You are currently viewing दोन घडींचा प्रवास

दोन घडींचा प्रवास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम कथा*

 

*दोन घडींचा प्रवास*

 

वाऱ्याच्या वेगाने रेलगाडी धावत होती..एक एक गाव मागे सोडत, क्षणात आपले क्षणात परके करत अधूनमधून शिट्टीचा आवाज काढत गंतव्यस्थान शोधत होती..जवळपास दोन दिवसांचा दूरचा प्रवास आणि तो सुद्धा एकट्याने करायचा म्हणजे आपल्या बोलूनही न वळणाऱ्या तोंडाला जमायचं कसं..? हाच प्रश्न..! बाजूला दोन चार माणसे होती पण, ती त्यांच्या भाषेत बोलायची. ती भाषा आपल्याला ऐकून माहिती असली तरी समजण्याच्या पलीकडची..! केरळच्या एर्नाकुलम स्टेशन वरून सुटलेली गाडी तासाभराने एका मोठ्याशा स्टेशनवर थांबली आणि समोरच्या खिडकीपाशी इतका वेळ रिकामी असलेल्या जागेवर एक तिशीतली महिला येऊन बसली. अविचल शांत चेहरा.. कुठल्यातरी गूढ विचारात मग्न असल्यासारखी ती खिडकीतून शून्य नजरेने आपल्यापासून क्षणात दुरावणारी दुनिया पाहत होती. कदाचित माझ्यासारखीच तिचीही अवस्था असावी, तिलाही बाजूच्या कुणाची भाषा समजत नसावी..

 

एवढ्यात माझ्या फोनवर रिंग वाजली…

“ती येते आणिक जाते, येताना कधी कळ्या आणिते..”

क्षणाचाही विलंब न करता तिची मान माझ्याकडे वळली.. माझं फोनवरचं बोलणं ती नजर चोरत ऐकू लागली..पण, मी तिच्याकडे न पाहिल्यासारखे करत बराचवेळ फोनवर गप्पा मारत राहिलो. एकटाच असल्याने तेव्हा फोनवरचा संवाद हाच माझा विरंगुळा आणि फोन माझा मित्र बनला होता. काही मिनिटांनी फोन ठेवल्यावर ती थोडीशी चलबिचल झाल्यासारखी वाटली. माझ्याकडे पाहून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतेय असं जाणवू लागलं. ती पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहू लागली तेव्हा शेवटी न राहवून मी विचारलं..”यू वॉन्ट टू से समथिंग..?”

 

ती म्हणाली, “नाही, तसं काही खास नाही..”

क्षणभर मी अवाक् झालो…आणि तिच्या बोलण्याकडे पाहत राहिलो…

 

ती पुढे म्हणाली..,”तुम्ही मराठीत बोललात त्यामुळे आपलं असं कुणीतरी म्हणजे आपली भाषा बोलणारं कुणीतरी सोबत असल्याने जरा बरं वाटलं..”

 

तिने मराठीत संवाद साधलेला ऐकून मलाही फार बरं वाटलंच पण.., माझ्या कानशिलात कुणीतरी सनकन मारल्याची जाणीव झाली.

.. आणि निदान परक्या व्यक्तीशी संवाद सुरू करताना तरी प्रथम आपल्याच बोलीभाषेतून करावा ही शिकवण तिथे मिळाली.

 

मातीच्या कपातून चहा, केळीच्या पानातून नाश्ता येत होता.. सकाळी टीटी/एमएम (तुझा तू माझा मी) झाल्यावर हळूहळू अधूनमधून संवाद सुरू झाले. दुपारचे जेवण सुद्धा एकमेकांना विचारूनच घेतलं. आपली भाषा बाजूच्या कुणालाच समजत नव्हती. त्यामुळे दोघांच्यात गप्पाही रंगल्या. तुम्ही कुठे गेलेलात..? साऊथला कामाला असता का..? इथून माझ्या घरी कोण कोण असतात..? इथपर्यंत विचारपूस करून छान गप्पांचा प्रवास झाला..आता ती जुनी ओळख असल्यासारखी बोलू लागलेली..

पण., तिच्या कुटुंबाचा विषय आला आणि इतका वेळ हसत, मनमोकळे बोलणारी ती थोडी गंभीर झाली. खिडकीतून बाहेर पाहून नजर टाळू लागली..नकळत तिचे पापणकाठ ओलावले.

मी पुन्हा विषय न काढण्याच्या इराद्याने शांत राहिलो. पण…,

पापण्यांमधून ओघळू पाहणारे अश्रू तिने बोटांच्या सहाय्याने अलगद झेलून खिडकीतून दूर फेकून दिले अन् श्रावणात नभांगणावर आलेली काळ्या ढगांची छाया अचानक दूर व्हावी आणि रविराजाच्या कोवळ्या किरणांनी झाडापेडांच्या कवडशा मधून धरणीवर डोकावून पहावे तशी ती पुन्हा चेहऱ्यावर उसने हसू आणून बोलून गेली..

 

“माफ करा… जखमेवरची खपली निघाली त्यामुळे थोडसं वाईट वाटलं इतकंच…

सर्वजण आहेत माझ्याही घरी.. फक्त मी सोडून…”

 

तिच्या बोलण्याचा मला काहीही अर्थ लागला नाही.. मी म्हटलं, ‘मला समजलं नाही..’

ती गालातल्या गालात हसली अन् सांगू लागली…

 

“आम्ही प्रेमविवाह केलेला घरातून पळून जाऊन… त्यामुळे माझं माहेर कायमचंच तुटलं…

तरीही दोघांचं छान चाललेलं..सासरच्यांनी सुद्धा मला आपलं मानलेलं..पण..,”

ती मध्येच अडखळली…

जरासा आवंढा गिळत शांत झाली.. पुन्हा तिचे डोळे पाणावले.. रेलगाडी हलत होती तसं पापण्यांवरचं पाणी नकळत गालांवर ओघळत होतं..

 

“मग पुढे काय झालं..?”

माझ्या प्रश्नाने ती भानावर आली..

पुन्हा भरल्या डोळ्यांनी गालावरच्या आसवांना दूर सारत ती बोलली..

“एका वादळाने सारं उध्वस्त झालं..

मी गरोदर होते अन् सातवा महिना सुरू होता. हॉस्पिटल मधून तपासणी करून येत असतानाच एका रस्ता अपघातात जागच्या जागी माझा नवरा गेला, मी सुद्धा जखमी झाले. मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि दरम्यानच्या काळात माझ्या पोटातील मूल सुद्धा दगावलं…”

 

हे सर्व ऐकून आता मात्र माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं..

देवाने एखाद्याला दुःख सुद्धा देताना किती द्यावं..? असा विचार करत असतानाच ती पुढे बोलती झाली..

“त्यांचा मुलगा गेला याचं दुःख सासरच्यांना सर्वात जास्त झालं होतं पण.., माझं मूल पोटात गेलं याचं त्यांना भान नाही राहिलं की, माझाही तो नवरा होता, माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल याची त्यांना काहीही फिकीर राहिली नव्हती.. हळूहळू त्यांनी मला घरात असून नसल्यासारखी वागणूक द्यायला सुरुवात केली..फक्त हाकलून द्यायचं तेवढंच शिल्लक ठेवलेलं.. माझा स्वाभिमान मला अशा परिस्थितीत तिथे राहायला परवानगी देत नव्हता.. आई वडिलांकडे जाईन तर माझा नवरा गेल्याचं कळवूनही कोणी मला भेटायला सोडाच, साधा फोन सुद्धा केला नव्हता.

 

मी फार अस्वस्थ होते, काय करावे काही सुचत नव्हते.. सासू सासऱ्यांना नमस्कार करून पहाटे पहाटेच मी घर सोडलं..

त्यांनी कुठे जातेस..? असाही साधा प्रश्न केला नाही की जाऊ नकोस असा एक शब्द सुद्धा बोलले नाहीत..”

ती पुन्हा किंचितशी हसली अन् बोलली..

“आता जगते आहे जगाला आनंदी असल्याचं खोटं खोटं भासवत.. भोगलेल्या सर्व दुःखांना उराशी कवटाळत..

कारण, चूक माझीच होती..”

 

मी निःशब्द झालो…

बराच वेळ दोघंही शांत राहिलो.. मग म्हणालो..

“पण, त्यापेक्षा तुम्ही आई वडिलांकडे जाऊन तर बघायचं होतं ना..!

चूक कबूल करून माफी मागायची, पोटच्या पोरीला टाकणार होते का ते..?”

 

माझ्या म्हणण्यावर ती हसली अन् म्हणाली… “दोघंही डॉक्टर आहेत, सुसंस्कृत आणि स्वाभिमानी..! सर्व सुख पायाशी लोळत असताना अतिव सुखाच्या हव्यासाने घर आणि त्यांना लाथाडून आलेले…”

कंठ दाटून येत ती बोलली..”कदाचित आता त्यांच्यासाठी मी मेले…”

सायंकाळची क्षितिजावर चढलेली लाली आता रात्रीच्या काळोखात मिसळून पार अंधारमय झाली होती.. जसं तिचं आयुष्य झालेलं…

तिची चूक होतीच..जन्मदात्या आईबापाला दुःखात लोटून आपलं सुख शोधायला निघालेली ती.. पुढे सुखाची हिरवळ दिसत असली तरी त्या हरित तृणांच्या गर्भात दडलेला चिखल तिला दिसला नव्हता..अन् त्याच चिखलाने आज ती पूर्णपणे माखलेली.. चिखल धुवून पुसून बाहेर पडली तरी त्याचे डाग मात्र तिच्या तनामनावर स्पष्टपणे दिसत होते. किंबहुना तिला आपण कर्दमलेल्या कपड्यात असल्याचं जाणवत होतं आणि तेच दुःख तिला सतत बोचत राहिलेलं..

