*मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वाढत्या वयाची खिडकी…*
वाढत्या वयाची खिडकी
नका कधी करू बंद
जडवून घ्या जिवाला
एखादा कुठला तरी छंद
करायचे होते आयुष्यात
कधी करणे नाही झाले
पूर्ण करा ना आता तरी
स्वप्न अधूरेच जे राहिले
संसाराची ती ओढाताण
होती लेकरांची काळजी
आता आहात ना निवांत
जरी असाल आजोबा आजी
जरा फिरून या कुठेतरी
आयुष्य नव्याने ते जगा
वय झाले वय झाले
नका कधी करू त्रागा
वाढत्या वयाची मनात
का भरावी एवढी धडकी?
सताड ठेवा ना उघडी
वाढत्या वयाची खिडकी
@अरुणा गर्जे