मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आयपीएल २०२५ च्या पाचव्या सामन्यात पंजाब किंग्सने (पीबीकेएस) गुजरात टायटन्सवर (जीटी) ११ धावांनी रोमांचक विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी आक्रमक फलंदाजी करत विक्रमी धावसंख्या उभारली. श्रेयस अय्यरच्या आक्रमक खेळीमुळे पंजाबने २४३/५ धावांचा डोंगर रचला, तर गुजरातचा संघ २३२/५ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
पीबीकेएसचा कर्णधार श्रेयस अय्यरने अवघ्या ४२ चेंडूंत ९७ धावांची वादळी खेळी करत संघाचा डाव भक्कम केला. त्याच्या खेळीत ५ चौकार आणि ९ षटकार होते. त्याच्या साथीला शशांक सिंगने १६ चेंडूंमध्ये ४४ धावा तडकावून संघाला २४३ धावांपर्यंत पोहोचवले. श्रेयसने आयपीएल २०२५ मधील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आणि सर्वात जलद अर्धशतक (२३ चेंडू) करण्याचा विक्रमही केला. साई किशोरने ४ षटकांत फक्त ३० धावा देत ३ बळी घेतले.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना साई सुदर्शनने ७४ धावा (४१ चेंडू, ५ चौकार, ६ षटकार), जोस बटलरने ५४ धावा (३३ चेंडू) आणि शेरफेन रदरफोर्डने ४६ धावा (२८ चेंडू) काढून संघाला विजयाच्या जवळ नेले. मात्र, शेवटी पीबीकेएसच्या गोलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन करत सामना हातातून निसटू दिला नाही. गुजरातचा हा सर्वाधिक धावसंख्येचा अपयशी पाठलाग ठरला.
पीबीकेएससाठी अर्शदीप सिंगने २ बळी घेतले, तर मार्को जाॅन्सन, ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. त्यामुळेच गुजरातचा वेग मंदावला.
श्रेयस अय्यर ९७ धावा (४२ चेंडू, ५ चौकार, ९ षटकार) सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
या विजयासह पंजाब किंग्सने गुणतालिकेत दमदार सुरुवात केली, तर गुजरात टायटन्सला पहिला धक्का बसला आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच रोमांचक सामने पाहायला मिळत असल्याने आगामी सामन्यांबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे!
*उद्याचा सामना:-*
२६ मार्च २०२५ रोजी, इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा सहावा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. दोन्ही संघांच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.