महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालयामध्ये त्यांचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ.श्रीकर परदेशी हे संपूर्ण सनदी अधिकाऱ्यांमध्ये एक पारदर्शक सनदी अधिकारी म्हणून परिचित आहेत. मुंबईच्या मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयातच आपण मुख्य सचिव श्री विकास खारगे प्रधान सचिव डॉ. अश्विनी भिडे यांच्या सोबतीला मुख्यमंत्र्यांनी ते उपमुख्यमंत्री असतानाच दिल्लीच्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या पी एम ओ कार्यालयात कार्यरत असणारे डॉ. श्रीकर परदेशी यांना मुंबईला मंत्रालयात आपल्या कार्यालयात सचिव म्हणून बोलावून घेतले.
डॉ. श्रीकर परदेशी यांचा माझा पहिला परिचय ते जेव्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस ही परीक्षा पास झाले तेव्हा झाला. आम्ही 2000 या वर्षापासून दरवर्षी आय ए एस झालेल्या अधिकाऱ्यांचा अमरावतीला भव्य सत्कार घेतो. त्या सत्कारासाठी मी निमंत्रण देण्यासाठी डॉ.श्रीकर परदेशी यांच्याकडे पुणे येथे गेलो होतो. सोबत माझे सहकारी प्राध्यापक मुकेश सरदार हे होते. डॉ.श्रीकर परदेशी यांचा आम्ही फोन नंबर मिळवला. पत्ता मिळवला. मला आठवते तो पुण्याच्या गुलटेकडीचा भाग असावा. त्यांच्या घराच्या दिशेने आमची वाटचाल सुरू झाली.
श्रीकर परदेशी ज्या भागात राहत होते तो भाग सुखवस्तू निश्चितच नव्हता. मध्यमवर्गीय भाग होता. आम्ही परदेशी सरांकडे जेव्हा पोहचलो तेव्हा श्रीमती विद्युत वरखेडकर (ज्या आता अपर जिल्हाधिकारी आहेत) त्या आधीच पोचल्या होत्या. एका खुर्चीवर श्रीकर सर दुसऱ्या खुर्चीवर त्यांच्या मातोश्री तिसऱ्या खुर्चीवर विद्युत मॅडम बसल्या होत्या. फक्त एकच खुर्ची खाली होती. आणि आम्ही येणारे दोघेजण होतो. श्रीकरसरांच्या मातोश्रींनी लगेच खुर्ची खाली करून दिली आणि त्या चक्क जमिनीवर बसल्या. मी त्यांना खूप विनंती केली. पण त्या म्हणाल्या की तुम्ही माझ्या मुलाचे अभिनंदन करायला अमरावतीवरून इतक्या दुरून आले आहेत. तुम्ही खुर्चीवरच बसा.
मी श्रीकरसरांचे अभिनंदन केले आणि त्यांना अमरावतीचे निमंत्रण दिले. यावेळी जमणार नाही पण भविष्यात मी नक्कीच तुमच्या अकादमीला भेट देईल असे त्यांनी कबूल केले. कारणही तसेच होते. सरांना कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिल्लीला जायचे होते. आणि त्यांच्याकडे नुकताच बाळाचा जन्म झाला होता. पुढे सरांनी आपला शब्द पाळला आणि ते आठवणीने अमरावतीला आले आणि आमच्या मुलांना त्यांनी मार्गदर्शन केले. बोले तैसा चाले …त्याची वंदावी पाऊले.
श्रीकरसरांबाबत खूप काही सांगण्यासारखे आहे. ते यवतमाळला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेला कार्यरत होते. जिल्हा परिषदेमध्ये जागा निघाल्या. उमेदवार इकडे तिकडे भटकू लागले. याच्या त्याच्या ओळखीने आपले जमते का असे प्रत्येक जण अंदाज घेत होता. पण श्रीकरसरांनी कोणाची डाळ शिजू दिली नाही. त्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकार क्षेत्रातील जागेवर मोठा मंडप टाकला. सगळे परीक्षार्थी तिथं बसवले. तिथेच पेपर काढण्यात आला. तिथेच मुलांना देण्यात आला. तिथेच तपासण्यात आला आणि तिथेच निकाल लावण्यात आला. साहेबांनी सगळ्यांचे मोबाईल बंद करण्यास सांगितले होते. सायंकाळी ज्या मुलांचे सिलेक्शन झाले त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. मला जे कळले त्यावरून मी अमरावती वरून यवतमाळला त्यांच्या भेटीला गेलो. सरळ साहेबांच्या जिल्हा परिषद निवासस्थानी पोहोचलो. परदेशी साहेबांचे अभिनंदन केले. साहेब म्हणाले काठोळे सर ज्या मुलांचे सिलेक्शन झाले नाही त्यांनी देखील माझे अभिनंदन केले इतके पारदर्शक काम केल्याबद्दल. एका मुलाचे आलेले पत्र देखील त्यांनी मला दाखवले. निघताना साहेब आम्हाला फाटकापर्यंत सोडायला आले. एक आयएएस ऑफिसर इतका विनम्र पारदर्शक असू शकतो त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ. श्रीकर परदेशी. महाराष्ट्रात खूप परीक्षा झाल्या पण यवतमाळला जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असताना श्रीकर परदेशी यांनी ही जी पारदर्शी दर्शवली तशी महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव म्हणावी लागेल.
साहेब अकोल्याला जिल्हाधिकारी होते. तेव्हा महाराष्ट्रात अकोला जिल्हा प्रत्येक बाबतीत प्रथम क्रमांकावर होता. जिल्हाधिकारी असलेल्या डॉ श्रीकर परदेशींच्या कामाचे कौतुक होत होते. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण हे होते. त्यांनी नांदेडला इतका चांगला जिल्हाधिकारी असावा व नांदेड जिल्ह्याचा विकास जलद गतीने व्हावा यासाठी त्यांनी श्रीकर परदेशीची आपल्या नांदेडला बदली केली नांदेडला चांगले उपक्रम राबवण्यासाठी. साहेबांची नांदेडला झालेली बदली रद्द व्हावी यासाठी अकोल्याला नागरिकांचा मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा मंडप टाकण्यात आला. साहेबांची बदली रद्द होण्यासाठी आंदोलन सुरू झाले. एका जिल्हाधिकाऱ्याची झालेली बदली रद्द करण्यासाठी मोर्चा निघाल्याची आणि धरणे आंदोलन सुरू झाल्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही एकमेव घटना आहे.
श्रीकर परदेशींनी नांदेडला जिल्हाधिकारी असताना एक चांगला पायंडा सुरू केला आणि त्याचे अनुकरण संपूर्ण महाराष्ट्राने केले पहिला. तो म्हणजे त्यांनी दर महिन्याच्या पाच तारखेला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा सुरू केली. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे. त्या काळात विद्यार्थ्यांना पुरेशी व नेमके मार्गदर्शन मिळत नव्हते. त्यासाठी त्यांनी नांदेडचे शंकरराव चव्हाण सभागृह निवडले. आणि दर महिन्याला पाच तारखेला दोन तासांची स्पर्धा परीक्षा कार्यशाळा सुरू झाली. मलाही एकदा त्यांनी त्या कार्यक्रमात बोलावले. कार्यक्रमाला इतकी गर्दी असायची की मुलांना स्टेजवर बसवावे लागत होते. तो त्यांचा उपक्रम इतका गाजला की महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हाधिकाऱ्यांनी तो उचलून धरला. अकोला चंद्रपूर अमरावती सारख्या शहरांमध्ये दर महिन्याला एक कार्यशाळा होत गेली. नांदेडला श्रीकर परदेशी यांनी ग्रंथालय आणि अभ्यासिका स्थापन करून स्पर्धा परीक्षेच्या मुलांना एक दालन मोकळे करून दिले. त्यासाठी त्यांनी शासनाच्या निधीच्या सदुपयोग करून चांगले ग्रंथालय व चांगले अभ्यासिका तयार केली ती आजही कायम आहे.
महाराष्ट्रात कॉपीमुक्त अभियान सुरू केले ते श्रीकर परदेशींनीच. आज महाराष्ट्र बऱ्याच अंशी कॉपीमुक्त झाला आहे. पण हे अभियान सुरू करण्यापूर्वी सगळीकडे सावळागोंधळ होता. काही काही सेंटर तर कॉफीसाठी सुप्रसिद्ध होते. शाळेसमोर मंडप टाकून परीक्षा घ्यायला जायच्या इतकी काही सुप्रसिद्ध सेंटरवर गर्दी असायची. तिथे सर्रास कॉपी चालायची. श्रीकर परदेशी सरांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी लगेच कॉफीमुक्त अभियान नांदेड जिल्ह्यात सुरू केले. चांगले नियोजन केले. त्यांची आखणी इतके सुंदर होती की ज्या शाळेचे निकाल शंभर टक्के लागायचे ते 20 टक्केही लागले नाहीत. साहेबांनी पुढाकार घेऊन दूध ते दूध पाणी ते पाणी हे सिद्ध करून दाखवले. महाराष्ट्र शासनाला देखील हा उपक्रम आवडला आणि शासनाने प्रत्येक जिल्ह्यात हे अभियान राबवण्याचे ठरवले. आज देखील या कॉफी मुक्त अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान होत आहे. पण या कामी परदेशीं साहेबांनी जो पुढाकार घेतला तो महत्त्वाचा आहे.
साहेबांनी वेळोवेळी जे काम केले त्या वेळी महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला. अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा सन्मान केला. त्यांच्या कार्याची महती दिल्लीला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात पोहोचली. पंतप्रधानांनी त्यांना दिलेल्या बोलावून घेतले. त्यांच्या पारदर्शक कर्तव्यदक्ष कर्तव्यनिष्ठ कामाची दखल घेण्यात आली.
महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकर परदेशी सरांना दिल्लीवरून आपल्या कार्यालयात सचिव म्हणून आणले. त्यांनी श्रीकर परदेशी यांच्या कामाचा अनुभव घेतला होता असा कर्तव्यदष्य दक्ष व पारदर्शक अधिकारी आपल्या कार्यालयात असला तर कार्यालयाला गतिमानता येईल या विश्वासाने त्यांनी परदेशी साहेबांना दिल्लीवरून मुंबईला मंत्रालयात आणले. पुढे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील साहेबांनी आपल्या सचिव पदी त्यांचे नियुक्ती कायम ठेवली.
डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी समाजासमोर स्वतःचा जो पारदर्शक चेहरा ठेवला आहे तो निश्चितच महत्त्वाच्या आहे. सर्वसामान्य कुटुंबातील हा माणूस आज प्रशासनामध्ये स्वतःच्या पारदर्शकपणामुळे तसेच कर्तव्यनिष्ठतेमुळे लोकप्रिय तर आहेत पण जनमानसामध्येही या माणसाने स्वतःच्या अभूतपूर्व कर्तृत्वामुळे मानाचे स्थान मिळवले आहे.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003