*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी वि. ग. सातपुते लिखित कवितेचे श्रीकांत दिवशीकर यांनी केलेले रसग्रहण*
*मोक्षदा*
🎍🎍🎍
खेळी दैवाच्याच अनाहत
भाळी रेखीतो तो भगवंत
पराधीनता तीच जन्माची
न मिळे स्पदनांनाही उसंत…..
मीच निरागसी मी निर्मोही
सुखसंवेदनांची नाही खंत
कर्मफलाच्याच संगे रमतो
स्मरतो सदासर्वदा भगवंत…..
अंतरी अंकुर तो वैराग्याचा
आत्मरंगले होते गंध चंदनी
गंगाजलीच मोक्षदा कृतार्थी
आत्मा शोधीतो आदिअनंत…..
🎍🎍🎍🎍🎍🎍🎍🎍🎍
*31 मार्च 2025 ( 31 )*
*©️वि.ग.सातपुते. ( भावकवी )*
*प्रिय बालमित्र , विगसा*
दोन शब्द.
आपल्या अनेक रचनेवर मी अनेकदा लिहिले आहेच. प्रत्येक रचनेची गोडी ही कृतार्थी भावनां व्यक्त करते हे माझे आजपर्यंतचे अवलोकन आहे. आध्यात्मिक काव्यावर व्यक्त होणे हे तसे फार अवघड असते .कवितेमध्ये गूढार्थ असतो , कोमल शब्दभावनांची गुंफण आणि त्यातला नेमका आशय हुडकणे हे समुद्राच्या तळाशी जाऊन मोती हुडकण्यासारखे असते . सात्विक विचारांची गहनता शोधण्यासाठी खूप खोलवर जाऊन अभ्यासात्मक शोध घ्यावा लागतो .
खरे सांगू आपली प्रतिभा ही परमेश्वराचे मिळालेले अनमोल दान असते .आणि दानात मिळालेले फार जपून ठेवावे लागते . त्यातही हे ईश्वरी असलेने तो भगवंताचा कृपावंती प्रसाद असतो त्यामुळे त्याची जपवणूक जिवापाड करावी लागते .
संस्कारित घराण्यात जन्मलेल्या व्यक्ती आयुष्यभर त्या विश्वनीयंत्याच्या सेवेत आपले संपूर्ण आयुष्य मनोभावे व्यतीत करतात .संसार आणि परमार्थ दोन्हीची सांगड यशस्वीपणे घालत सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून आयुष्य कृतार्थपणे समर्पित करतात .
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात जीवनाचे सत्य त्यांना उमगलेले असते .सुख दुःख ,अडचणी संकटे , मान सन्मान , कौतुक मानहानी सारे सारे धीरोदात्तपणे त्यांनी सोसलेले असते
.जीवनाची ,विचाराची एक भक्कम बैठक तयार झालेली असते .उत्तम संस्कारामुळे आपले कर्म ,कर्तव्य याचा त्यांना कधीच विसर पडत नाही .या साऱ्या नंतर एक तटस्थपणे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तयार होतो आणि पूर्वीच्या काळी जसे वयाच्या ७५ वर्षापर्यंत वानप्रस्थाश्रम होता आणि त्यानंतर संन्यास आश्रम असे .तसे संसारी माणूस या वयात एक विरक्तपण अनुभवत असतो .प्रतिभावंत सुद्धा याला अपवाद नसतात .
कवीला असे कृतार्थपणे जगलेले आयुष्य एकाकी वाटू लागते .आध्यात्मिक तपश्चर्या असल्यामुळे मन वैराग्याच्या विचारत नकळत गुरफटून जातो .कवितेमधून हीच अवस्था आणि तिचे वर्णन सांगण्याचा प्रयत्न मला कवितेमधून दिसतो आहे .आपले जगणे केवळ आपले निमित्तमात्र असते , सारी सूत्रे त्या ईश्वराच्या हाती असतात हा भाव दृढ होत राहतो आणि शेवटी तोच कर्ता आणि करविता आहे हे मान्य करून , त्यानेच आपल्या भाळी लिहिलेले तोच घडवून आणतो हे अंतिम सत्य मान्य करावे लागते .
म्हणूनच कवी म्हणतो
*खेळी दैवाच्याच अनाहत*
*भाळी रेखीतो तो भगवंत*
प्रतिभा परमेश्वराकडून मिळते म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक रहावे …
आयुष्याच्या उत्तर कालखंडात त्या विश्वनीयंत्याच्या साऱ्या अनाहत खेळी स्मरतात आणि आपली पराधीनता कळते …
साऱ्या सुखदुःखाची जाणीव मग बोथट होते आणि कर्मावरची दृढता अधिक बळकट होते ..
अश्यावेळी आठवतो तो फक्त भगवंत तोच तारणहार आहे ही श्रद्धा वाढीस लागते ….
आणि नंतर अंतरातील वैराग्याचा अंकुर जागा होतो जो संपूर्ण आत्मरंग चंदना सारखा सुगंधित करून जातो ….
सरतेशेवटी चाहूल मोक्षाची लागते आणि पवित्र तीर्थक्षेत्रीच अशी कृतार्थी मोक्षदा लाभावी ही प्रार्थना मनातून आवळली जाते .तृप्त मनाने जगलेले आयुष्य तरीपण अंतरात्मा अनंताच्या यात्रेकडे डोळे लावून वाट पहात असतो .
शेवटी साऱ्या दैवी खेळी त्या अनाहत भगवंताच्या, तोच भाळी रेखाटतो ही जाणीव होते आणि .आत्मसाक्षात्कार घडतो .
आपण समवयस्क बालमित्र दोघांचीही घराणी अध्यात्मिक आणि संस्कारित आणि आज आपण जे काही घडलो आहोत ते केवळ आपल्या आईवडीलांच्या आणि गुरुजनांच्या निर्मोही संस्कारामुळे….
हा आनंद शब्दात वर्णन करता येत नाही..
एक सुंदर आध्यात्मिक बैठक असलेले काव्य रसिकांना आकलन होणे थोडे कठीण असले तरी अंतिमतः त्यातला गूढार्थ समजला तर नक्कीच रसिकांना एक वेगळा आनंद देऊन जाईल असा मला विश्वास वाटतो .
*श्रीकांत दिवशीकर*
©️®️
*सातारा*