You are currently viewing “याचे मला समाधान आहे”…

“याचे मला समाधान आहे”…

“याचे मला समाधान आहे”…

अँड. नकुल पार्सेकर.

व्यवस्थेमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात, आणि या व्यवस्थेचे बळी ठरतात सर्वसामान्य माणूस. दुर्दैवाने या व्यवस्थे विरोधात लढणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस रोडावत चाललीय. घरात बसून बौद्धिक देणारे फक्त सूचना करतात.दिनांक २४ मार्च रोजी आरोग्याच्या आणि इतर सामाजिक समस्यांसाठी सातत्याने धडपड करणारे सावंतवाडी शहरातील दोन संवेदनशील युवक सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व रक्तदाता संघटनेचे श्री देव्या सूर्याजी यांनी सावंतवाडी कुटीर रुग्णालयाच्या अनेक प्रलंबित समस्या बाबत आंदोलन छेडले. सामाजिक प्रश्र्नासाठी आवाज उठवणाऱ्या या युवकांना प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी झाले पाहिजे म्हणून मी या आंदोलनात सक्रिय झालो. माझ्या सोबत डॉ. जयेंद्र परुळेकर, अँड. निंबाळकर वगैरे मंडळी होती. रुग्णांच्या गैरसोयी संदर्भात अनेक विषय होते ज्याचा समाचार डॉ. परूळेकर वगैरे मंडळीना योग्य शब्दात घेतला.
तत्पूर्वी माझ्याशी या आरोग्य यंत्रणेत कार्यरत असणाऱ्या एकूण ९ सुरक्षा रक्षकांनी संपर्क साधून त्यांचे तब्बल सहा महिन्याचे मानधन शकल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची होणारी ससेहोलपट सांगितली होती. हाच विषय मी या आंदोलनात लावून धरला. संबंधित यंञणेच्या अधिकाऱ्यांशी बोललो आणि हातावर पोट असणाऱ्या या असंघटित कंञाटी कामगारांची व्यथा मांडली. आज त्या कंञाटी कामगारांचा मला फोन आला, म्हणाले, “साहेब, धन्यवाद.. तुम्ही आमची व्यथा ऐरणीवर आणली आणि आज आमचा सहा महिन्यांचा पगार झाला”.. माझ्यामुळे झाले असा दावा मी करत नाही.. हे खरे श्रेय रवी जाधव व देव्याचे आहे.. त्यांनी या आंदोलनाचा घाट घातला म्हणून मला त्या कंञाटी सुरक्षा रक्षकांच्या थकीत पगाराबाबत आग्रह धरुन विषय मांडता आला. इतर विषयाबाबत नेहमीप्रमाणे चुना लावून बोळवण करण्यात आली हा भाग वेगळा. पण सुरक्षा रक्षकांची चूल पेटली याचा आनंद आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा