भूमिपुत्रांच्या प्रखर विरोधानंतरही मोजणी ; सासोली येथील प्रकार
जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
अधिकाऱ्यांची उलट सुलट उत्तरे ; अन् वातावरण झाले संतप्त
दोडामार्ग :
सासोली येथील सामाईक मिळकतीत आजच्या पोटहिस्सा जमीन मोजणीला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला, ग्रामस्थांनी भूमिअभिलेख अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृतीवर बोट ठेवत प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांच्या प्रश्नावर भूमिअभिलेखचे अधिकारी निरुत्तर झाले तरीही पोलिस बळाचा वापर करत मोजणी करण्यात आली.
मोजणीतील एका सर्व्हे क्रमांकामध्ये नाव नसलेल्या व्यक्तीच्या नावे नोटीस बजावून मोजणी करीत असल्याचा प्रकार ग्रामस्थांनी उघड करत भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला. अन्य सहहिस्सेदारांचा विरोध असतानाही पोलिसांच्या बंदोबस्तात मोजणी करणे बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला. सासोली जमिनीतील येथील सामाईक पोटहिस्सा मोजणी होणार असल्याच्या नोटिसा भूमिअभिलेखने बजावल्या होत्या; मात्र याला सहहिस्सेदारांनी हरकती घेत विरोध दर्शविला होता. ही मोजणी स्थगित करण्याच्या मागणीसाठी उपोषणही सुरू केले; मात्र पोलिस बंदोबस्तात भूमी अभिलेख अधिकारी व संबंधित कंपनीचे कर्मचारी तसेच या जमिनीचे कुलमुखत्यार पत्र असलेल्या संबंधितांनी सकाळीच त्या जागेत हजेरी लावली. यावेळी मोजणीला विरोध असलेल्या सहहिस्सेदारांनी तेथे येत हरकती नोंदविल्या.
मूळ जमीनधारकांनी तसे लेखी पत्र भूमिअभिलेख उपअधीक्षक विनायक ठाकरे यांच्याकडे देत त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. आमच्या या सामाईक जमिनीतील पोट मोजणीला आम्हा सर्व सहहिस्सेदारांनी विरोध दर्शविला असताना केवळ एकाच्या अर्जानुसार तुम्ही कशी काय मोजणी करू शकता, असा संतप्त सवाल त्यांनी केला. यावेळी भूमिअभिलेख जमाबंदी आयुक्त आणि संचालक एस. चोकलिंगम् यांच्या परिपत्रकानुसार मोजणी होत असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले. यावेळी एकूण किती क्षेत्राची मोजणी होणार आहे आणि ज्या व्यक्तीसाठी आपण मोजणी करत आहात त्याचे सात-बारावर नाव आहे का, त्या संबंधित व्यक्तीचे एकूण किती क्षेत्र त्या सात-बारात आहेत, असे विचारताच श्री. ठाकरे यांनी समर्पक उत्तर दिले नसल्याचा आरोप करत जमीनधारक आक्रमक झाले.
सात-बारावरील सहहिस्सेदारांची हरकत आहे. त्यामुळे मोजणी थांबवावी, अशी मागणी केली. ज्या १३ सर्वे क्रमांकमधील पोटमोजणी करायची होती त्यातील १९९ व २०१ या दोन सर्वे क्रमांकांमध्ये संबंधित व्यक्तीचे नाव नसतानाही त्याच्या नावे पोट मोजणीचे पत्र काढण्यात आले. याचा जाब विचारला असता ठाकरे निरुत्तर झाले. त्यांनी सात-बारा चाळून पाहिला असता खरोखरच त्या व्यक्तीचे नाव त्यावर नसल्याचे निष्पन्न झाले. हा घोटाळा असून अधिकारी चुकीचे काम करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अर्जदाराचे सात-बारावर नाव नसलेल्या सर्व्हे नंबरची मोजणी कोणत्या नियमानुसार करू शकता, असा संतप्त सवाल केला. आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या, असा संताप व्यक्त करताच आपण नियमानुसार काम करत असल्याचे सांगितले. हे काम नियमानुसार नसून पैशाच्या व दडपशाहीच्या जोरावर करीत असल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला.
मूळ जमीनदार हरकतधारकांनी मोजणीला हस्तक्षेप केल्यानंतर काही वेळातच ठाकरे शिवसेनेचे कणकवली मतदारसंघ जिल्हाप्रमुख संदेश पारकर घटनास्थळी दाखल झाले. ही मोजणी कोणत्या नियमानुसार करता, या सामाईक क्षेत्राचे पोटहिस्सा किंवा घडेवाटपच झाले नसेल तर आपणास प्रथम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ८५ (२) नुसार दिवाणी आदेश घेणे अपेक्षित आहे. तुम्ही नियमात आहात तर दिवाणी न्यायालयाचा आपण घेतलेला आदेश दाखवा, अशी मागणी पारकर यांनी ठाकरे यांच्याकडे केली. याबाबत न्यायालयात खटला प्रलंबित आहे. प्रकरण लवकरच निकाली लागणार आहे, असे ते यावर म्हणाले. पारकर यांनी सहहिस्सेदारांची हरकत असताना, दिवाणी आदेश नसताना चाललेला हा मोजणीचा प्रकारचुकीचा असल्याचा आरोप केला; परंतु मोजणीबाबत कायदेशीर पत्र असून, ही प्रक्रिया कायद्याला धरूनच आहे. त्यामुळे ही मोजणी होणारच, असेसांगत पोलिस बळाचा वापर करून मोजणीला सुरुवात केली.
यावेळी महेश शंकर ठाकूर, संदेश पांडुरंग भुजबळ, अनिल रामा परब, बापू भिवा सावंत, रवींद्र कृष्णा देसाई, यशवंत गोपाळ देसाई, अर्चना अशोक गवस, कृष्णा यशवंत गवस, हेमंत दुलाजी परब, महादेव दत्ताराम ठाकूर, आनंद रमा ठाकूर, लक्ष्मण गोविंद ठाकूर, अर्जुन बापू सावंत, संतोष भिवा सावंत, दीपक गोपीकांत गवस तसेच व संबंधित जमीनधारकाने मोजणीची मागणी केलेल्यांच्यावतीने कुलअखत्यारघारक व कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
*मी, उत्तर देण्यास बांधिल नाही !*
संदेश पारकर व ग्रामस्थांनी केलेले आरोप तसेच सर्व्हे क्रमांकामध्ये ज्या व्यक्तीचे नाव नाही, त्या व्यक्तीच्या कोणत्या जमिनीचा सव्र्व्हे केला जाणार याबाबत भूमिउपअधीक्षक विनायक ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता मी आता उत्तर देणार नाही. मी उत्तर देण्यास बांधिल नाही, असे स्पष्ट केले.
*उलट ग्रामस्थांना वेठीस धरल्याचा आरोप*
पोटमोजणी संदर्भात भूमिअभिलेखकडून सहहिस्सेदारांना मोजणी होणार असल्याचे नोटिसा बजावल्या होत्या; मात्र, आमच्यावर अन्याय होत असून, पोलिस यंत्रणेने मात्र आमचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. मोजणी वेळी विरोध न करता व कायदा सुव्यवस्था बिघडू नये, अशा उलट नोटिसा आम्हा स्थानिक मूळ जमीनमालकांना बजावल्या आहेत. स्थानिकांवर अन्याय झाला तरीदेखील महसूल विभाग, प्रशासन अधिकारी आम्हा स्थानिकांना अशाप्रकारे वेठीस धरीत आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला.