*कोकण मराठी साहित्य परिषदेचे सन्मा सदस्य कवी विजयकुमार शिंदे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वसंत आला*
वसंत आला, वसंत आला नवीन पल्लवी भरास आली
आम्रवनातून कुहूकुहू मंजुळ गीत कोकिळा गाऊ लागली
मोदीत झाली सृष्टी सारी ऋतुराजाच्या आगमनाने
मरगळलेपण झटकून अपुले समीर वाहे चैतन्याने
पुन्हा पुन्हा हे नभ धरतीची करी याचना प्रीतीसाठी
मोहरते तन, मोहरते मन लाजुनिया चूर झाली धरती
ऋतुराज हा भासे मजला जणू गोकुळचा कृष्णमुरारी
प्रेमाची शिकवण देण्यास्तव अवतरतो तो असा भूवरी
असाच यावा शिशिरानंतर संजीवक हा वसंतराणा
उन्मादाचा, चैतन्याचा, बहराचा घेऊनी नजराणा
— विजयकुमार शिंदे
कणकवली