You are currently viewing फोर्टिफाईड तांदळाबाबत जिल्हाभरात जनजागृती

फोर्टिफाईड तांदळाबाबत जिल्हाभरात जनजागृती

फोर्टिफाईड तांदळाबाबत जिल्हाभरात जनजागृती

सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जि.मा.का.) :-

जिल्हा पुरवठा कार्यालय व तहसिल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोर्टिफाईड अर्थात गुणसंवर्धित तांदळाबाबत जनजागृती करण्याचे प्रशिक्षण संपन्न झाले, असल्याची माहिती  प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी आरती देसाई यांनी दिली आहे.

या सत्रामध्ये पॉवर पॉईंट सादरीकरण व माहितीपटांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना फोर्टिफाईड तांदळाची माहिती देण्यात आली. प्रशिक्षणावेळी फोर्टिफाईड तांदळाचे फायदे, त्याचे पोषणमूल्य व कुपोषण, ॲनिमिया निवारणासाठी त्याचे महत्त्व यावर माहिती देण्यात आली. फोर्टिफाईड तांदळाबाबत जनतेमध्ये असलेल्या गैरसमजुती दूर करून जनतेमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याच्या हेतूने जनजागृती करण्यात आली.

भारत सरकारने फोर्टिफाईड तांदूळ (गुणसंवर्धित तांदूळ) सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जनतेला उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.  या तांदळामध्ये लोह, फोलिक ॲसिड व व्हिटामिन ए, व्हिटामिन बी 12 व इतर जीवनसत्वे असल्याने तो अत्यंत फायदेशीर आहे. मुलांमध्ये पोषक तत्वांची कमतरता आणि महिलांमध्ये अशक्तपणा लक्षात घेऊन शासकीय योजनांच्या माध्यमातून गरजूंना फोर्टिफाईड तांदूळ उपलब्ध करून दिला जातो.

कसा तयार होतो फोर्टिफाइड तांदूळ?

¡  पहिले कोरडे तांदूळ दळून पीठ बनवले जाते.

¡  त्यात थोडे पाणी टाकून सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळली जातात.

¡  नंतर यंत्राच्या सहाय्याने हे मिश्रण वाळवून तांदळाचा आकार दिला जातो.

¡  याला फोर्टिफाइड राइस कर्नल (FRK) म्हणतात.

¡  FRK सामान्य तांदळामध्ये मिसळला जातो.

¡  FSSAI नुसार, 1 किलो तांदळात 10 ग्रॅम फोर्टिफाइड तांदूळ मिसळला जातो.

 

फोर्टिफाइड राइसचे फायदे? 

 

¡  फोर्टिफाइड तांदूळ पोषक तत्वांनी समृद्ध असतो.

¡  लोह- शरीरात लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते त्यामुळे अशक्तपणा कमी करण्यास मदत होते.

¡  फॉलिक अॅसिड– नवीन पेशी बनवते आणि गर्भाच्या विकासास मदत करते.

¡  जीवनसत्व बी १२- लाल रक्तपेशींचे प्रमाण वाढवते आणि चेतासंस्थेचे कार्य सामान्यपणे करण्यास मदत करते.

या मोहिम जिल्हाधिकारी  सिंधुदुर्ग व जिल्हा पुरवठा अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली  राबविण्यात आलेली असून, या मोहीमेस तालुका स्तरावरील तहसिलदार, पुरवठा निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक, स्वस्त धान्य दुकानदार यांनी सक्रिय सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा