You are currently viewing जीवन सुंदर आहे…!

जीवन सुंदर आहे…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा अध्यक्ष लेखक कवी पांडुरंग वसंत कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*जीवन सुंदर आहे…!*

 

खरंच हे जीवन सुंदर आहे का ? याची उत्तरे दोन प्रकारे मिळू शकतील. होय आहे किंवा नाही. ज्या रंगाचा चष्मा घालावा त्या रंगाचं जग दिसतं. असच काही याचं उत्तर असू शकेल. हो ना? आणि ते योग्यही वाटतं . वाटतं नव्हे. आहेच. तेच उत्तर योग्य आहे.*

जग आहे तसच आहे. आपण त्याकडे कसे पाहतो तसे ते दिसते. हत्ती आंधळ्यांना कसा दिसतो? ज्या आवयवाना हात लागेल तसा तो दिसतो. तसंच जीवनाचंही आहे. आपण कश्या प्रकारे घेतो तसे ते आहे. चष्मा महत्वाचा. चष्मा म्हणजे दृष्टीकोन. दृष्ठी सुद्धा सगळ्याची तीच असते. फक्त त्या दृष्टीचा कोन म्हणजे दृष्टीकोन वेगवेगळा असतो.*

सफल जीवन कश्याला म्हणतात?*

एकदा हाच प्रश्न अर्जुनाने कृष्णाला विचारला होता. तेंव्हा कृष्ण आणि अर्जुन पतंग उडवायला निघाले होते. कृष्ण म्हणाला “सांगेन सांगेन योग्य वेळी सांगेल.”*

अर्जुन अगदी मनापासून पतंग उडवत होता. अर्जुन म्हणाला, ” कृष्णा, हा पतंग आणखी खूप वर जाऊ शकतो पण या धाग्यामुळे पतंगच्या स्वतंत्रतेला सिमा येत आहे. आपण हा धागा तोडू यात का? तर मग तो आणखी उंच उडेल. “*

कृष्णाने धागा तोडला.*

पतंग थोड़ासा आणखी वर गेला आणि त्यानंतर गटांगळ्या खात खाली आला आणि दूर कुठेतरी अनजान ठिकाणी जाऊन पडला.*

तेंव्हा कृष्ण अर्जुनाला म्हणाला, ” पार्थ, जीवनात आपण ज्या उंचीवर आहोत ना, तिथे आपणास सर्रास असे वाटते की, काही गोष्टी ज्यांचेशी आपण बांधील असतो, त्या आपणाला आणखी वर जाण्यापासून रोखत आहेत. त्या गोष्टी कोणत्या? तर त्या आहेत घर, परिवार, माता पिता, गुरु, समाज, त्यांचे अनुशासन इत्यादी आणि आपण त्यांच्यापासून स्वतंत्र होऊ पाहतो. “वास्ताविक हेच ते धागे आहेत. जे आपणास त्या इंचीवरच स्थिर ठेवतात. या धाग्याशिवाय आपण एक वेळ आणखी थोडे उंच जाऊही शकू पण नंतर आपलीही तीच अवस्था होईल जी बिनधाग्याच्या पतंगाची झालेली आहे. कारण तिथे स्थिर राहण्यासाठी हे धागेच आवश्यक असतात. म्हणून जीवनात जर ठराविक उंचीवर स्थिर राहू इच्छित असाल तर कधीच धाग्याचा संबंध तोडू नका. धागा आणि पतंग यांच्या संबंधाच्या सफल संतुलना मुळे मिळालेल्या उंचीलाच “सफल जीवन” म्हणतात. “*

आपलं जीवन आपलं जगण असं आनंदी सुखी समाधानी व्हावसं वाटत असेल तर आपल्याला इतर कुणाकडे जाण्याची जरुरी नाही. तर त्यासाठी आपल्याला आपल्या आत डोकवावं लागणार आहे आणि आपणच आपल्याला त्रयस्तपणे पहावं लागणार आहे. मी कोण? , कश्यासाठी जन्माला आलो?. माझ्या जीवनाचं उद्दिष्ठ काय? याची उत्तरे स्वतः कडून मिळावायची आहेत. म्हणजे मग माझी मलाच ओळख होईल. या क्रियेमधे ज्ञानी, अध्यात्मिक सद्गुरूंची आवश्य मदत घेऊ शकता.*

एकदा का ” स्व” ची ओळख पटली की मग जीवन सुंदर होण्यास अजिबात वेळ लागत नाही.. जीवनाच्या पलीकडचे सुद्धा दिसायला लागते. माणूस समृद्ध, सुखी, समाधानी होतो.*

