You are currently viewing आठवण

आठवण

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आठवण*

* * 〰️〰️〰️〰️ *

* एकांती मज तुझीच आठवण येता

गाज बघ त्या सागराचीच ऐकू येते

 

अंतरी कल्लोळ कल्लोळ भावनांचा

वादळ तुझ्या स्मृतींचे उरी घोंगावते

 

निवांत माहोल सारा जीवास छळतो

उंचउंच या लाटावरती नभ कोसळते

 

आजही रेतीत भास तव पाऊलांचा

मनास वाटते छुमछुम धावत तू येते

 

स्मरता आज बकुळ , चाफा , मोगरा

आसमंत सारे सारेच गंधाळूनी जाते

 

एकांती मज तुझीच आठवण येता

गाज बघ त्या सागराचीच ऐकू येते

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

*

*©️वि.ग.सातपुते ( भावकवी )*

📞 *(9766544908)*

🙏

 

विरह हा जीवनाचा स्थायीभाव आहे.मनुष्य या जगात जन्म घेतो तेव्हापासून अनेक व्यक्ती त्याच्या जवळ येऊ लागतात.कैक नाती तो आपलीशी करतो.काही रक्ताची काही जोडलेली.जन्मापासून मृत्युपर्यंत असे ऋणानुबंध जोडले जातात जपले जातात. हे चक्र अव्याहत सुरुच राहते.काही अतिशय जवळची प्रेमाची माणसे कधीतरी काही कारणाने लांब जातात तर काहींना काळ आपल्यापासून दूर नेतो.जन्म मरण मिलन विरह हे जगात सदैव घडत राहते घडत राहणार..

आदरणीय विगसा अप्पांची ही कविता विरहाचा अनुभव आपल्या शब्दांतून मांडते.एकांतात आपल्या सखीची,प्रियेची आठवण म्हणजे अथांग सागर…दूरवर पसरलेला.त्याच्या खोलीला जसा अंत नाही तसाच आठवणींना अंत नाही.या अनंत आठवणी कधी हळुवार सागर लाटांसारख्या शीतल असतात तर कधी त्या हृदयावर आदळतात.त्यांच्या समवेत प्रियकराला दूर दूर वेगळ्या दुनियेत नेतात.प्रेम असेच असते,आठवणी अशाच असतात.कधी घोंगावत येणारे वादळ तर कधी पाकळीवरचं दवं.

विरह अंतरी दाटून आला कि मन विद्रोह करुन उठते,भावनांचा कल्लोळ माजतो.अशी वादळे मनाला बरेच वेळा थोपवता येत नाहीत.भावनांच्या अनिवार लाटांवर लाटा उसळतात नि हळव्या स्मृती पुनः पुनः साद घालू लागतात.

श्री. वि.ग. सातपुते अप्पा या कवितेतून आईला साद घालत आहेत असा ही आभास होतो.मातृ दैवत हे जगात निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक.आईच्या हृदयात प्रेमाचा सागर असतो.

*एकांती मज तुझीच आठवण येता*

हे म्हणताना ते सागराचा पैलतीर गाठलेल्या आपल्या आईचे स्मरण करतात.त्या सागराची गाज ओळखीची असली तरी ही अनोळखी व मन कातर करणारी असते.भावनांची वादळे थोपवून धरताना गत स्मृतींची आवर्तने सुरुच असतात.ही जीवघेणी शांतता अगदी नकोशी वाटते आणि हा विरह मनाला छिन्न विछिन्न करत राहतो.

*उंच उंच या लाटावरती नभ कोसळते*

ही ओळ अतिशय सुंदर व भावपूर्ण आहे.शब्दांचा भावार्थ हा आहे कि मनात भावनांच्या लाटांवर लाटा कोसळत असतात अन् तेव्हाच आठवांचे घन बरसतात आणि जणू आभाळच कोसळते.

अविरत अश्रुधारा बरसत असताना मनाला जराशी शांतता लाभते पण तो फक्त आभास असतो जो *जीवास छळतो*.

रेतीत किंवा वाळवंटात नेहमीच मृगजळाचा भास होतो.इथे विगसा म्हणतात विरहाच्या विस्तीर्ण वाळवंटात तुझ्या पाऊलखुणा ही नाहीत .काळ पुढे जाताना बरीच वाताहत करुन गेला आहे.

तरीही तुझ्या मोहक हृद्य आठवणी जेव्हा हृदयाची तार छेडतात तेव्हा पावला पावलांवर मला तुझाच भास होते.वाटते आत्यंतिक ओढीने तू धावत येऊन तू मला बिलगली आहेस.मन मोगरा झाले आहे.चाफा अलवार उमलत आहे नि बकुळीचा गंध आसमंतात पसरला आहे.आज बकुळी चाफा मोगरा..आठवणींची फुले वेचताना यांचा दरवळ आसमंत गंधाळतो व तन मन ही गंधित होत जाते.

या कवितेतून आदरणीय *विगसा* अप्पा कवितेच्या विरहात कवीच्या मनोव्यथेचे वर्णन करतात.कविता ही कवीची प्रिय सखी.एकांतात जेव्हा तिची आठवण येऊ लागते मनात सागर लाटांची गाज ऐकू येते.कविता आकार घेत असताना अंतर्मनात विचारांचा, भावनांचा कल्लोळ उठत असतो.

ह्या नीरव शांततेत मन कल्पनेच्या उंच उंच भराऱ्या घेऊ लागते ,तेव्हाच शब्द घन बरसतात.

कविता काय आहे.. भास आभासांचा खेळ.सत्य व कल्पनेचा मिलाफ होताना कविता *छुमछुम धावत* येते.शब्दांना आकार येतो अन् कवितेचा साक्षात्कार होतो.कविता ही जणू कविचे अपत्य.तिला पाहताना ,*बकुळ चाफा मोगरा* यासम शब्दफुले वेचताना कवि त्या शब्द गंधात हरवून जातो.जशी ही रचना कविला आनंदित करते तसेच तिच्या स्मरणाने आसमंत गंधित होतो ,रसिकांना ही ती अपार आनंद देऊन जाते.

 

सौ. गौरी चिंतामणी काळे

प्रतिक्रिया व्यक्त करा