*ओंजळीतील शब्दफुले समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पुष्पा कोल्हे लिखित अप्रतिम लेख*
*एके दिनी एके मेळी..*
*अशा जागवू स्मृतींच्या ओळी*
काल दि.१६/०३/२०२५ रोजी स्वर्गीय श्री. दामोदर लटकन पाटील यांच्या वर्षश्राद्धानिमित्त त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र आ. यशवंत दामोदर पाटीलदादा ह. मु. नाशिक येथे जाण्याचा योग आला. खरंतर यशवंत दादा व लतावहिनी हे आधीपासूनच आग्रहाचे आमंत्रण करीत होते; त्यात त्यांचा सुपुत्र डॉ. वैभव व स्नुषा सौ. उत्कर्षा यांना नाही म्हणणे आम्हाला शक्य झाले नाही आणि या स्मरणमेळ्यात आम्ही उभयता सामील झालोच!
माझ्या माहेरची, आमोद्याची ही सारी माणसं…त्यात स्व. दामोदरजींची थोरली कन्या लीलाबाई ऊर्फ प्रतिभा ही माझी सख्खी मामी. त्यात मामा-मामींचं वास्तव्य काही काळ आमोद्यातच झाले असल्याने नातं अगदी घट्ट अतूट असेच बनलेलं. *बाबांची करारी नजर, भारदस्त आवाज व शिस्तप्रिय स्वभाव आणि त्यांची मला वाटणारी आदरयुक्त भीती* यामुळे त्यांच्याशी माझा फारसा संवाद झालेला आठवणीत नाही. पण दोन वर्षांपूर्वी मामींना इकडे आणण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी गेलो तर शरीर जीर्ण झालेल्या अवस्थेत बिछान्यावर बसून असलेले बाबा दिसले. स्मरणशक्ती अजूनही तल्लख होती. आम्ही उभयता त्यांना नमस्कार केला. ते आम्हाला आशीर्वाद देऊन बसा म्हणाले. कोपऱ्यात काही पपई होते तिकडे निर्देश करून म्हणाले, ‘ *गह्यरे गोऽड आय पुष्पाबाई ..खा आन् तिकळे मुबंई ले बी घीजाय तुह्या घरी!* खरंतर घरून जेवून आलो होतो.पोटात जागा नव्हती तरीही मामींनी कापलेल्या पपईच्या दोनदोन फोडी आम्ही खाल्या. व जरा कडक वाटणाऱ्या दोन पपई पिशवीत ठेवल्या व मामींना सोबत घेऊन जडावल्या मनाने आम्ही तिथून बाहेर पडलो.
मी लग्न झाल्यानंतरही कधी त्यांच्याकडे गेले तर यशोदामाई म्हणायची, “माह्या लेकची भाशी(भाची) नंतर ..आपलं पहिलं नातं महत्त्वाचं ..माह्यी लेकच आहेस तू! ” असं म्हणून चहा-पाणी करीत असे. त्यावेळी गंगाआजी ( दामोदरबाबांची आई) होती . ती म्हणायची, “..यसोदा, माह्या नातची वटी भरजो गं ..लेक बायला असंच जाऊ देववा ना…!”
काय हे संस्कार…! *अगदी लहान वयात , (मोठ्या पालक मंडळींनी, मुलीचे मत विचारात न घेता) लग्न होऊन, पडल्या घरात एकरूप होणाऱ्या, आयुष्यभर समर्पित भावनेने, कुटुंबातील साऱ्यांना काय हवं-नको बघत, दिवस-रात्र कष्ट उचलत, खटल्याच्या घरात हसऱ्या चेहऱ्यात, समाधानाने वावरणाऱ्या* या पिढीतल्या या साऱ्या आज्ज्या, आया-बाया, महिलांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. गरजा सीमित ठेवून, नैसर्गिक रीतीने, आल्या परिस्थितीत आनंदाने जगावं कसं हे त्यांच्याकडून नव्या पिढीने शिकण्यासारखं आहे. *लौकिकदृष्ट्या अशिक्षित पण जगाच्या पाठशाळेत संस्कारांचं, अनुभवाच्या शहाणपणाचं विद्यापीठ असलेल्या या पिढीबद्दल बोलू तेवढे कमीच!*
मुंबईहून नाशिकला जाण्यासाठी बरेच पर्याय आहेत. कोणताही पर्याय पत्करला तरी चार ते पाच तास लागतातच. आम्ही रिक्षा-लोकल- बस- रिक्षा करून सकाळी दहा वा. यशवंतदादाकडे पोहोचलो.
नुकतीच पूजा आटोपली होती. लगेच आवारात टाकलेल्या पंडालमध्ये बाबांचे स्मरण आणि श्री संत तुकाराम महाराज बीज यांचे औचित्य साधून, घोडगावहून खास आलेल्या हिरालाल मोतिराळे गुरुजी यांचे प्रवचन सुरू झाले.
मंडपात, खुर्चीवर बाबांची तसबीर ..तसबिरीत बाबांच्या डावीकडे हसतमुख, शांत, मृदुल अशी यशोदामाई.. अनेक आठवणींनी मला आतून भरते येत होते. प्रवचनात संतश्रेष्ठांच्या विविध प्रमाणांचा, वचनांचा आधार घेत महाराज कथन करीत होते. वातावरण शांत व सुखद होते, त्यामुळे आयत्या वेळी ध्वनि वर्धक व ध्वनिक्षेपण यंत्रणेने असहकार पुकारला तरी सर्वजण मनापासून ऐकत होते..
*साधू- संत येती घरा तोचि दिवाळी दसरा!*
*जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले
देव तेथेची जाणावा..!*
…*शेवटचा दिवस गोऽड व्हावा!*
अशाप्रकारे
*आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने यत्ने करू…!* तुकाराम महाराजांची अभंगगाथा गुरुजींच्या मुखातून स्रवत होती… मधूनच *घोडगावच्या व वारीच्या जुन्या आठवणी, किस्से यांची पुनरावृत्ती* होत होती…दोन तास कसे संपले कळले नाही. पितरांच्या जेवणाची वेळ झाल्यामुळे *बाबांच्या आठवणी काहींना व्यक्त करायच्या होत्या त्या मात्र राहूनच गेल्या…!*
प्रवचनादरम्यान घराच्या आवारात पितरांच्या जेवणाची तयारीही चालू झाली.
अनेक पदार्थांनी ताट भरले ..वाढणाऱ्या व्यक्तींना प्रश्न पडला कुठे- कसे वाढावे? वरण-बट्टी, साधी पोळी, वांगी, गंगाफळ, कारली, गवार, भेंडी या भाज्या, अळुवडी, मिरचीभजी, उडिदडाळीचे वडे, कुरडई-पापड, बुंदी, सांजोऱ्या, बासुंदी, ताकाची कढी, आमसुलांची कढी, भात, कोशिंबीर…सगळं अगदी साग्रसंगीत. पंचरसयुक्त! घरातल्या प्रमाणेच प्रेमाचे कार्यकर्ते.. बनवणारे-वाढणारे मनापासून राबणारे ..सगळ्या पंगती पध्दतशीर आटोपल्या. दरम्यान सगळे एकमेकांशी खूप दिवसांनी भेटल्यानंतर विचार-पूस करत होते; संवाद साधत होते. थोड्या वेळात जास्तीत जास्त नातेवाईक, मित्रमंडळींना भेटण्याचा जो- तो प्रयत्न करीत होता. आजूबाजूचे शेजारी वगैरे धरून जवळजवळ १५०-२०० जणं असावीत. सर्वांचा मान-पान दादा-वहिंनीनी केला. मोठी पिशवी, त्यात साडी व स्टीलचा डबा अशी भेट मलाही मिळाली.
या प्रसंगामुळे बऱ्याच दिवसांनी मला माझी वर्ग मैत्रीण प्रगती भेटली. विशेष म्हणजे माझा पंढरीदादा (माझ्या दादाचाही मित्र) ४२ वर्षांनी भेटला. माई, डिंपल माझ्या मामेबहिणी, माझ्या गुरूपत्नी फिरकेबाई, रामादादा, कमलदादा, बुधोदादा, रेखा- योगितावहिनी, सुजू-शोभा.. अशी अनेक मंडळी अनेक वर्षांनी भेटली. सौ. सीमावहिनींची नव्याने ओळख झाली. भारतीची आठवण झाली.(प्रत्येकावर लिहायचं म्हटलं तर एकेक स्वतंत्र लेख होईल) .*.पाणावलेल्या नेत्रांनी व भारावलेल्या हृदयांनी गळाभेटी झाल्या.* आणि खरं सांगू? आमच्या माईला तर उचलून कडेवरच घ्यावे व मिरवावे अशी मनातून तीव्र इच्छा झाली. ती लवकरच सासूबाई होणार आहे ..हे अजूनही मनाला पटत नाही ..अगदी विशीत दिसायची तशीच ती आताही दिसते. (ती अगदी मामांसारखी दिसते.) हे तब्येतीचं,सुंदर दिसण्याचं दैवजात वरदान कायम राहो हीच मनीषा. डिंपलही अगदी तशीच. पण ताऊ, दादा व माई यांना जास्त खेळवलं, मिरवलं आहे … अशा अनेक वर्षांनी होणाऱ्या भेटींचा आनंद काही औरच असतो!
