*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अवती भवती खेळ*
————————————
खूरचाफ्याची फुले रेशमी
पाने अलगद दुमडून घ्यावी
देठाना त्या गुंफुन घेता
सुंदर अंगठी बनून जावी.
नाजूक, सुंदर पिवळी बिट्टी
खोचून द्यावी कानावरती
लपाछपीचा खेळ खेळता
संध्यारंगीं खुलून यावी
हिरवी हिरवी पिंपळ पाने
सहज पिपाणी बनून जाते
घरभर त्याला वाजत जाता
आनंदाने सारे न्हाते
करवंदाची फळे टपोरी
खेळ रंगतो ” राजा राणी ”
दुपारच्या उन्हा मधे मग
झोपाळाही गातो गाणी
सुपारीची इवली बोन्डे
सागरगोटे बनून जाती
अख्खई,दुख्खई,तिख्खई
माजघरात रंगून जाती
उन्हातल्या संध्याकाळी
बोन्ड सावरीचे फुटून येते
त्याच्या मागे धावत जाता
असीम आनंदे भिजून जाते
अवती भवती खेळ केव्हढे
झाडापाना मधून होते
अजून त्यांना आठवताना
बालपणाशी घेऊन जाते.
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे