*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वसंत आला वसंत आला*
वृत्त : पादाकुलक
कडुलिंबाची फुले कोवळी
अर्ध्या रात्री फुलून येती
वसंत आला, वसंत आला
साऱ्यांना ते सांगत जाती
रात्र संपता, भल्या पहाटे
बकुळ फुलांचा सडा सांडतो
गंधाने त्या अंगणामधे
आनंदाचा झरा वाहतो
सुंदर,इवली फुले सुरंगी
झाडा खाली टप टप करती
जकरंडाचे निळसर पेले
खुलून दिसती रस्त्यावरती
लाल गुलाबी घाणेरीची
निळी केशरी फुले दुरंगी
झुलता झुलता हसत राहुनी
स्वागत करती अपुले जंगी
खूरचाफ्याची फुले रेशमी
दुपार वेळी फुलून येती
दरी दरी मग भरास येता
चैतन्याने न्हाउन जाती
संध्याकाळी शुभ्र मोगरा
प्रसन्न करतो मनास साऱ्या
जुई, चमेली, निळी अबोली
नकोस झोंबू त्यांना वाऱ्या
चैत्राचे ते ऊन भयंकर
दुपारच्याला तापत जाते
बहर फुलांचा गंध सुगंधी
ताप तयाचा निर्जीव करते.
श्रीनिवास गडकरी
रोहा पेन पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित