*ज्येष्ठ साहित्यिक,पत्रकार, संपादक बाबू फिलिप्स डिसोजा कुमठेकर लिखित अप्रतिम लेख*
*गुढीपाडवा*
हिंदू नववर्ष शालिवाहन शके म्हणून गुढीपाडवा दिवसापासून सुरू होते.
वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, वास्तू प्रवेश,व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते
गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा (गुढीपाडवा इतिहास) सांगितल्या जातात. असं म्हणतात की, महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरूवाताला तिची पुजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढी पुजन केले जाऊ लागले. इतिहासात या दिवशी ब्रम्हदेवाने विश्व निर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे.
पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला परत आले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. म्हणूनच यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गुढीपाडवा का साजरा करतात यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरलं आणि तृतीयेला झालं होतं. म्हणूनच या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पुजा केली जाते.
गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडत असले तरी आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. आजच्या आधूनिक युगातही या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुढी पाडवा महत्व जाणून घेणं फार गरजेचं आहे.
प्रत्येक सण साजरा करण्यामागे पुर्वजांचे काही उद्देश असतात. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो याचं प्रतिक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जाते. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी. नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातात. प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं. कडुनिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते. ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो. गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या अशा अनेक गोष्टींना विशेष महत्त्व असतं. मात्र त्यासाठी प्रत्येकाला गुढीपाडवा माहिती माहीत असायलाच हवा.
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
9890567468