You are currently viewing सागरी जैवविविधतेचे संवर्धन ही सामाजिक जबाबदारी  –  स्टॅलिन दयानंद

सागरी जैवविविधतेचे संवर्धन ही सामाजिक जबाबदारी  –  स्टॅलिन दयानंद

सागरी जैवविविधतेचे संवर्धन ही सामाजिक जबाबदारी  –  स्टॅलिन दयानंद;

कोळंब येथे समुद्ररक्षक संमेलन उत्साहात…

मालवण

मालवणची समुद्र संपत्ती जैवविविधतेने परिपूर्ण आहे. त्याचे रक्षण आणि संवर्धन हे केवळ पर्यावरणाची गरज नाही तर सामाजिक जबाबदारी आहे जी स्थानिक नागरिक, पर्यटक आणि प्रशासन यांनी संयुक्तपणे पार पाडायला हवी असे प्रतिपादन वनशक्ती संस्थेचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी येथे केले.

मालवणच्या किनारपट्टीने एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. जेव्हा भारतातील पहिल्या स्थानिक सहभागातून पार पडलेल्या सागर तळ स्वच्छता मोहिमेच्या यशस्वी पूर्णतेनंतर समुद्ररक्षक संमेलन २०२५ हा विशेष कार्यक्रम वनशक्ती आणि सागर शक्ती संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कोळंब येथे आयोजित करण्यात आला.

या मोहिमेंतर्गत मालवण किनारपट्टीवर एकूण आठ सागरी स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या. ज्यामध्ये २७५० किलो सागरी कचरा त्यामध्ये प्रामुख्याने घोस्ट नेट्स आणि प्लास्टिक समुद्रातून आणि किनाऱ्यावरून काढण्यात आला. या मोहिमेने एकूण ८७ हजार चौरस फूट क्षेत्रफळ व्यापले. ज्यामुळे सागरी परिसंस्थेचे संवर्धन करण्यास मोठी मदत झाली. या उपक्रमात स्कुबा डायव्हर्स, स्थानिक मच्छीमार, स्वयंसेवक, शालेय विद्यार्थी आणि विविध संस्थांचा सक्रिय सहभाग होता. यादरम्यान भूषण जुवाटकर, जगदीश तोडणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समुद्राखालील घोस्ट नेट्स काढण्यात मोलाचे योगदान दिले.

कोळंब येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास रत्नागिरी येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री. जीरापुरे, माजी वन अधिकारी सुहास पुराणिक, सागर शक्ति प्रकल्प समन्वयक नंदकुमार पवार, वनशक्ती संचालक स्टॅलिन दयानंद, कांदळवन विभागाचे प्रकल्प समन्वयक रोहित सावंत, निलक्रांती संस्थेचे संचालक रविकिरण तोरसकर यांच्यासह मत्स्य सर्वेक्षण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य मत्स्य विभाग मालवण पालिका, कांदळवन विभाग, नीलक्रांती संस्था, युथ बिट्स फॉर क्लायमेट यांच्यासह अनेक संस्थांचा विशेष सहभाग होता.

सागर स्वच्छता मोहिमेत ज्यांचे योगदान लाभले त्या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विकी पाटील यांनी या उपक्रमाला पाठबळ दिल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विशेष आभार मानले. सरकारी विभागांचा सहकार्य हा या उपक्रमाच्या यशाचा महत्त्वाचा घटक ठरला आहे असे त्यांनी स्पष्ट केले. या संमेलनाचा उद्देश म्हणजे या सागरी स्वच्छता उपक्रमाची यशोगाथा साजरी करणे, जनजागृती घडवणे व भविष्यातील मोहिमांसाठी जनसहभाग वाढवणे हा होता असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा