*गणेश क्रीडा मंडळाची २३ वर्षांची निस्वार्थ समाजसेवेची परंपरा*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
गणेश क्रीडा मंडळ आणि ओम काळभैरव चॅरिटेबल फाऊंडेशन, गॅलेक्सी हॉस्पीटल, वडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी जयंती निमित्त भव्य मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन शनिवार, दिनांक २९ मार्च २०२५ रोजी टाटा मिल्स कंपाऊंड, परेल येथे करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ई.सी.जी., डायबिटीस, ब्लड प्रेशर, नेत्र चिकित्सा तसेच हृदयरोग, नेत्ररोग, मूत्रपिंड आणि ऑर्थोपेडीक विभागातील तपासण्या करण्यात आल्या. तसेच या शिबिरात गरजू रुग्णांसाठी मोफत औषध वितरणही करण्यात आले. ओम काळभैरव चॅरिटेबल फाऊंडेशन गेल्या ६ वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत असून आतापर्यंत १०० हून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित करून ११,००० हून अधिक नागरिकांना मदतीचा हात दिला आहे.
शिबिरात सुप्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. मिनी संगनेरिया यांनी महिलांना कर्करोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर निदानाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करून तपासणी केली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वैशाली शेलार, विजय कक्कड यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच ओम काळभैरव चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र वोरा, खजिनदार कांतीलाल वाढेल आणि समाजसेवक देवेंद्र मादेसर यांच्या प्रयत्नांसह गॅलेक्सी हॉस्पीटल, वडाळा येथील तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा बहुमूल्य सहभाग लाभला.
प्रतिक्षा पंकज फाटक, वैशाली साहा, अनुराधा शेंडे, जयवंती भोसले तसेच गणेश क्रीडा मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी गणेश क्रीडा मंडळ, टाटा मिल्स कंपाऊंड, परेल यांचे प्रमुख पदाधिकारी देवेंद्र केळुस्कर, कमलाकर केळुस्कर, पंकज फाटक, सुनिल अडसूळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. गणेश क्रीडा मंडळाच्या २३ वर्षांच्या सामाजिक कार्याचा हा उपक्रम यंदाही उत्साहात पार पडला. रहिवाशांचा मिळालेला भरभरून प्रतिसाद हीच या सेवेची खरी पावती आहे.