विद्यामंदिर कणकवली मध्ये ‘इंग्रजी भाषा दिवस’ साजरा.
कणकवली :
इंग्रजी भाषा ही जगाकडे बघण्याची खिडकी आहे. आज मोबाईल, संगणक, इंटरनेट सर्वच क्षेत्रात इंग्रजी भाषा व्यापली आहे. त्यामुळे आजच्या पिढीने इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत करणे ही काळाची गरज बनली आहे, असे विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली चे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे यांनी इंग्रजी भाषा दिवस कार्यक्रमात अध्यक्षिय भाषणात सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी इंग्रजी मधून विविध कविता, गाणी, भाषणे, गोष्टी तसेच नाटिका सादर केल्या. इंग्रजी भाषेची आवड लागावी, इंग्रजी पुस्तकांचे वाचन वाढावे, तसेच इंग्रजीतून बोलण्यास संधी मिळावी यासाठी वर्षभरात घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, भाषण स्पर्धा, पोस्टर्स मेकिंग स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदनही विद्यार्थ्यांनीच इंग्रजी मधून केले.
इंग्रजी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यामागे प्रशालेच्या इंग्रजी विषय शिक्षिका संगीता साटम, वैभवी हरमलकर, वेदांती तायशेटे आणि विलास ठाकूर यांनी विशेष मेहनत घेतली.