आंबा-काजू बागायती जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान…
आसोली-वडखोल सड्यावर लागलेल्या भीषण आगीत आंबा-काजू बागायतींचे सुमारे लाखोंचे नुकसान झाले आहे.ही आग आज भर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास लागली. दरम्यान ग्रामस्थांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात थोडक्यात यश आले आहे. मात्र आग लागलेले क्षेत्र मोठे असल्यामुळे अजूनही काही ठिकाणी विस्तव पेटत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.तर ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आसोली गावातील वडखोल- धनगरवाडी सडा परिसरात आज दुपारी अचानक अग्नितांडव पेटला.दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात सुका चारा असल्यामुळे ही आग पुढे पुढे पसरत गेली.तर या आगीने मुख्य ठिकाणांसह पाल,फणसखोल, मातोंड आदी जंगल परिसराला विळखा घातला. याबाबतची माहिती मिळताच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेत. आग आटोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले.मात्र दुपारची वेळ असल्यामुळे आगीचा भडका आणखीन उडत होता.अखेर उशिरा काही प्रमाणात आटोक्यात आणण्यात यश आले. तर काही ठिकाणी अजूनही विस्तव पेटत आहे.यात मोठ्या प्रमाणात आंबा-काजू बागायतीसह सागवानी झाडांचे नुकसान झाले आहे.तर ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वेगवेगळ्या संकटाला सामोरे जाणारा शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे.अशा परिस्थितीत नैसर्गिक व अनैसर्गिक पद्धतीने उद्भवणार्या संकटांना त्याला तोंड द्यावे लागत आहे. आंबा-काजू मोसम जवळाला असतानाच आणि नुकतेच हातातोंडाशी येत असलेली पिक या आगीत जळून खाक झाल्यामुळे संबंधित शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या परिस्थितीची पाहणी करून शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.