You are currently viewing ‘दास्यभक्तीचा महामेरू रामभक्त हनुमान

‘दास्यभक्तीचा महामेरू रामभक्त हनुमान

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी मुकुंद अनसिंगकर लिखित अप्रतिम लेख*

*’दास्यभक्तीचा महामेरू
रामभक्त हनुमान’*

मनोजवं मारूतुतल्य वेगं
जितेन्द्रियं बुद्धीमतां वरिष्ठम्
वातात्मजं वानरयूथ मुख्यं
श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये.

पवनसुत ,अंजनीपुत्र, केसरीनंदन, श्रीरामभक्त,श्रीराम दूत ,सुग्रीवाचा एकनिष्ठ मित्र- मंत्री शिवशंभूचा अवतार,हनुमंत म्हणजे दास्यभक्तीचा महामेरू! मनाच्या वेगाने जाणारा, वा-यासारखा वेगवान बुद्धीमंतामध्ये सर्वश्रेष्ठ ,वानरांचा प्रमुख,पवनपुत्र, श्रीराम भक्त शक्तीची देवता, हनुमंत, मारूती, श्रीरामाचा सर्वश्रेष्ठ भक्त आहे.‌
भगवान शिवाने अंजनीच्या पोटी हनुमंताच्या रूपाने जन्म घेतला.‌जन्मताच आकाशी झेप घेऊन सूर्याला फळ समजून घ्यायला उडाला,इथेच त्यांच्या शक्तीचा प्रत्यय येतो.‌ पुढे लक्ष्मणासाठी संजीवनी बुटी आणण्यासाठी मनाच्या वेगाला ही लाजवेल अशा वेगाने / द्रोणागिरी पर्वत उचलून आणला यातही शक्तीचा प्रत्यय येतो.‌

किष्किंधा नगरीचा राजा सुग्रीवाला हरवून वाली राजा झाला. वालीला घाबरून सुग्रीव ऋष्यमूक पर्वतावर दडून बसला. हनुमान रामाची प्रथम भेट येथे झाली. सुग्रीवाला त्यांचे राज्य वालीकडून श्रीरामाने परत मिळवून द्यावे नी त्यांची वानरसेना सीतामाईला शोधण्यात व सोडवून आणण्यात मदत करेल.असा युक्तीवाद करून आपले बुद्धीचातुर्य हनुमंताने दाखवून दिले.

रामाने वालीचा वध करून सुग्रीवाला राज्य मिळवून दिले नी श्रीराम हनुमान, प्रभुराम नी त्याचा नि:सिम भक्त हनुमान ही अनुपम जोडी रामायणात अमर झाली.राम,हनुमान सीतेला सोडविण्यासाठी कामाला लागले. हनुमान श्रीरामाचा नि:सिम भक्त झाला.तन मनाने रामरूप झाला.रामाची दास्य भक्ती करू लागला. श्रीरामाच्या प्रत्येक कामात मदत केली. श्रीराम आज्ञेचे पालन केले.
सीतामाईला सोडवून आणण्यात हनुमानाची कामगिरी खूप मोठी आहे. लंकेत जाऊन सीतेचा शोध घेणे, तिला राम, रावणाच्या तावडीतून सोडवतील अशी खात्री देणे; रावणाच्या शक्तीचा प्रत्यक्ष दरबारात जाऊन अंदाज घेणे; श्रीराम दूताची,हनुमंताची मुत्सद्देगिरी यांतून दिसून येते.

शिळेवर रामनाम लिहून समुद्रावर त्या तरंगणा-या पत्थरांचा सेतु बनवून समुद्र पार करण्यांत हनुमानाच्या बुद्धी,श्रद्धा विश्वासाचा प्रत्यय येतो. राम रावण युद्धात महत्वाची भूमिका बजावून सीतामाईला मुक्त करण्यात रामाला हनुमानाने खूप मोठी मदत केली.
हनुमान म्हणजे दास्य भक्तीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. जळी,स्थळी,काष्ठी ,पाषाणी ते रामालाच पहात होते. त्यांच्या हृदयांत ,मनात राम,नी रामनामच होते. सीतेने हनुमानाला एक मोत्यांची माळ भेटस्वरूप दिली होती. त्यांतील प्रत्येक मणी फोडून त्यांत रामाला शोधले होते. फाडलेल्या हृदयांत राम सीता स्थानापन्न आहेत असा फोटो आपण नेहमी पहातो.याचा अर्थ, हनुमानाच्या हृदयांत फक्त रामच आहेत.अन्य कांहीं नाहीं .केवढी ही अनन्य भक्ती! हनुमानाला आपण नेहमी रामाच्या चरणांशी बसलेलो पहातो. मारूती रामरूप झाले पण राम चरणाशीच बसले .किती ही दास्य भक्ती! दास्य भक्ती शिकावी ती हनुमाना कडूनच! स्वामींची एकही आज्ञा खाली पडू दिली नाही. दास्यभक्तीचे ,हनुमान एक आदर्श उदाहरण आहे. हनुमानाशिवाय रामायण पूर्णच होऊ शकत नाही.

सामर्थ्यशाली हनुमान चिरंजीव आहेत ,अमर आहेत. राजा केसरी व अंजनीचे पुत्र आहेत पण अध्यात्मिक पालक वायुदेव आहेत . वायुदेवांनी हनुमानाच्या जन्मावेळी सहाय्य केले होते म्हणून पवनसुत आहे.
मंगळवार शनिवार हे त्यांचे दिवस मानले जातात. त्यांचा वर्ण लाल केशरी आहे. सीतामाई सिंदूर लावत असतांना हनुमानाने विचारले का लावता? सीतामाई उत्तरल्या हे लावल्याने रामरायास प्रिय होतो. प्रभुस प्रिय व्हावे म्हणून तेव्हापासून हनुमंत अंगभर लाल शेंदरी रंग लावायला लागले. देवाजवळ रहायला मिळावे,प्रभुस प्रिय व्हावे यासाठी! केवढी ही प्रभुविषयी ओढ, भक्ती!

मारूती चिरंजीव असल्यामुळे महाभारतातही भीमाची नी त्यांची एक कथा आहे. भीम सहत्रदल कमळांच्या शोधात गंधमादन पर्वतावर असलेल्या जंगलात जातात. भीमाचे गर्वहरण करण्यासाठी हनुमंत भीमाच्या मार्गावर पहुडतात.‌भीम उठायला सांगतो तेव्हा म्हातारपणामुळे उठता येत नाही शेपटी उचलून दे,असे सांगतात. भीमाला शेपटी उचलता येत नाही नी अशात-रेने शक्तीशाली भीमाचे गर्वहरण होते. हनुमानाच्या शक्तीची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही म्हणून त्यांना अतुलितबलधामा म्हटले आहे.

हनुमान अमर आहेत. ते नेहमी भ्रमण करीत असतात. घराच्या दारासमोर श्रीराम असे रांगोळीने काढले तर हनुमानाची दृष्टी त्यावर पडू शकते.नी ते आपल्यावर प्रसन्न होऊ शकतात कारण श्रीरामाशिवाय अन्य त्यांना काहीही प्रिय नाही.

श्रीरामांचे अवतार कार्य संपल्यावर मृत्यु त्यांना घ्यायला आला. पण शक्तीशाली हनुमान तेथे असल्याने काही करू शकत नव्हता. रामाने हे ओळखून हातातली अंगठी,मुद्रिका खाली पाडली,ती थेट पाताळात गेली ती आणावयास हनुमानाला आज्ञा केली. हनुमानाने तत्काळ आज्ञापालन केले .पाताळात पोहचले तोवर यमाने कार्यभार उरकला होता. हे पाहून हनुमानाने विलाप केला.‌मै मूर्ख कैसे समज न पाया! हा विलाप पाहून हृदयांत कालवाकालव झाल्याशिवाय रहात नाही.‌ स्वामीपासून दुरावणे म्हणजे काय ते विलापावरून. समजते.‌
.
स्वातंत्र्य हवे असेल तर शक्तीशाली होणे,सामर्थ्यवान असणे आवश्यक आहे.‌रामदास स्वामींनी भारतभर भ्रमण केले नि लोकांची दयनीय अवस्था पाहिली तेव्हा गुलामी, पारतंत्र्यातून मुक्त व्हायचे असेल तर शक्तीशाली, धैर्यशाली होणे आवश्यक आहे. म्हणून रामदास स्वामींनी मारूतीच्या मंदिरांची स्थापना केली व शक्तीची ,मारूतीची उपासना करायला शिकविले.‌
आजच्या काळातही मारूती या शक्तीदेवतेची उपासना आवश्यक आहे. देश -राष्ट्र अस्त्र शस्त्रांनी सज्ज असेल
सशक्त असेल; तर कोणीही त्याकडे डोळा वाकडा करून पहाणार नाही; नी हनुमंता सारखी, शक्ती बरोबरच बुद्धीचीही जोड मिळाली तर देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही.‌हनुमंतासारखी स्वामिनिष्ठा,देशाप्रती अशी निष्ठा- राष्ट्रनिष्ठा ठेवली तर देशाला प्रगतीपथावर अग्रेसर करण्यास वेळ लागणार नाही.
म्हणूनच आजच्या काळातही हनुमंत,हनुमान, केसरी नंदन, रामभक्त, स्वामी भक्त,मारूती रायाचे पूजन अर्चन केले जाते.प्रेरणा घेतली जाते.‌शक्ती, बुद्धीची उर्जा मिळविली जाते.‌

श्रीराम भक्त,रामनिष्ठ, शौर्य,शक्ती,बुद्धी, धैर्य ,संयमीमूर्ती हनुमानाला आमचे कोटी कोटी
प्रणाम!🙏🙏🙏.

सौ.मंजिरी मुकुंद अनसिंगकर नागपूर.
मो नं 7020757854

प्रतिक्रिया व्यक्त करा