*निष्ठेवर श्रद्धा आणि विश्वास असणारा निष्ठावंत वैभव नाईक*
*लेखक- हरी खोबरेकर (मालवण)*
राजकारणात सत्तेला फार मोठे महत्त्व आहे; हे नाकारता येणार नाही. मात्र, सत्ता हेच सर्वस्व मानून आज अनेकजण सत्तेच्या मोहात ओढले जात आहेत. सत्तेची फळे चाखण्यासाठी नीती, मूल्ये आणि विचारांना बाजूला सारले जात आहे. काहींना ईडी, सीबीआय, एसीबी या तपास यंत्रणांची भीती आहे. तर काहीजण आमिषांना भुलले जात आहेत. परंतु, याला अपवाद ठरले ते माजी आमदार वैभव नाईक! शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेना सोडून शिंदे गटात सहभागी होण्यासाठी वैभव नाईक यांना अनेक वेळा ऑफर देण्यात आल्या. अनेक आमिषे देण्यात आली. मात्र, त्या आमिषांना भीक न घालता बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेशी आणि उद्धवजी ठाकरेंसोबत वैभव नाईक एकनिष्ठ राहिले. वैभव नाईक शिवसेना सोडणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर २०२२ मध्ये त्यांची एसीबी चौकशी लावण्यात आली. २०२२ सालापासून अजूनपर्यंत वैभव नाईक एसीबीच्या चौकशीला सामोरे जात आहेत. त्यांनी शरणागती पत्करावी म्हणून पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांची देखील एसीबीकडून चौकशी करण्यात आली. राहत्या घराची मोजमापे घेण्यात आली. त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले. विधानसभा निवडणुकीत गैरमार्गाने त्यांचा पराभव करण्यात आला. असे हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही वैभव नाईक ना झुकले, ना डगमगले. संघर्षाच्या काळात उद्धवजी ठाकरेंची साथ त्यांनी सोडली नाही. त्यामुळेच गद्दारांच्या मांदियाळीत निष्ठावंत म्हणून वैभव नाईक नावारूपास आले. हिंदुत्वाचा विचार आत्मसात करताना हिंदुत्वात निष्ठा महत्वाची आहे. आज निष्ठेचा पराभव झाला असला तरी वैभव नाईक यांनी गद्दारीचा कलंक मात्र माथी लागू दिला नाही. म्हणूनच त्यांची “निष्ठेचे पाईक वैभव नाईक” अशी प्रचिती सर्वदूर आहे.
वैभव नाईक यांच्या राजकारणाची सुरुवातच संघर्षातून झाली असून राजकीय राडे, हत्या असा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रक्तरंजित इतिहास असताना आणि स्वतःच्या कुटुंबामध्ये राजकीय हत्या झाली असताना देखील पुढे होणाऱ्या परिणामांची पर्वा न करता अन्यायाविरुद्ध लढा देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहशत मोडून काढण्यासाठी वैभव नाईक रणांगणात उतरले. यावेळी अनेक वेळा त्यांना संघर्ष करावा लागला; जनतेच्या प्रश्नांसाठी लढा द्यावा लागला. २०१४ आणि २०१९ साली या संघर्षाचे रुपांतर विजयात झाले. कुडाळ-मालवणच्या जनतेने वैभव नाईक यांना दोनवेळा आमदार म्हणून निवडून दिले. दहा वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र त्यांनी मेहनत घेतली. वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस येथे शासकीय मेडिकल कॉलेज सुरु करून घेतले. महिलांसाठी स्वतंत्र असे जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे उभारले. कुडाळ येथे क्रीडांगण व पर्यटन वाढीच्या दृष्टीने मालवण बंदर जेटीचे सुशोभिकरण केले. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिराचे नूतनीकरण करून दगडात कोरलेले आकर्षक असे सिंहासन बनवून घेतले. विधानसभा अधिवेशनात मच्छिमार, शेतकरी, भातपीक, आंबा-काजू फळपीक, वाळू लिलाव बाबतीत प्रश्नांना वाचा फोडली. गावागावात रस्ते, पाणी, वीज अशा सोयीसुविधा पुरविल्या. कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात एकही लोकप्रतिनिधी फिरकत नसताना वैभव नाईक मात्र जनतेसोबत होते. जनतेला आवश्यक गोष्टींची, सुविधांची पूर्तता करत होते. तौक्ते वादळ स्थितीत त्यांनी वेगवेगळ्या भागात भेट देऊन मदतकार्य केले. पूरस्थितीवेळी देखील प्रशासनाच्या अगोदर वैभव नाईक नागरिकांच्या मदतकार्यासाठी सरसावले होते.
