*मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कोप निसर्गाचा…*
होई काहिली काहिली
नाही झाडाची सावली
कुठे दिसेनातं झाडं
सारी जंगलं तोडली
हाव भारीच मानवा
हवे मोठाले बंगले
झाली उजाड धरणी
सारे चैतन्य सरले
फक्त पाहिजे पाहिजे
किती जात हावरट
वृक्षवेली जंगलाची
त्याने केली काटछाट
झाडाविन ती पाखरे
झाली सारीच अनाथ
रानातील वन्य जिवा
नाही कुणाचीही साथ
रुसे पाऊस आताशा
तापलीया काळी माय
होती मऊ काळीशार
जशी दुधावरी साय
सूर्य कोपला कोपला
गोळा आगीचा तो झाला
धरित्रीच्या पोटामधी
ज्वालामुखी उसळला
जात जरी मानवाची
आहे बुद्धिमान सारी
परि निसर्गाचा कोप
त्यांना पडणार भारी
@अरुणा गर्जे
नांदेड