केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या आणि उज्ज्वला योजना लाभार्थींच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठाच फटका बसला आहे. या निर्णयामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना आता प्रत्येक गॅस सिलिंडरमागे 550 रुपये मोजावे लागणार आहेत. तर सर्वसामान्य गॅस ग्राहकांनाही 50 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. सध्या सर्वसामान्यांसाठीच्या गॅस सिलिंडरची किंमत 800 रुपये ते 820 रुपये इतकी आहे. या दरात 50 रुपयांची वाढ केल्यामुळे आता घरगुती सिलिंडरसाठी ग्राहकांना 850 ते 870 रुपये मोजावे लागतील.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सोमवारी सायंकाळी दरवाढीसंबंधी माहिती दिली. सरकारी अधिसूचनेनुसार, नवीन किमती आज मध्यरात्रीपासून म्हणजेच 8 एप्रिलपासून लागू होत आहेत. या वाढलेल्या किमती सामान्य आणि अनुदानित दोन्ही श्रेणीतील ग्राहकांना लागू असतील. यापूर्वी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी 2 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली होती. याचा फटका थेट ग्राहकांना बसणार नसला तरी घरगुती गॅस सिलिंडर दरात झालेल्या वाढीचा बोजा सर्व देशवासियांना सहन करावा लागणार आहे. सर्वसामान्य ग्राहकांसोबतच उज्ज्वला योजनेअंतर्गत उपलब्ध असलेला सिलिंडरही आता 50 रुपयांनी वाढला आहे.
केंद्र सरकारने ही दरवाढ करताना एक अप्रत्यक्ष दिलासा सर्वसामान्यांना दिला असून ही दरवाढ प्रदीर्घ काळासाठी नसल्याचे संकेत दिले आहेत. दर दोन आठवड्यांच्या नंतर स्थितीचा आढावा घेण्यात येणार असून स्थिती अनुकूल असल्यास ही दरवाढ मागेही घेतली जाऊ शकते, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.