सर्व काही सुरळीत सुरु असताना जून २०२२ मध्ये शिवसेना पक्षातील चाळीस आमदारांनी पक्षाशी गद्दारी करत भाजप पक्षासोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे उद्धवजी ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेल्या वैभव नाईक यांना विरोधी पक्षात बसावे लागले. भाजपचे केंद्रीय मंत्री आणि राज्यातील तीन मंत्री असे चार-चार मंत्री वैभव नाईक यांच्या मतदारसंघात सत्ता व पैशाच्या जोरावर हर प्रकारे त्यांना विरोध करत होते. मात्र, वैभव नाईक यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर आवाज उठवून सत्ताधाऱ्यांना कडवी झुंज दिली. परंतु, पैशाच्या ताकदीसमोर कोणाचे काही चालत नाही हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खरेच ठरले. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात विरोधी उमेदवाराला २६ हजाराचे मताधिक्य मिळाले आणि जनशक्तीवर धनशक्तीने विजय मिळविला. त्यामुळे या धनशक्तीच्या पाशवी ताकदीसमोर पुढील होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपला निभाव लागणे कठीण आहे यांची कल्पना असूनही वैभव नाईक निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणुकीस सामोरे गेले. मात्र, सत्ताधारी एवढ्यावरच थांबले नाहीत; वैभव नाईक यांना रोखण्यासाठी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षातील उमेदवाराचा शिंदे गटात प्रवेश घेऊन उमेदवारी देण्यात आली. वैभव नाईक आणि शिवसेना पक्षाविरोधात हिंदुत्वावरून अपप्रचार करण्यात आला. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीत लोकांना खोटी आश्वासने देऊन, लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचे आश्वासन देऊन, जाती-धर्माचे राजकारण करून आणि बेसुमारपणे पैशांचे वाटप केल्यामुळे सदैव जनतेसोबत असणाऱ्या वैभव नाईक यांचा दुर्दैवाने थोडक्या मतांनी पराभव झाला. हा पराभव एकट्या वैभव नाईक यांचा नव्हता तर त्यांच्यासाठी काम केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, त्यांना मतदान केलेल्या प्रत्येक मतदाराचा हा पराभव होता. त्यामुळे या पराभवाने जिल्हावासीय भावुक झाले. त्यावेळी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. तरीही थोडेथोडके नाही तर ७३ हजार ४८३ कुडाळ-मालवणवासिय मतदारांनी वैभव नाईक यांच्यावरच विश्वास दाखविला. त्यामुळे वैभव नाईक यांनी देखील पराभवाला खचून न जाता आणि आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएम, पैसा, अथवा कोणा व्यक्तीवर न फोडता सर्व जबाबदारी स्वतःवरच घेतली.
त्यानंतर अवघ्या काही दिवसातच वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील तालुका कार्यकारिणींच्या बैठका आयोजित करून जोपर्यंत शेवटचा व्यक्ती सोबत असेल तोपर्यत काम करणार असे जाहीर करून नाउमेद झालेल्या कार्यकर्त्यांना बळ दिले. सत्ताधारी नेते आणि अधिकारी यांच्याकडून आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास सहन करणार नाही; असा इशारा देखील दिला. जरी वैभव नाईक आता आमदार नसले तरी आजही ते तत्परतेने जनतेची कामे करीत आहेत. पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी कामाला सुरुवात केली. “मला आता आमदार म्हणू नका!”असे वैभव नाईक यांनी जनतेला आवाहन केले असले तरी सर्वसामन्यांच्या हृदयात वैभव नाईक हे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे अजूनही आमदार म्हणूनच राहतील ते कोणीही पुसू शकत नाही. पराजित झालेले अनेक माजी आमदार हव्यासापोटी सत्ताधारी पक्षाकडे झुकले जात आहेत. परंतु, सत्तेची आणि पैशाची आसक्ती नसलले वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत. आंदोलनांच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवित आहेत. बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर सिंधुदुर्गात शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी माजी आमदार वैभव नाईक सज्ज आहेत. आज, २६ मार्च रोजी त्यांचा वाढदिवस असून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!