*के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा.प्रशांत शिरुडे लिखित अप्रतिम लेख*
*गौरवशाली इतिहासाची गुढी*
चैत्र मासातील ऋतुराज वसंत म्हणजे लावण्याचा बहर, याच मधुमासात फुलातून फळातून मधुरस ओसंडत असतो. सोनवर्खिले झुंबर लेऊन बहावा बहरतो, नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे मनोहरी रूप आपल्या नयनांना सुखावते. याच वृक्षवर्णांच्या आडून कोकिळांचे गुंजनही आपले कान तृप्त करते अशा सुवर्ण रूपरसगंधमय वातावरणाने भारलेल्या वसंत ऋतुतील आनंदाची गुढी उभारत चैत्रमासाचा नववर्षाचा शुभदिन उगवतो तो म्हणजे गुढीपाडवा! निसर्गाचा हा आनंदानुभव प्रत्येक मराठी माणसाच्या उत्साहाची कारंजे घेऊन थुई-थुई नाचू लागतो आणि मग गुढीपाडव्या निमित्ताने गावागावांमध्ये भव्य प्रभात फेऱ्या, स्वागतयात्रा, शोभायात्रा निघतात. त्यातील महाराष्ट्रातील संस्कृतीचं दर्शन, लेझीम-कवायतीची बालगोपाळांची पथके, ढोल-ताशे-नगारे यांची पथके, ऐतिहासिक, पौराणिक, प्रासंगिक प्रसंगांनी सजवलेले रथ, भारतीय संस्कृतीचे व परंपरेचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रम या शोभायात्रांमध्ये दाखविले जातात. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा. म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदा. संवत्सर म्हणजे वर्ष आणि संवत्सराच्या प्रारंभाचा दिवस म्हणजे गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा हा पहिला दिवस. यालाच चैत्रातला पाडवा म्हणतात. वसंत ऋतूची सुरुवातही याच दिवशी होते. अशा अनेक अर्थाने हा एक तेजस्वी दिवस आहे.
गुढीपाडवा म्हणजे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. यातील गुढी हे विजयाचे प्रतीक आहे. म्हणूनच आपण त्यादिवशी दागदागिने, सोने खरेदी करतो, नवीन चांगले संकल्प करतो, जीवनात नावीन्याची सुरुवात करतो, नवीन व्यवसायाची सुरुवात करतो, नवीन वास्तुत प्रवेश करतो.
गुढीपाडव्या बद्दल परंपरेनुसार अनेक कथा लोकप्रचलित आहेत. याच दिवशी भगवान ब्रम्हदेवाने विश्वाची उत्पत्ती केली. म्हणून गुढीला ब्रह्म ध्वज असेही म्हटले जाते.
प्रभू श्रीराम दसऱ्याला रावणाचा वध करून सीतामाई व आपल्या अन्य सहकाऱ्यांसह अयोध्येत प्रवेश करतात त्या दिवशी पताका लावून आयोध्या नगरी सजली.
अशाच लोक कथेनुसार भगवान शंकर व पार्वती यांचे लग्न याच दिवशी ठरले.
दुसऱ्या एका किंवदंतीनुसार इंद्र व असुर संघर्षात इंद्राचा पराभव होत असताना तो मदतीसाठी ब्रह्मदेवाकडे जातो. ब्रह्मदेव त्याला विष्णूकडे पाठवतो. विष्णू त्याला एक ध्वज देतो व सांगतो की या ध्वजाच्या सहाय्याने तू विजयी होशील आणि घडतेही असेच. तेव्हापासून तो विजयी ध्वज म्हणून ओळखला जातो. पुढे तो ध्वज इंद्रा कडेच असतो. चेदी देशाचा राजा वसू हा इंद्राला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करतो. इंद्र त्यावर प्रसन्न होतो. त्याला तोच विजयी ध्वज, वैजयंतीमाला आणि विमान देतो. राजा हा ध्वज त्याच्या नगरात उंच एका काठीवर लावतो, त्याला सजवतो, असा हा ध्वज सृजनाचा, नवनिर्मितीचा, आनंदउत्सवाचा प्रतीक बनतो. हा ध्वज म्हणजेच गुढी होय. थोडक्यात ही गुढी म्हणजे विजयाचे प्रतीक.
चैत्र महिना म्हणजे वसंत ऋत या कालखंडामध्ये झाडांची पानगळ झालेली असते थंडी संपलेली असते व झाडांना नवीन पालवी येत असते. म्हणजेच नवनिर्मिती होत असते. गुढीपाडव्याला आपण सकाळी गुढीची विधीवत पूजा केल्यानंतर कडुलिंबाची पानं, सुंठ, धने, जिरे यांची पूड व गूळ किंवा मध यांचे असे सेवन करतो. नववर्षाची सुरुवात कडूलिंबाच्या सेवनाने केल्यामुळे आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. त्याचबरोबर प्रसाद म्हणून देण्यात येणारे पदार्थ हे सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात. या पदार्थांच्या सेवनाने त्या कालखंडातील उष्णतेवर मात करणे सहज शक्य होते.
आपण हिंदू धर्मानुसार देशात २ पाडवा उत्सव साजरे करतो. त्यानुसार इसवीसनच्या ७८ व्या वर्षी शालिवाहन शक संवत्सर म्हणजे गुढीपाडवा याची सुरुवात झाली. विक्रम संवत इसवी सन पूर्व ५७ पासून दिवाळी पाडवा साजरा केला जातो. गुढीपाडवा हा सण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश याशिवाय विदेशामध्ये बाली इंडोनेशिया व मॉरिशसमध्येही साजरा केला जातो.
भारतामध्ये साधारणता १२ व्या शतकात लिहिलेल्या लीळाचरित्र व ज्ञानेश्वरीत आपल्याला गुढीपाडव्याचे उल्लेख दिसतात.
दारी उभारलेली गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.या मराठी नववर्षाचे स्वागत करताना मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येतो. या पार्श्वभूमीवर आपण आपला वैभवशाली इतिहास जाणून घेऊया . मराठी भाषा, मराठी सण, संस्कृती, परंपरा यांच्या अनभिज्ञतेमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. हा उज्वल वारसा आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी त्याचे जतन व संवर्धन करणे आज काळाची गरज आहे.
भाषा बोलणार्यांच्या प्रमाणाचा विचार केला तर मराठी भारतात क्रमांक ३ वर व जगात क्रमांक १० वर सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीत ५४ बोलीभाषा आहेत. घटनेनुसार १९६५ पासून महाराष्ट्र राज्याची देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा आपण राजभाषा म्हणून स्वीकार केला आहे. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या प्रा. रंगनाथ पठारे समितीच्या अथक प्रयत्नाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, अभिजात भाषा म्हणजे ‘वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारकडून दिला जाणारा दर्जा’ अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने भविष्यात त्याचे फायदे दिसतीलच. पण यानिमित्ताने मराठीचा व महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहासही आपण जाणून घेतलाच पाहिजे म्हणून हा लेख प्रपंच.
महाराष्ट्राच्या उगमाचा विचार करता रामायण महाभारता पासून अनेक संदर्भ सापडतात .
रामायणात प्रभू रामचंद्र व सीता माई सध्याच्या नाशिक येथील पंचवटीत राहत होते तर महाभारतातील भगवान श्री कृष्णाची पत्नी रुक्मिणी कौडिन्यपूर राजाची राजकन्या होती. कौडिन्यपूर आताच्या नागपूर जवळ आहे .
नळ दमयंती कथानकातील दमयंती विदर्भ राजाची कन्या असून नळाचा नळदुर्ग किल्ला उस्मानाबादमध्ये आहे.
पण इतिहास दृष्टिकोनातून विचार करता इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात गौतम बुद्धांचा शिष्य मोगलीपुत्त दिस्स याने बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी मराठी प्रदेशात शिष्य पाठविल्याचा संदर्भ सापडतो. त्यानंतरच्या काळात हा प्रदेश मौर्य साम्राज्याचा भाग असल्याचा संदर्भ इतिहासात सापडतो. सम्राट अशोकाच्या काळात महाराष्ट्रातील सोपारा आताचे नालासोपारा या बंदरातून पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया, एडन व कोचीन असा व्यापार चालू असे.
इ.स. पूर्व चे २ रे शतक ते इ स चे २ रे शतक या कालखंडात येथे सातवाहन राजे राज्य करीत होते .हा कालखंड म्हणजे समृद्धीचा, विदेशी व्यापाराचा कालखंड . या कालखंडात दोन समृद्ध ग्रंथ लिहिले गेले ते प्राचीन मराठी प्राकृत भाषेत लिहिले, पहिला ग्रंथ गुनाढ्याचा कथासरित्सागर किंवा बृहत कथासरित्सागर, त्यात वर्णन असलेला मराठी समाज वैभवसंपन्न आहे. दुसरा ग्रंथ सातवाहन राजा हाल ने रचलेली गाथासप्तशती.
या कालखंडात भाषेचे वहन झाले ते शौरसेनी पैशाची चे पुढे मराठी कडे मार्गक्रमण झाले सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी ने इ.स. ७८ मध्ये शालिवाहन शक सुरू केले . सातवाहन राजांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पराक्रमी व प्रगतीशील होते. त्यांनी विंध्य च्या उत्तरेला जाऊन यवन , शक व पल्लव या परकीयांचा पराभव केला, या राजांना ‘त्रीसमुद्रतोय पीतवाहन’ म्हणजे ज्यांच्या घोड्यांनी तिनही समुद्राचे पाणी पिले आहे अशी पदवी होती.
सातवाहनांनंतर महाराष्ट्रात वाकाटकांचे साम्राज्य होते, त्यांची राजधानी विदर्भातील वत्स्यगुल्म म्हणजे आताचे वाशिम. वाकाटक व गुप्तांचा कालखंड एकच इ.स. ४ थे, ५ वे, ६ वे शतक, वाकाटकांनंतर या प्रदेशावर चालुक्यांचे राज्य होते. ७ व्या शतकात भारतात आलेल्या चिनी प्रवासी युवानश्वांग ने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याची गोदावरीच्या काठी असलेल्या त्याच्या प्रतिष्ठान म्हणजे आताचे पैठण नामक राजधानीत भेट घेतल्याचा संदर्भ त्याच्या प्रवासवर्णनात लिहून ठेवला आहे. त्यात तो मराठी माणसाचे वर्णन करताना सांगतो मराठी वृत्तीने प्रामाणिक आहेत, मित्रासाठी जीव देणारे आहेत, शत्रुत्व झाले तर जीव घेणारेही आहेत. वाकाटक, चालुक्य, व राष्ट्रकुट राजांच्या काळात अजिंठा-वेरूळची लेणी तयार झाली.
पुढे ८ व्या शतकात संस्कृत व्याकरणकार उद्योतन सुरी ने आपल्या ‘ कुवलयमाला ‘ या ग्रंथात मराठ्यांचे वर्णन केले आहे.
भारतातील शास्त्रशुद्ध इतिहास लेखन पद्धतीचा पहिला ग्रंथ लिहिणारा १२ व्या शतकातील काश्मिरी पंडित कल्हण ने आपल्या ‘राजतरंगिणी’ ग्रंथात मराठ्यांचा उल्लेख केला आहे .
दक्षिणेत रठीक नावाचा जनसमूह होता या रठीक चे संस्कृतीकरण झाल्यावर राष्ट्रीक असा शब्द तयार झाला त्यातूनच पुढे महाराष्ट्र हा शब्द तयार झाला असे मत अनेक इतिहास लेखकांचे आहे.
अशा या महाराष्ट्रातील मराठीची पहिली अद्याक्षरे सापडतात ती कर्नाटकातील म्हैसूर जवळील श्रवण बेळगोळा येथील वर्धमान महावीरांच्या भव्य पुतळ्याखाली मराठी ची अद्याक्षरे कोरलेली आहेत.
‘श्री चामुंडराये करवियले
गंगाजे सुत्ताले करवियले’
ही मराठीची अद्याक्षरे मोडी लिपीत असून त्या पुतळ्याचे नाव भद्रबाहू आहे.या शिलालेखावर इ.स.९वे शतक असे कोरले आहे.
महाराष्ट्रीय संस्कृती म्हणजे उत्तर व दक्षिण भारतातील संस्कृतीचा मेळ, उदा. उत्तर भारतात गहू जास्त पिकतो, दक्षिण भारतात तांदूळ जास्त पिकतो तर महाराष्ट्रातील ज्वारी, बाजरी सोबत गहू व तांदूळ हा रोजच्या जेवणाचा भाग आहे.
अनेक इतिहास संशोधकांच्या मते मराठी भाषेतील पहिला ग्रंथ विवेकसिंधु असून तो मुकुंदराज यांनी लिहिला ते मराठवाड्यातील अंबेजोगाई येथील आहेत. हा ग्रंथ १२ व्या शतकात लिहिला गेला.
त्यानंतर सुमारे ७५ ते १०० वर्षांनी महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींनी लीळाचरित्र ग्रंथ लिहिला. या ग्रंथात मराठी भौगोलिक आकारा विषयी वर्णन करण्यात आले आहे.
यादव काळात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला. यादवांचे राज्य अनेक अर्थाने शांततेचे, संपन्नतेचे व विकासाचे राज्य होते.या कालखंडात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना केली व त्यातून अवघे विश्वचि माझे घर हे सांगताना त्यांनी आपली जागतिकीकरणाची दृष्टी स्पष्ट केली. इ.स. ७ व्या ८ व्या शतकात आदय शंकराचार्यांनी अद्वैत भक्तीचा मार्ग सांगितला. अद्वैत भक्ती म्हणजेच ईश्वर व माणूस एक रूपच आहे, देव हा भावाचा भुकेला त्याला प्रसन्न करायला कर्मकांडांची आवश्यकता नाही. शंकराचार्य मूळचे केरळातील पेरिया उर्फ पूर्णा नदीच्या काठावरील केरली गावचे. ते ३२ वर्ष जगले त्यांनी पूर्ण भारत भ्रमण केले. त्यांनी मांडलेला विचार निवृत्तीनाथांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांना मिळाला. ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांसाठी अद्वैत भक्तीचा मार्ग सांगितला व वारकरी संप्रदायाची स्थापना केली. पुढे हा विचार ज्ञानेश्वरांचे शिष्य नामदेवांनी उत्तरेत नेला. काशीला नामदेवाचे शिष्य रामानंदांकडून त्यांचे शिष्य संत कबीर यांना हा विचार मिळाला. कबीरांनी तो विचार हिंदीत प्रस्तुत केला .संत नामदेवांनी या विचारांचा प्रचार प्रसार पंजाबमध्ये केला .महाराष्ट्रात संत तुकारामांनी याच विचाराचा विकास केला म्हणूनच म्हणतात
‘ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस’
मराठीची गौरव पताका ज्या जोडगोळीमुळे अभिमानाने डोलते ती हीच ज्ञानबा-तुकोबाची जोडी.
इ.स.१३१० पर्यंत महाराष्ट्रात यादवांचे राज्य होते. यादवांनी ठिकठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण अशी हेमाडपंथी मंदिरे बांधली, याच काळात भास्कराचार्यांनी लीलावती हा गणितावर संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला.
१३२५ ते १५६५ दक्षिण भारतात विजयनगरचे साम्राज्य होते. पण १३ व्या शतका पासून महाराष्ट्रावर इस्लामी आक्रमणे सुरू झाली .अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुघलक, मोगल व सुलतानशाही यांनी १६ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याच मोठ्या भागावर राज्य केले. यादवांच्या अस्तानंतर समाज जागृत व एकसंघ ठेवण्याचे काम संतांनी केले.संतांचे कार्य, यादवांचा इतिहास व छत्रपती शिवरायांची प्रेरणा यातून मराठ्यांनी देशभर साम्राज्य उभे केले.
कितीही संकटे आली, प्रचंड प्रतिकूल परिस्थिती असली तरी मोठी स्वप्ने पाहता येतात व ती सत्यात उतरवता येतात याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज .
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्मिती सोबत भाषा शुद्धीकरणाच्या चळवळीचे बहुमोल कार्य केले. कारण मराठीत मोठ्या प्रमाणात फारसी शब्दांचा वापर होत होता. त्यांनी राज्यव्यवहार कोश निर्माण करताना त्याची संकल्पना त्यांनी विजयनगरच्या साम्राज्य कडून घेतली व विजयनगरच्या साम्राज्याने वेद उपनिषधांमधुन घेतल्याचे पुरावे त्र्यंबक शंकर शेजवलकर या जागतिक दर्जाच्या इतिहासकाराने दाखवून दिले आहे.
स्वराज्याच्या सीमे बद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहून ठेवले आहे’ सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत व पेशावर पासून तंजावर पर्यंत हिंदवी स्वराज्य व्हावे हि तर श्रींची इच्छा’.
जेव्हा मराठे १७५७ ला अटकेपार पोहोचले तेथून रघुनाथरावाने पेशवे नानासाहेबांना पत्राद्वारे कळविले थोरल्या आबासाहेबांनी (छत्रपती शिवाजी महाराजांनी ) दिलेले स्वप्न आपण पूर्णत्वास आणले आहे. महाराष्ट्र नेहमी देशासाठी लढला, पानिपतचे युद्ध केवळ मराठे मराठी सत्तेसाठी नाही लढले दिल्लीची सत्ता पुन्हा परकीयांच्या ताब्यात जात होती ती वाचवण्या साठी लढले.
आज पानिपतच्या आठवणीने ही प्रत्येक मराठी मन सुन्न होते. अब्दाली ही कळून चुकला होता व युद्ध जिंकल्यावर ही परत गेला.
१८१८ ला मराठी सत्तेच्या अस्तानंतर ही इंग्रजांना महाराष्ट्रात सुखासुखी राज्य करता आले नाही. शिवरायांचा वारसा पुढे महाराष्ट्राने सुरू ठेवला .कारण आपण पारतंत्र्यात का गेलो हा विचार तेवढ्याच वेगाने सुरू झाला.आत्मगत चिंतन सुरू झाले. शाळा सुरू झाल्या पाहिजे. इंग्रजी शिक्षण मिळाले पाहिजे. विषमता दूर केली पाहिजे. १८२१ मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण च्या माध्यमातून पहिले वृत्तपत्र सुरू केले. पेशव्यांच्या दरबारी असणारे गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) यांनी आपल्या दोषांचा अभ्यास करत शतपत्रे लिहिली. येथे स्वतःकडे कठोरपणे पाहण्याची मराठी माणसाची वृत्तीच अधोरेखित होताना दिसते .
१८५७ च्या उठावात भाग घेणारे मराठी सेनानी राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांचे स्वप्न एकच होते फिरंग्यांच्या तावडीतून देश मुक्त करू. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेच्या रूपात क्रांतिकारकांचे किंवा भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांच्या रूपात राजकीय सुधारणेचे किंवा फुले-शाहू-आंबेडकरांच्या रुपात समाज व धर्म सुधारणेचेही महाराष्ट्र केंद्रबिंदू ठरले .समाजात सर्व प्रकारची समानता निर्माण व्हावी म्हणून फुले-शाहू-आंबेडकर यांनी जिवाचे रान केले.
आज देशातील प्रत्येक गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे व रस्ता पण आहे. आंबेडकरांनी एकाच वेळी चातुर्वर्ण व्यवस्थेशी लढा दिला, दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संविधान निर्मितीचे अभ्यासपूर्ण कार्य केले.
काँग्रेसची स्थापना मुंबईतच झाली. सुरुवातीस गोपाळ कृष्ण गोखले व नंतर लोकमान्य टिळक यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चतुसूत्री ची घोषणा टिळकांनी केली.
हिंदू राष्ट्रवादाचा विचार मांडणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे या विचारधारेचे एक तर दुसरे आर.एस.एस. चे प्रणेते डॉ. हेगडेवार मूळचे आंध्रचे असले तरी विचारांचे मुख्य केंद्र महाराष्ट्रातील नागपूर हे होते.
भारतातील कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य श्रीपाद अमृत डांगे महाराष्ट्रातील.
टाटांच्या बरोबरीने लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी महाराष्ट्रात उद्योग सुरू केले.
लुनिए ब्रदर्स ने पहिला चित्रपट केला तो दादासाहेब फाळकेंनी बघितला त्यातून त्यांनी पहिला मराठी चित्रपट बनविला तो पूर्णपणे भारतीय दृष्टिकोनातून व त्या चित्रपटाचे नाव होते ‘अयोध्येचा राजा’ म्हणून त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक मानले जाते.
शेतीतील सहकार चळवळीचा जन्म महाराष्ट्रातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी प्रवरानगर येथून सहकारातुन उद्योग व्यवसाय विकसित केला. पुढे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, रत्नाप्पा कुंभार, तात्यासाहेब कोरे, काकासाहेब वाघ व नंतर देशभर चळवळ विकसित झाली.
शेतकरी संघटित करणे हे अशक्य वाटणारे काम शरद जोशींनी करून दाखविले ‘शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे’ हा विषय घेऊन त्यांनी चळवळ उभी केली, त्याचा देशाच्या धोरणावर प्रभाव पडला, कृषी आयोग बनवावा लागला, शरद जोशी त्याचे अध्यक्ष झाले.
स्त्री मुक्ती चळवळ – महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यानी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली, आनंदीबाई जोशी, ताराबाई शिंदे या सारख्या अनेक स्त्रियांनी शिकून महत्त्वपूर्ण योगदान दिले.
महाराष्ट्रात साठोत्तरी साहित्यात दलित साहित्य मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे या साहित्या संदर्भात म्हणतात, “मनुष्य, समाज, निसर्ग आणि नियती यांनी निर्माण केलेल्या नाना प्रकारच्या दुखांनी गदगदलेल्यांच्या व्यथा आणि वेदना या साहित्याने प्रकाशात आणल्या”. त्यामध्ये अण्णाभाऊ साठे, दया पवार, बाबुराव बागुल, केशव मेश्राम, माधव कोंडविलकर, नामदेव ढसाळ, शरणकुमार लिंबाळे, यांची नावे घेता येतील.
पुढे ग्रंथालीच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचा विकास व वाचकांची जिज्ञासावृत्ती विकसित करण्यात मदत झाली. ग्रंथालीचे विविधांगी काम आजही सुरू आहे.
संगीत – हिंदुस्तानी क्लासिकल संगीताचा वैभवशाली कालखंड महाराष्ट्रा पासून सुरु होतो . दाक्षिणात्य म्हणजे कर्नाटकी संगीत व हिंदुस्तानी क्लासिकल म्हणजे उत्तर भारतीय संगीत या दोघांचा संयोग महाराष्ट्रात दिसतो म्हणूनच पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, किशोरी अमोनकर, परविन सुलतान, प्रभाताई अत्रे, कुमार गंधर्व असा वारसा महाराष्ट्रात निर्माण होण्यास मदत झाली. जगातील सर्वात मोठा शास्त्रीय संगीताचा महोत्सव सवाईगंधर्व महोत्सव पुण्यात होतो.
आद्य नाटककार विष्णुदास भावे यांचा १८५३ साली सांगलीच्या राजवाड्यात ‘सीता स्वयंवर’ या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग झाला आणि मराठीतील नाट्य परंपरेचा जन्म झाला.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोन महाराष्ट्रातील भारत रत्नांनी आपापल्या कार्यक्षेत्रात केलेल्या देदीप्यमान कामगिरीने जग जिंकले.
पुण्यातील बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक संघटना बांधायला सुरुवात केली पुढे १९८६ मध्ये पंतप्रधान राजीव गांधींनी लक्ष घातले व ग्राहक संरक्षक कायदा अस्तित्वात आला.
या विषयावर लेख लिहिताना मी गुढीपाडव्या निमित्ताने नववर्षाचे स्वागत करताना निघणाऱ्या स्वागत यात्रा, ऐतिहासिक, पौराणिक, आयुर्वेदिय महत्त्व मांडतानाच महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेची ओळख करून दिली.
तुम्ही माझे भले बुरे विचार काळजीपूर्वक वाचले याबद्दल मी आपला ऋणी आहे. माझ्या लिखाणातली न्यूनाधिक्य पुरते-सरते करून घ्यावे व कमी अधिक तीव्र रचनेबद्दल माफ करावे. अशी आपणास विनंती आहे. खरे तर सगळ्यांकडून सगळे काही घेऊनच हे मी माझे म्हणून लिहितो याबद्दलही मला क्षमा करावी.
धन्यवाद.
प्रा. प्रशांत पुंडलिक शिरूडे ,
के. रा.कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली prashantshirude1674@gmail.com
9967817876