*वैज्ञानिक क्रांतीमध्ये रसायनशास्राचे अनन्यसाधारण योगदान-डॉ. प्रकाश वडगावकर*
वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व इंटरनल क्वालिटी अशुरन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २२ मार्च २०२५ रोजी एक दिवसीय “फ्रंटीयर इन केमिकल सायन्सेस” ही राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. सदर परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ मा. डॉ. प्रकाश वडगावकर, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे यांच्या शुभहस्ते व श्री. विजय रावराणे (सहसचिव, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई) यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाले.
जगामध्ये आजपर्यंत अनेक गोष्टी बदलल्या गेल्या, जागतिक पातळीवर होणारे बदल आज प्रत्येकाच्या हाताच्या ठस्यावर उपलब्ध आहेत. जगभरातील वैज्ञानिक क्रांतीमध्ये पाच नाविन्यपूर्ण शोध लागले याचे सर्व श्रेय रसायनशास्त्राला जाते. अर्थातच या अनन्यसाधारण अशा वैज्ञानिक क्रांतीमध्ये रसायनशास्त्राचे सर्वात मोठे योगदान आहे असे प्रतिपादन उद्घाटक डॉ. प्रकाश वडगावकर यांनी केले. सदर परिषदेच्या आयोजनाबाबत अभिनंदन करून याचा फायदा सहभागी सर्व प्राध्यापक, नवसंशोधक व विद्यार्थी यांना होणार असल्याचे परिषदेचे अध्यक्ष श्री. विजय रावराणे यांनी सांगितले. परिषदेच्या सुरुवातीला समन्वयक डॉ. डी. एम. सिरसट यांनी परिषदेचा हेतू सांगताना सर्व सहभागी प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांच्यासाठी ही एक पर्वणी असल्याचे सांगितले. या परिषदेच्या उदघाटन प्रसंगी डॉ. संदीप देशमुख, डॉ. ज्ञानेश्वर सिरसट, डॉ. प्रवीण भाले, प्रा. दिपक हिवराळे व प्रा. धिरज माने लिखित “सक्सेस गाईड टू ऑरगॅनिक केमिस्त्री” या IFAS संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सदर परिषदेवेळी व्यासपीठावर उपस्थित विश्वस्थ श्री.शरदचंद्र रावराणे, महाविद्यालयाच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री. सज्जनकाका रावराणे, प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, उपप्राचार्य डॉ. एम. आय. कुंभार, अधीक्षक श्री. संजय रावराणे यांनी उपस्थितीत राहून मार्गदर्शनपर शुभेच्छा व्यक्त केल्या.
सायनशास्त्रातील विविध क्षेत्रातील संशोधनावर बोलताना परिषदेमध्ये एकूण ४ प्रख्यात रसायनशास्त्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले यामध्ये डॉ. प्रकाश वडगावकर (नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे) यांनी रसायनशास्त्राचे विज्ञानातील योगदान या विषयावर मार्गदर्शन केले, डॉ. हेमंत चव्हाण (आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख) यांनी ग्रीन केमिस्त्री या विषयावर मार्गदर्शन केले, डॉ. हेमराज यादव (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांनी नॅनोटेकनॉलॉजी व शाश्वत ऊर्जा या विषयावर मार्गदर्शन केले तसेच डॉ. प्रवीण भाले (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर) यांनी कॅन्सरच्या औषधनिर्मितीमध्ये रसायनशास्त्राचे योगदान याविषयावर मार्गदर्शन केले. या परिषदेमध्ये भारतातील विविध नामांकित विद्यापीठे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व केमिकल इंडस्ट्री मधील तज्ञ अश्या एकूण ३११ सभासदांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपले संशोधन सादर केले.
या परिषदेच्या निमित्ताने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रसायनशास्त्र विषयाच्या प्रसार व प्रचार करण्यात ज्यांनी मोठे योगदान दिले असे प्रा. डी. डी. गोडकर (श्री. पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी), डॉ. एम. जी. गोरे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) व डॉ. एस. टी. संकपाळ (आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख) यांचा ज्येष्ठ शास्त्रज्ञ मा. डॉ. प्रकाश वडगावकर व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या परिषदेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी संशोधकांनी पोस्टर व ओरल प्रेसेंटेशनच्या माध्यमातून रसायनशास्त्रातील विविध संशोधन विषयांवर आपले संशोदन सादर केले. यावेळी उत्कृष्ट पोस्टर सादरीकरणातून श्री. अतुल पोळे (नाईक महाविद्यालय, पोंडा, गोवा), डॉ. कुमोदिनी आहेर (के.एल.इ. सोसायटी, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, कळंबोली, नवी मुंबई), श्री. सुरज सुतार (स्वामी विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर), श्री. राज प्रसादे (गोगटे-जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी), कु. दिव्या पाटील (स्वामी विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर), कु. रश्मी मालंडकर (आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी) व उत्कृष्ठ ओरल सादरीकरणातून डॉ. कुमोदिनी आहेर (के.एल.इ. सोसायटी, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, कळंबोली, नवी मुंबई), डॉ. राणी पाटील (के.एल.इ. सोसायटी, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, कळंबोली, नवी मुंबई), श्री. समाधान शेणमारे (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नळदुर्ग), प्रा. अंकिता रहाटे (आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख), डॉ. वैभव नाईक (नाईक महाविद्यालय, पोंडा, गोवा), कु. प्रथमेश दळवी (एस. आर. एम. कॉलेज, कुडाळ) यांना समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शरदचंद्र रावराणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सदर परिषदेचे सूत्रसंचालन सचिव डॉ. के. एस. पाखरे व प्रा. अंकिता रहाटे यांनी केले व आभार समन्वयक डॉ. डी. एम. सिरसट यांनी मानले.