अंमली पदार्थांच्या तस्करीत पोलिसांचे लागेबांधे असल्याचा संशय -धीरज परब
कुडाळ
अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत मनसेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग पोलिसांना यापुर्वीच कल्पना देण्यात आली होती. मात्र तरीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या तस्करीशी पोलिसांचे लागेबांधे आहेत का? असा सवाल मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान जिल्ह्यात सुरू असलेल्या अंमली पदार्थाच्या विक्री बाबत आपल्याकडे अधिक माहिती असून अधिक तपासासाठी ती माहिती आपण गोवा नार्कोटीक्स विभागाला देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
कुडाळ एमआयडीसी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुका प्रमुख हेमंत जाधव, जगन्नाथ गावडे, यतीन माजगावकर, गजानन राऊळ, प्रथमेश धुरी, विजय जांभळे आधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. परब म्हणाले, लाखो आणि करोडो रुपयांचे अंमली पदार्थ सिंधुदुर्गमधून गोव्या राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र पोलिसाच्या देखत जाऊन गोव्याचा नॉर्कोटिक्स विभाग पिंगुळीतील संशयितांवर कारवाई करतो आणि ह्या सर्व बातमी मुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव मोठ्या प्रमाणावरती खराब होत चालले आहे. याच विषयाला अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या टीमने संशयित परवेज अली खान त्याच्याबाबत अधिक माहिती घेतली. त्यानुसार त्याचा एमआयडीसीमध्ये एका कंपनीमध्ये सततचा वावर होता आणि त्या वावरासंदर्भात आम्ही कुडाळ पोलीस स्टेशनला २ सप्टेंबरला लेखी पत्र देऊन पोलिसांना माहिती दिली होती. या कंपनीचा प्लॉट नंबर, त्या कंपनीचे रजिस्टर असणारे नाव हे या पत्रामध्ये नमूद केलेले होते.
काही चुकीच्या गोष्टी त्याठिकाणी घडत आहेत, तुम्ही त्या ठिकाणी लक्ष द्या, हे पोलिसांच्या आम्ही निदर्शनास आणून दिले होते. फक्त पोलिसांबरोबर चर्चा करत असताना आम्ही ड्रग्ज गांजा याचा उल्लेख केला होता. पत्रामध्ये तो उल्लेख नव्हता. पण आमच्या त्या पत्राला कुडाळ पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही. तब्बल एक महिन्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा केला त्यावेळी चौकशी चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आमच्या सततच्या पाठपुराव्यानंतर एक साधारण एक दोन महिन्यानंतर आम्हाला पत्र देण्यात आले की आम्ही आता पर्यन्त यांची चौकशी केली आणि तिथे सगळे अलबेल आहे. असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्या शिवाय पोलिसांनी उलट आमच्याकडे त्या संशयितांची चौकशी केली. तो कोणती गाडी वापरतो किंवा काय आणखीन त्याच्याविषयीची माहिती द्या. पण ह्या गोष्टी सांगण्या इतपत तेवढी आमच्याकडे माहिती उपलब्ध नव्हती. पण जी आम्हाला संशयास्पद माहिती मिळाली ती सजग नागरिक म्हणून, एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून लोकहितासाठी आम्ही ती पोलिसांकडे दिली असल्याचे श्री. परब यांनी सांगितले.
संबंधित कंपनीचा जो मॅनेजर आहे त्याची आणि संशयित आरोपी यांची रोज बैठक होते. ते त्या ठिकाणी रोज त्या कंपनीमध्ये येतात. रोज त्यांची उठबस असते. एमआयडीसी मध्ये दीडशे दोनशे कंपन्या आहेत. परंतु त्याच एका विशिष्ट प्लॉट वरती आणि त्याच एका कंपनीमध्ये यांचा वावर असल्याबाबतची माहिती पोलिसांना दिली होती. परंतु आता दोन दिवसापूर्वी जेव्हा गोवा पोलिसांनी २५ लाख रुपयांच्या मुद्देमालासह जेव्हा आरोपीला रंगेहाथ पत्रादेवीला पकडले त्या दिवसापासून पोलीस यंत्रणा कामाला लागली. आम्ही संशय व्यक्त केलेल्या त्या ठिकाणी पण पोलिसांच्या वाऱ्या वाढल्या, आहेत असे श्री. परब म्हणले.आमच्यकडे याबाबत अजून माहिती आहे. ती आम्ही गोवा नार्कोटिक्स विभागाला द्यायचे ठरविले असल्याचे श्री. परब यांनी सांगितले. मात्र याबाबत सिंधुदुर्गच्या पोलीस अधीक्षकांना माहित देणार का, असे विचारले असता त्यांनी उत्तर द्यायचे टाळले. पालकमंत्री यांनी देखील आपले पोलीस अधिकारी कसे वागतात याविषयी त्यांनी शोध घ्यावा असा सल्ला देखील त्यांनी दिला.
संशयित आरोपी परवेज अली खान हा मूळ उत्तर प्रदेशचा आहे. काही दिवस तो वेंगुर्ले तालुक्यात होता. नंतर कोरोना काळात तो पिंगुळीत आला. तिथे त्याने एके ठिकाणी आश्रय घेतला. तो मूळचा सिंधुदुर्गमधील नाही, याकडे श्री. परब यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर आज गोव्याच्या प्रसार माध्यमांमध्ये मध्ये सिंधुदुर्ग आणि कुडाळ अंमली पदार्थांचे केंद्र म्हणून उल्लेख केला जात आहे. शिवाय तत्कालीन पोलीस निरीक्षकांना नागरिकांनी पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती, याकडे सुद्धा गोव्याच्या प्रसार माध्यमामध्ये बातम्या दाखवल्या जात आहेत, याकडे सुद्धा त्यानी लक्ष वेधले. सिंधुदुर्गातल्या लोकांना गोव्यामध्ये एक वेगळा नजरेने भविष्यात पाहिलं जाणार आहे. आज सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे या उद्योग व्यवसायांवरती पण परिणाम होऊ शकतो . नवयुवकांमध्ये व्यसनाधनीता भविष्यात वाढू शकते. अशी भीती देखील श्री. परब यांनी व्यक्त करून, कुडाळ पोलिसांचे यामध्ये लागेबांधे असू शकतात अशी शक्यता सुद्धा व्यक्त केली आहे.