*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अवकाळी पाऊस*
आलं अवकाळी पाणी
कसं आभाळ फाटलं
झालं पीक नासधूस
माझं काळीज तुटलं
गहु हरभरा कसा
भुईवरती झोपला
खट्याळ वाऱ्याने त्याला
मातीतंच निजवला
भाजीपाला सगळा
पाण्याने गेला कुजून
हळद कपाशीही गेली
गेला लसुण सडून
गाईच्या गोठ्यात पाणी
वासरे सारी भिजली
थंडी वाऱ्याच्या भीतीने
कुशी आईच्या शिरली
सोसाट्याच्या वाऱ्यापाई
गेलं छप्पर उडुन
बाळंतीण पोरं आता
कशी ठेवु मी झाकुन
उघड्यावर प्रपंच
भीती जीवा लागे पार
सरकार मायबाप
आता तुमचा आधार
शेतकऱ्याचं सपान
गेलं अर्ध्यात रुसुन
सावकार डोळ्यापुढं
बसे तगादा घेवुन
*शीला पाटील. चांदवड.*