बुद्धीचे मनावर नियंत्रण येणे सुरु होते. माणूस स्थितप्रज्ञ होतो. कृष्णाला अर्जुन जसा हवा होता तसे आपण बनू लागतो. बुद्धीचा विकास होतो. सार असार, चांगले वाईट याची पारख करता येते. यासाठी ज्ञान घेत राहणे मात्र अगत्याचे आहे. दुसऱ्याचे दोष पाहण्यापेक्षा स्वतः मधील दोष कसे कमी करता येतील याचा माणूस विचार करू लागतो. सत्संग, अध्यात्म याचा आपल्या व्यक्तित्व विकासात महत्वाचा सहभाग असतो. त्यामुळे सकारात्मकता वाढते. प्रत्येक गोष्टीत आनंद दिसायला लागतो. आणि याचा एकत्रित परिणाम म्हणजे हे जीवन सुंदर आहे याची प्रचिती येऊ लागते*

परमेश्वराने आपणास सर्व साधन सामग्री देऊनच जन्माला घातले आहे. शरीर, बुद्धी, मन विचार इत्यादी. त्या साधनाचा उपयोग करून घेऊन आपण आपलं जीवन सुंदर करायचं आहे. त्यासाठी आपल्याला स्वतः ला कर्म करायचं आहे. फळाची अपेक्षा करायची नाही. ते कर्म सिद्धांताप्रमाणे आपणास निश्चित मिळणार आहे. त्या फळाच्या आपेक्षेत अडकून पडायचे नाही. असे स्वतः भगवान कृष्णाने गितेत सांगितल्याचे आपणा सर्वाना माहितच आहे. आपल्या जीवनाचे साध्य, ध्येय, उद्दिष्ठ म्हणजे आनंद. तों मिळाला की जीवन आपोआप सुंदर होते. पसायदान ही विश्वातील लोकांच्या कल्याणासाठी केलेली ज्ञानेश्वर माऊलीची प्रार्थना आवश्य अभ्यासावी. तो खरंच विश्वमंत्र आहे. तसे आपले जीवन होणे म्हणजे ते सुंदर होणे. आतून बाहेरून सर्वांगाने सर्वार्थाने ते तसे होणे अपेक्षित आहे आणि त्याला सुंदर जीवन म्हणावे.*

*कर्म हे महत्वाचे साधन परमेश्वराने आपणास दिले आहे त्याचा सदुपयोग करून आपण आपल्या जीवनाचा शिल्पकार बनू शकतो. आपणच आपल्या कर्माद्वारे आपले जीवन, भविष्य घडवत, बनवत असतो. आपण घडायचे की बिघडायचे हे आपण आपल्या कर्माद्वारे ठरवत असतो.*

*कर्तव्य म्हणून आपण संसार करावा. तो आनंदाने समजून उमजून करावा. त्यात असक्ती नसावी, विरक्ती असावी. पण विरक्ती असल्याचे जाणऊ देऊ नये. हे कसब अंगी बाणावे. हाच खरा परमार्थ. जो दुसऱ्यांसाठी जगला तोच खरा जगला.*

*मानवाला धर्म नावाचा जो काही विशेष अधिकार परमेश्वराने बहाल केला आहे, त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. तरच आपण माणूस. अन्यथा पशु आणि आपल्यात काहीच फरक राहणार नाही. आपण माणूस म्हणून राहण्यास लायक नसल्याने व पशु म्हणूनच लायक असल्याने परत आपणास पशुचा जन्म बहाल होऊ शकतो. म्हणून मानव जन्माचा सदुपयोग करून घेऊ यात. आयुष्याचा प्रवास सुखकर ठेवू यात. भलेही तो छोटा असू दे. काही हरकत नाही, पण तो आदर्शभूत असावा. आनंदी असावा.*

*आपले आयुष्य किती आहे हे आपल्याला काय किंवा प्राणिमात्रांना काय, कधीच ठाऊक नसते. योगा, ध्यान, प्राणायाम, सत्कर्म आणि सकारात्मक विचार यांनी आपले आयुष्य सुंदर, आदर्श, यथार्थ होण्यास मदत होते. म्हणून आपण या गोष्टींचा अंगीकर करून घेऊ यात.*

*आपले चांगले नैतिक कर्म, स्वार्थत्याग करणे आणि आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही असे आचरण ठेवणं, इत्यादी गोष्टींनी आयुष्य चांगल व्यतीत होऊ शकते. अश्याने आपल्या चांगल्या कर्माची फलश्रुती आपले जीवन सुंदर होण्यात होईल यात शंका नाही.*

 

*—– पांडुरंग वसंत कुलकर्णी नाशिक*

प्रतिक्रिया व्यक्त करा