या निमंत्रणावर सनदी व राजपत्रित अधिकारी आले. त्याचबरोबर शहरातील सर्व पक्षांचे नेते आले. या अभिनव उपक्रमाची सुरुवात करून कमलताईंनी अमरावतीच्या इतिहासामध्ये एका चांगल्या उपक्रमाची सुरुवात करून दिली.
आज अमरावतीला 13 तारखेला मध्यरात्री अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे .त्या ठिकाणी भव्य प्रमाणात हा जयंती उत्सव साजरा केला जातो. लोकांची प्रचंड गर्दी असते. अभिवादन करण्यासाठी रांगा लागतात. अगदी अलीकडे तर 11 एप्रिल या महात्मा फुलांच्या जयंती पासूनच 11 12 13व 14 असा चार दिवस उत्सव चालतो. संपूर्ण चौक शेकडो फलकांनी व्यापलेला असतो. आज या उपक्रमाला फार मोठे स्वरूप प्राप्त झालेले आहे याची सुरुवात माझी लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांनी केली त्याबद्दल त्या अभिनंदनासठं पात्र आहेत.
डॉ. कमलताई गवई यांना सर्वजण आदराने आईसाहेब म्हणतात. आणि खऱ्या अर्थाने त्यांचे हृदय हे मातृहृदय आहे याची प्रचिती त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आहे. न्यायमूर्ती भूषण सरांवर त्यांनी उत्तम संस्कार केल्यामुळे आज भूषण सर दिनांक 14 मे रोजी भारताच्या सरन्यायाधीश पदी विराजमान होणार आहेत .याचे श्रेय आईसाहेबांनी केलेल्या सुसंस्कारांनाच द्यावे लागेल. गवई साहेबांची सुरुवातीची परिस्थिती चांगली नव्हती. साहेब नुकतेच राजकारणात आले होते. आमदार खासदार व्हायचे होते .पण या माऊलीने त्यांना समर्थ साथ दिली आणि त्यांना राजकारणात भरारी घेण्यासाठी बळ दिले. त्यामुळे माननीय श्री रा सु गवई हे राज्यपाल या पदापर्यंत पोहोचू शकले. प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषामागे एक स्त्री असते आणि ते आईसाहेबांनी सिद्ध करून दाखवले
आईसाहेबांनी अमरावतीकरांसाठी नव्हे महाराष्ट्रातील लोकांसाठी एक आगळे वेगळे विपश्यना केंद्र अमरावती जवळील छत्री तलावाच्या जंगलात मोगरा या ठिकाणी प्रारंभ केले आहे. इगतपुरीला जे विपश्यना केंद्र आहे त्या विपश्यना केंद्राच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र चालते .तिथले सर्व नियम इथे पाळले जातात. प्रत्येकाला इगतपुरीला प्रवेश मिळणे शक्य होत नाही. मग अशा साधकांसाठी दर महिन्याला इथे दहा दिवसांचे विपश्यनाचे शिबिरे नियमितपणे होतात. प्रत्येक शिबिरामध्ये जी आर्थिक तूट येते ती तूट आईसाहेब स्वतः भरतात. विपश्यना केंद्र अमरावतीला देऊन खऱ्या अर्थाने या केंद्रातून बाहेर पडणाऱ्या साधकांना सुखी संपन्न आयुष्याचा सन्मार्ग दाखवण्यासाठी आईसाहेबांनी हे व्रत स्वीकारले आहे.
विपश्यना केंद्र आणि तेही इगतपुरीच्या नियमानुसार चालवणे म्हणजे फार अवघड गोष्ट. पण ती किमया आईसाहेबांना साधली आहे. मी जेव्हा आईसाहेबांबरोबर मोगरा येथे विपश्यना शिबिराला भेट देण्यास जातो .तेव्हा आईसाहेब स्वतः संस्थापक असून तिथल्या नियमांचे तंतोतंत पालन करतात. विपश्यना केंद्रामध्ये येणारे सर्व मार्गदर्शक यांना घेण्यासाठी आईसाहेब स्वतः रेल्वे स्टेशनवर जातात. त्यांना विपश्यना केंद्रात घेऊन येतात. त्यांच्या संस्थेमध्ये हजारोने कर्मचारी आहेत .प्राचार्य आहेत. पण हे काम त्या स्वतःच करतात. त्या स्वतः विपश्यनेच्या आचार्य आहेत . पण विपश्यना शिबिरामध्ये येणाऱ्या मार्गदर्शकाच्या कार्यात त्या कधीच ढवळाढवळ करताना दिसणार नाहीत. आणि शिबिर संपल्यानंतर सर्व मार्गदर्शकांना रेल्वे स्टेशन पर्यंत किंवा योग्य ठिकाणी पोहोचून देण्याचे काम देखील त्या स्वतः करतात. त्यामुळे त्यांच्या विपश्यना केंद्रामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी विपश्यनेतील तज्ञ मंडळी नेहमी तत्पर असतात .
आई साहेबांचे वय आज 83 आहे. पण सकाळी लवकर उठणे आणि नियोजित कार्यक्रमांना उपस्थिती लावणे हे अगदी ठरवून गेलेले आहे. कधी कधी तर रात्री बारापर्यंत कार्यक्रम चालतात. पण त्या थकत नाहीत .तो कार्यक्रम अमरावतीला असो नागपूरला असो .परभणीला असो की चिपळूणला असो .ताई स्वतःच्या वाहनाने जातात .संयोजक यांना कोणताच खर्च करू देत नाहीत. आपल्या भाषणातून त्या न्यायमूर्ती भूषण साहेब यांनी आपले शिक्षण कशाप्रकारे विपरीत परिस्थितीमध्ये संपन्न केले. त्याचा वृत्तांत सांगतात .तसेच भूषण सरांची जडणघडण यावर सविस्तर मार्गदर्शन करतात.
परवा आम्हाला बुलढाणा जिल्ह्यात जायचे होते. आम्ही साडेसहाला सकाळी निघालो. बुलढाणा जिल्हाधिकारी बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक. पळसखेड सपकाळ येथील डॉक्टर नंदकुमार पालवे सेवा संकल्प प्रकल्प. हिवरा आश्रम. कृषी महाविद्यालय. अनाथ आश्रम आणि उदयनगर जवळ असलेले सह्याद्री केंद्र या ठिकाणचे सर्व कार्यक्रम त्यांनी केले. हे कार्यक्रम रात्री दहा वाजता संपले. तरी आईसाहेब थकलेल्या नव्हत्या.
एका महाविद्यालयाच्या प्राचार्य असलेल्या एका मोठ्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष असलेल्या आईसाहेबांनी विपश्यनेनंतर हा सर्व भार इतरांवर सोपवला आहे. आता विपश्यना केंद्र आणि माहेर आणि वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन या कामाला त्यांनी वाहून घेतले आहे. वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे .ते वाढावे यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावावे यासाठी त्यांनी चळवळ उभारली आहे. त्यांच्या गाडीमध्ये झाडे लावण्याचे सगळे साहित्य याशिवाय झाडे असतात. दररोज पाच झाडे लावल्याशिवाय त्यांचा दौरा सुरू होत नाही. खरं म्हणजे 83 वय हे आराम करण्याचे वय आहे. पण या वयातही त्यांचा उत्साह दांडगा आहे. आणि म्हणूनच दिल्ली येथे त्यांचा नुकताच जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आहे. हे निमित्त साधून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे निमित्त साधून दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी त्यांचा सर्व संस्थांच्या वतीने अमरावतीच्या श्याम नगरातील तक्षशिला महाविद्यालयात सत्कार आयोजित केला आहे. अशा सर्वसामान्य लोकांसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या आईसाहेबांना दीर्घायुष्य लाभो ही मनोमन प्रार्थना.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003