*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी (भावकवी) वि.ग.सा. यांच्या रचनेचे विनय पारखी यांनी केलेले सुंदर रसग्रहण*
*अशी कवीता येते*
कृष्णासम ही नटखट अवखळ..
लाघवी कवीता हळूच पाऊली येते..
मयुरपिसी मखमली मृदुल करांनी..
अवघे अलगदी चित्त चोरुनी नेते ..।। १ ।।
कदंब तरुच्या साऊलीत या
साक्षात बीज प्रतिभेचे फूलते…
शब्दफुलांच्या , वटवृक्षावर
भावगंधले गीत कोकिळा गाते…।। २ ।।
कालिंदीच्या ! डोहातूनी त्या
लय , ताल सप्तसुरांची येते…
राधे ! बघ सामोरी कृष्णमुरारी
धुन मंजुळ मंजुळ बासुरीची येते…।। ३ ।।
शब्दशब्द मनी भाव उमलता
वास्तव ! हॄदयातूनी ओघळते
रसिक मनांच्या गाभाऱ्यातुनी
सोज्वळतेचे रूप ! गंधाळूनी जाते…।।४ ।।
*© वि.ग.सातपुते. (भावकवी)*
‘ *अशी कवीता येते’ ही वि.ग.सातपुते आप्पांची एक भावस्पर्शी कविता.*
या कवितेचं सौ. गौरी चिंतामणी काळे यांनी केलेले रसग्रहण मनाला खूपच भावलं. त्यांनी केलेले रसग्रहण अभ्यासपूर्वक आणि विषयाला अनुसरून आहे. सरांच्या कवितेला अनेक विविध कंगोरे असतात. त्या कवितेतील भावार्थ, कवितेचा आशय, कवितेत असलेला गूढार्थ सौ. गौरी चिंतामणी काळे यांनी व्यवस्थितरीत्या उलगडवून दाखवला आहे. त्यांच्याच लेखनाचा धागा पकडून मला या कवितेचे विशेष असे रसग्रहण करावेसे वाटले म्हणून मी लिहिता झालो.
वास्तविक पाहता कृष्ण हा जगातील सर्वश्रेष्ठ पुरुष, म्हणजेच तो पुरुषोत्तम आहे आणि कवितेचे रूप असते स्त्रीलिंगी तरीही विगसा सर कवितेला नटखट, अवखळ अशा कृष्णाची उपमा का बरं देतात ? एवढंच नाही तर ते कवितेत कृष्णा विषयी असलेल्या इतर ‘स्त्री’ विषयक संबंधांचा संदर्भ सुद्धा देतात. उदा. ती मोरपिसे, ती कालिंदी नदी, ती बासरी, ती हरिप्रिया म्हणजेच कदंब वृक्ष, ती ताल, ती लय इत्यादी आणि ती कविता. हेच या कवितेत असलेल्या ‘स्त्री’ प्रतिकांचं वैशिष्ट्य आहे. विगसा सर कवितेला कृष्णाची उपमा देतात कारण कोणाच्या हृदयात जर डोकावून पाहायचं झाल्यास किंवा कोणाच्या मनातलं सारं काही जाणून घ्यायचं झाल्यास सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम असलेलया कृष्णालासुद्धा ‘तिच’ व्हावं लागतं. कारण एक स्त्रीच न सांगताही दुसऱ्याच्या मनातील भाव ओळखू शकते म्हणून कवी त्याच्या कवितेलाच कृष्ण म्हणतात. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांना आपण ज्ञानेश्वर माऊली असे संबोधतो ना अगदी तसेच आहे हे.
या कवितेचे शीर्षकच ‘अशी कवीता येते’ असे आहे. म्हणजे कविता प्रसवणे, कविता जन्माला येणे, कवीची काव्यप्रतिभा प्रतिमेत प्रत्यक्षात उतरणे आणि कविता ह्या हृदयीचे त्या हृदयी उतरणे या कवितेच्या अवस्था आहेत. कविता म्हणजे उस्फुर्त भावनांचा प्रवाही अविष्कार. विचारांतून, अनुभवातून त्या भावनांच्या प्रतिमा रूपांत व्यक्त होतात आणि एकदा कवीची प्रतिभा प्रत्यक्षात उतरून तिची प्रतिमा तयार झाली की ती कविता कवीची राहात नाही, तर ती कविता रसिक वाचकांच्या मन गाभाऱ्यात आठवणींच्या रूपात अनंतकाळ वास करून राहते. हा असतो कवितेचा प्रवास. भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ घेऊन जन्माला आलेल्या कवितेचे यतार्थ रूप या कवितेत अप्पांनी रेखाटले आहे. या तिन्ही काळांना जाणणारा तो परमात्मा दुसरा तिसरा कोणी नसून सर्वश्रेष्ठ पुरुष असलेला कृष्णच आहे म्हणून आप्पा कवितेलाच कृष्ण असे म्हणतात.
कवीची कविता ज्यावेळी जन्म घेते त्यावेळी ती एखाद्या नवजात शिशु सारखी लाघवी असते. झटकन ती उचलून घ्यावीशी वाटते. ती कविता “मयुरपिसी मखमली मृदुल करांनी” जेव्हा झेपावते तेव्हा आपण पूर्णपणे तिच्यात आपले चित्त हरवून बसतो. इथे विगसा सरांनी ‘मयूरपिसी’ असा छान शब्द प्रयोग केला आहे. कारण मोराचे पीस हे ज्याप्रमाणे मोराच्या पिसार्यात असते त्याच प्रमाणे पिसारा गळून गेल्यावर सुद्धा ते अगदी तितकेच सुंदर दिसते आणि ते मोरापेक्षाही दीर्घायुषी असते. मोराच्या पिसातुन रूपाच्या आभेचे दोन झोत दिसतात, एक असतो त्याच्या पोताचा म्हणजेच त्याच्या तेजाचा रंग आणि दुसरा असतो त्याच्यातल्या विसर्जनाचा रंग. पहिला रंग आपल्याला सहज दिसतो पण दुसरा रंग आपल्याला पटकन दिसून येत नाही. एकदा का तो दुसरा रंग दिसायला लागला की अवघे चित्तच तो श्रीरंग चोरून नेतो. कवितेचेही असेच असते. एकदा कविता स्फुरली, तिचे प्रगटीकरण झाले की ती कविता रसिकांची होते. कारण प्रत्येक कवितेची भौतिक स्थिती प्रारब्धानुसार, त्याच्या विचारांनुसार कमी-अधिक असतेच, पण आत्मिक स्थिती प्रयत्नांनी जो सुधारू पाहतो त्याच्यावर परमात्मा शक्तीची कृपा झाल्याशिवाय राहात नाही. जो हे प्रयत्न प्रामाणिकपणे करतो त्याला त्याची प्राप्ती होतेच आणि मग त्याचा डंका जगात वाजल्याशिवाय राहात नाही म्हणजेच परिपूर्ण सर्वांग सुंदर झालेली कविता रसिकांच्या काळजाला जाऊन भिडल्याशिवाय राहात नाही असे श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात त्याचा प्रत्यय आपल्याला या कवितेतून दिसून येतो.
‘कदंब तरुच्या सावलीत’ म्हणजे एका निवांत आल्हाददायक क्षणी हे कवितेचे बीज मनात रुजते नि हळूहळू शब्दांची भावफुले उमलतात. भावनांच्या हिंदोळ्यावर मन झोके घेते, कल्पना फेर धरु लागतात नि कवितेची भाव गर्भित गीत मन आनंदाने गाऊ लागते. या नाजुक कोवळ्या बीजाचा एक शांत सावली देणारा वटवृक्ष कधी होतो ते स्वतःलाच समजत नाही.अशी ही कविता अवखळ अलवार पावलांनी जीवनात प्रवेश करते आणी जीवनाला एक लय प्राप्त करुन देते. इथे सरांनी कदंब म्हणजेच हरिप्रिया याचा उल्लेख केला आहे. कदंब वृक्ष हा प्रेम, सौन्दर्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. जिथे प्रेमाचा संबंध आला तिथे कृष्ण म्हटलं तर राधा आलीच आणि राधा म्हटलं तर कदंब वृक्ष ही आलाच. कारण आज पर्यंत राधा-कृष्णाच्या लीला आपल्या पर्यंत मौखिक आणि लिखित स्वरूपात रचल्या गेल्या आहेत. राधा-कृष्णातील असलेल्या नात्याचा तो एकमेव असलेला हा मूक साक्षीदार आहे. अशा या हरिप्रियाच्या सावलीत जिथे राधा-कृष्णाच्या लीला फुलल्या तिथे काव्य प्रतिभेचे फुल नुसतेच फुलत नाही तर त्या शब्द फुलांचा मोठा वटवृक्ष होतो आणि कोकीळ नावाचा गंधर्व त्यातील भावार्थ गाऊ लागतो. हे असते चांगल्या समृद्ध कवितेचे लक्षण. अशी कविता नुसतीच फुलून येत नाही तर त्या फुलांचा दरवळ इतरांसाठी मागे ठेवून जाते.
कालिंदी हे ही एक स्त्रीचे रूप. ‘कालिंदीच्या डोहातूनी’ यात एक गहन विचार आहे. स्त्रीचे मन जणू कालिंदीच्या डोहाप्रमाणे असते. निर्मळ, नितळ आणि प्रवाही. सासर आणि माहेर या दोन्ही काठांवरल्या जीवांना निरपेक्षपणे सर्वस्व अर्पण करणारे. अशीच असते कविता जी कवीला आणि रसिकांना आपले सर्वस्व अर्पण करते. जिथे चांगले असते तिथे वाईटही असतेच. कालिंदीचा डोह म्हटला तर आपल्या आठवते ते कृष्णाचे कालियामर्दन रूप. स्व. द. भि. कुलकर्णी सर यांच्या भाषेत ज्ञानेश्वरीचा संदर्भ सांगायचं झाल्यास “कृष्णाने कालियाचे मर्दन केले कारण त्याला कालिंदीला कालियाच्या त्रासापासून मुक्त करावयाचे होते. देव आपल्या भक्तांसाठी धावून येतो याचा प्रत्यय आपल्याला येतो. कालियाच्या त्रासापासून मुक्त झालेली कालिंदी ज्यावेळेला मन मोकळेपणाने वाहू लागते त्यावेळी तिच्या डोहातून ताला-सुरांची लय येते. जणू राधेचा कृष्णसखा आपल्या बासरीच्या मधुर स्वरांनी आपले मन मोहवून टाकतो आहे असेच जणू भासते. अशा या काव्यप्रतिभेच्या प्रवाहात असंख्य विचारांचे भोवरे असतात, अनेक प्रश्नांची उत्तरे असतात. हा डोह जितका खोल आहे तितकाच तो व्यापक आहे. यात जितके खोल खोल जाऊ तितके नवनवीन विचार नव्या कल्पना जन्म घेऊ लागतात. आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे अशा चांगल्या कवितेतून मिळतात. हा कवितारुपी कृष्ण शब्दांतून व्यक्त होत असताना आपल्याला एक चांगली अक्षय उर्जा प्रदान करतो. अक्षय ऊर्जा म्हणजे भविष्यासाठी असलेली शाश्वत ऊर्जा आपल्याला अशा सुंदर कवितेतून तो कृष्ण देऊन जातो. त्यावेळी आपल्या सगळ्या प्रश्नांचा निचरा होतो आणि कवितेच्या शब्द सुरांनी निस्सीम आत्मानंद उपभोगता येतो. हेच असतं एका चांगल्या कवितेचं लक्षण.
विचारांतून तयार झालेले शब्द, त्या शब्दांतून व्यक्त झालेल्या भावना आणि त्यातून तयार झालेली भावार्थ प्रतिमा आपल्या जगण्याला एक नवी दिशा मिळवून देते. जशी कविता आपल्या मनाचा ठाव घेऊन अपार आनंद देते तशीच काव्य रसिकांना ही ती आपलीशी वाटते. रसिकांची कवितेशी नाळ जुळताना त्यांना ही कवितेत संभावना दिसतात, उत्तरे सापडत जातात.
विगसा अप्पांची ही कविता अशीच आहे. वरवर जरी ही कविता कवितेचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ जरी सांगत असली तरी ती एका स्त्रीच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास आहे. जो कवितेच्या रूपाने वाचकांसमोर उलगडत जातो. लहानपणी दुधाप्रमाणे निरागस असलेली स्त्री कन्यादानाचं विरजण लागताच दह्याप्रमाणे घट्ट नातं निर्माण करते, वैवाहिक आयुष्यात ताका सारखी स्वतःला घुसळून नात्यांचे कणनकण बाजूला जमा करून त्याच लोणी करून देते आणि वार्धक्याच्या वेळी आज्जी नावाचं साजूक तूप घरासाठी कुटुंबांसाठी प्रार्थना करताना निरंजनातल्या वातीसारखं अखंड प्रकाश देत अखेर संपून जाते आणि देह कृष्णार्पण होताना मनांच्या गाभाऱ्यात ती आठवणींच्या रुपात, शब्दांच्या रुपात कायमचा वास करते. तशीच असते स्त्रीची अंतिम उच्च अवस्था आणि कवितेची अवस्था. हेच असतं खरं शाश्वत सत्य स्त्रीच्या पोटीच मुल जन्माला येतं त्याचप्रमाणे असतं काव्यप्रतिभेच्या पोटीच काव्य प्रसवतं.
*(c) विनय पारखी*