*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्पर्शांना जप जरा…!!*
हसत राहिलास तर
जग आहे सोबत
रडत राहिलास तर
अश्रूही नाही थांबत…
ज्ञानेंद्रिय खोट बोलतील
पण स्पर्श नाही
भावनांना ठाव गवसेलही
आईबापांचा स्पर्श नाही
स्पर्शानं सुरकतलेली कातडी
नातवाने ओढायला हवी
मैत्रिकी प्राणांपाड जपणा-या
मित्राने झप्पी द्यावी…
शेकडो औषधांची ताकद
स्पर्शात दडली असते
स्पर्शचं अंतरात …विरताचं
घराला दृष्ट लागते
पुस्तकाची खिडकी नको
खिडकीचं पुस्तक उघड
उंबरठा ओलांडून घरात
येणा-याचा हात पकड..
स्पर्शचं आयुष्याची गर्भश्रीमंती
संवेदनाच्या अनावर पायघड्यावर
एकाकीपणात भावपूर्ण स्पर्श
पोचवतील तुला हिमशिखरावर
मन मोकळं करं..
स्पर्शांना जप जरा
जाणिवांना स्पर्श कर
जगण्याची हीच त-हा…!!!
बाबा ठाकूर