 

नकळत अनोळखी असूनही क्षणभर तिच्यासाठी माझ्या नयन पाकळ्या ओलावल्या.. मनाला खोलवर वेदना झाल्या.. अन् कॉलेजच्या दिवसात प्रेमात झालेली माझी फसवणूक मलाच क्षुल्लक वाटू लागली..

 

एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर परतत रात्र सरून गेली.. पहाटेचा गार वारा अंगाला झोंबू लागला.. एक नवी हसरी सकाळ माझे नेत्रांजण उघडण्याची वाट पाहू लागली..

ती केव्हाची उठून ताजीतवानी होऊन बसलेली..

मी उठलो… “सुप्रभात…” म्हणत तिला हसत हसत सकाळच्या शुभेच्छा दिल्या.. तासाभरात माझं गंतव्यस्थान येणार म्हणून मी सुद्धा सर्व आवरून बसलो…

“आता कुठे निघालात..?”

रात्रीचं बोलणं पुढे सुरू ठेवत आलेला माझा प्रश्न..!

ती बोलली..

“रक्ताचं नाही पण, माणुसकीचं नातं जोडलेल्या माणसांकडे.. ज्यांनी सासर सोडल्यावर काही दिवस का होईना आसरा आणि आधार दोन्ही दिलं.. घरकाम करण्यासाठी त्यांच्या आसऱ्याला आलेले पण.., मी उच्चशिक्षित असल्याचं समजल्यावर माझ्यासाठी हर एक प्रयत्न करून केंद्र सरकारची नोकरी मिळवून दिली.. आज त्यांच्यामुळेच मी स्वतःच्या पायावर उभी आहे.. नोकरी निमित्त दूर असले तरी त्यांचे ऋण आहेत, जे आयुष्यभर मी माझ्या कपाळावर घेऊन जगण्यात धन्यता मानेन…”

“परमेश्वराने सर्वकाही तुमच्यापासून हिसकावून घेतलं तरी त्या दोघांच्या रूपात तो तुमच्या पाठीशी उभा राहिला…

माझं एक सांगणं लक्षात ठेवा..

परमेश्वर कुणालाही एकटं पाडत नाही, आज ना उद्या साथ देणारं कुणी ना कुणी तुमच्याही आयुष्यात येईल..” एवढं बोलून मी माझं सामान उचललं अन् उठलो..

तोच ती हळूच पुटपुटली…”आता कोणाची सोबत नकोच आहे..आयुष्य चांगल्या आठवणींवर जगायचं, जशी दुसऱ्यांनी मला मदत केली तशी अडलेल्यांना मदत करायची..आणि.. ”

थोडसं थांबतच बोलली…

…आयुष्य ओझं वाटलं की त्याग करायचा सर्वार्थाचा..सर्वार्थाने..”

 

माझं उतरण्याचं स्थानक आलं.. गाडीचा वेग मंदावला.. हळूहळू गाडी फलाटावर उभी राहिली..

“काळजी घ्या…”

असे म्हणत चेहऱ्यावर उसने हसू आणत तिचा निरोप आणि माझं सामान घेऊन मी खाली उतरलो.

संसार मोडला, दुःखाने पोळून निघाली तरीही तिचा ताठ असलेला कणा पाहून मला कवी कुसुमाग्रजांच्या कणा कवितेच्या ओळी आठवल्या…

“मोडला जरी संसार तरी, मोडला नाही कणा..

पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा…”

पाठमोरे जाणाऱ्या रेलगाडीतून तिचा “बाय बाय” करत हलणारा हात पाहून जड अंतःकरणाने हात हलवत तिला निरोप दिला..

ती कोण…? कुठली..? हे काहीही न जाणता तिच्या जिद्दीला सलाम करून.. नकळत तिचे दुःख उधार घेऊन…

 

दोन घडींचा प्रवास अपुला

बघता बघता सरून जातो..

अनोळखी कुणी उगाच कधी

ओळखीची मग करून जातो..

असंच काहीसं पुटपुटत मी पुढच्या प्रवासाला चालू लागलो…

 

©दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी, सिंधुदुर्ग

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा