दोडामार्ग तालुक्यातील हत्ती बाधित गावांची जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक यांनी केली नुकसानीची पाहणी
उपाययोजना संदर्भात घेतला आढावा
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात धुमाकूळ घालणार्या जंगली हत्तींचा बंदोबस्त करावा, पकड मोहीम राबवावी अशी मागणी केली जात आहे. ७ मार्च रोजी दोडामार्ग वन विभाग कार्यालय येथे उपोषण छेडले होते. यावेळी जिल्हाधिकार्यांनी भेट न दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर नुकतीच सिंधूदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील, उपवनसंरक्षक नव किशोर रेड्डी, तहसीलदार, दोडामार्ग वन परिक्षेञ अधिकारी यांनी हत्ती बाधित गावात जाऊन झालेले नुकसान, उपाययोजना याची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी वन अधिकारी कडून आवश्यक माहिती देण्यात आली. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोर्यातील अनेक गावात जंगली हत्ती उपद्रव सुरू आहे. हा कळप आता शिरवल धरणाच्या ठिकाणी कोलझर गावात दाखल झाला आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या नुकसानामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. हत्ती हटाव मोहीम राबवा दोडामार्ग तालुका हत्ती मुक्त करा अशी मागणी केली जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दोडामार्ग तालुक्यातील समस्या विचारात घेत नाही. लक्ष देत नाही असे शेतकरी बांधवानी उपोषण ठिकाणी बोलून दाखवले होते. शिवाय हत्ती पकड मोहीम संदर्भात नुकताच अभ्यास दौरा देखील झाला होता. शुक्रवारी उपवनसंरक्षक सावंतवाडी नव किशोर रेड्डी तसेच जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग अनिल पाटील, तहसीलदार दोडामार्ग, वनक्षेत्रपाल दोडामार्ग वैशाली मंडल यांनी हत्ती बाधित क्षेत्रातील गावात भेट देऊन केलेल्या हत्ती प्रतिबंधक उपाययोजनांची पाहणी केली नंतर हत्तीकडून झालेल्या पीक नुकसानीची पाहणी मौजे मोर्ले बागवाडी येथील शिरीषकुमार मणेरीकर यांच्या बागेमध्ये जाऊन केली. तसेच शिरवल येथील झालेली पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी वनपाल कोनाळ, वनरक्षक घोडगेवाडी, वनरक्षक केर, वनरक्षक बांबर्डे, वनरक्षक हेवाळे व इतर वनकर्मचारी उपस्थित होते.