एकीकडे जवळपास शतकाचा अनुभव घेऊन परमेश्वराच्या इच्छेनुसार दिवंगत झालेल्या व्यक्तीचे स्मरण पण दुसरीकडे सगळ्यांनी एकत्र यावे ही यशवंत दादा व लतावहिनींची जबरदस्त इच्छा असल्याने सर्व जण असे एकत्र आले आणि हा एक आनंदमेळावाच झाला. पूर्वी कुटुंब-कबिल्याचा *’विश्वदेव’* व्हायचा त्याची आठवण झाली. (माझ्या आईकडे होळी नंतरच्या बुधवार ते रविवार अजूनही होतो. त्याचीही आठवण झाली.)
याप्रसंगी या आनंदमेळ्यात सहभागी होण्याचे भाग्य आम्हा उभयतांना मिळाले.
असं म्हणतात की, *दैवगती ठरलेली असते*. जन्म-मृत्यूचं चक्र सतत फिरणं राहणारंच आहे… *सुख थोडे दु:ख भारी* अशी स्थिती असते.
*दैवजात दु:खे भरता, दोष ना कुणाचा*
*पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा !*
माणूस पराधीन आहे . नियतीच्या हातातील बाहुलं आहे तरीही,
*आला क्षण हसरा करण्याची किमया ज्याला जमेल तोच खऱ्या अर्थाने जगला* असं म्हणावसं वाटतं!
पैसा संपत्ती, भौतिक सुखे म्हणजे खरे सुख नव्हे ! आपल्या माणसांचं प्रेम एक वेगळंच आत्मिक समाधान देतं …नाहीतर,
*तिजोऱ्या भरल्या पैशाने तरी*
*सुखास्तव फिरतो मी बाजारी!*
अशी अवस्था आढळते.
अशा एकत्र येण्याने, सांस्कृतिक, सामाजिक चलनवलन होते. नात्यांची वीण पक्की होते. आपुलकी, प्रेम वाढते, ऐक्य वाढते. ज्ञानसंवर्धन होते. अनुभवांचं शहाणपण येते ..चार भिंतीत, मऊ बिछान्यावर, वातानुकुलीत खोलीत *’मी’* भोवतीच ज्यांचं जग विस्तारलेलं आहे त्यांना कदाचित हे पटणार नाही. पण माझ्यामते, आपल्या पूर्वजांनी जाणतेपणानेच, असे सण, समारंभ, रुढी-परंपरा, कार्य-प्रसंग इ. जोपासले असावेत. आज जग विस्तारलं आहे..कृत्रिम, डिजिटल साधनांनी ते जवळ आलं आहे पण मनांचं अवकाश विस्तारलंय..की जास्तच संकुचित झालंय..?…जग जवळ आलंय पण नाती लांब चाललीत…घराशेजारी घर ..पण दोन डोळे शेजारी नि भेट नाही संसारी! अशी स्थिती..!
परवाचं एक उदाहरण सांगितल्यावाचून राहवत नाही. आमच्या सोसायटीचे आवार मोठे असून त्यात होळी..रंगपंचमी ला सर्व लहान मुले एकत्र मिळून एकमेकांवर पाणी-फुगे मारणे, रंग लावणे, पिचकारीने रंग उडविणे अशी मौज मजा चालू होती.. आवारातील झाडांना पाणी घालण्यासाठी मी बहुधा रोज खाली जाते…परवाही गेले तर मुलांची ही मस्ती चालू होती..सगळीकडे प्लॅस्टिक च्या बारीक बारीक पिशव्यांचा आवारात खच पडलेला..शेजारच्या सोसायटीतील मुलेही आमच्या सोसायटीत येतात..मुलांना मी म्हटले , तुम्ही जरूर खेळा पण पाण्याचा अपव्यय होतोय ..ह्या प्लॅस्टिक मुळे पर्यावरणाची हानी होतेय..प्रदूषण वाढतेय त्याचे काय..? पुढे म्हटलं, ‘ अशावेळी ही राधाबाई माझी नातपण आहे म्हणूनच मी समजावते आहे..” त्यावर शेजारच्या सोसायटीतला मुलगा पटकन म्हणाला, “नात?
नात म्हणजे..?” मी कपाळावर हात मारला!
इंग्रजी शाळेत सहावीत शिकणाऱ्या मराठी मुलाने हा प्रश्न विचारला होता..!
हल्ली मुलांना नाती माहीत नाहीत, कळत नाहीत …टिकवता येत नाहीत ….माझा सख्खा पुतण्या मला ‘मोठीआई’ न म्हणता अगदी अलीकडेपर्यंत ‘लोकेशची आई’ अशी हाक मारायचा..अर्थात आता तो मला ‘मोठीआई’ म्हणतो…
या पार्श्वभूमीवर सर्वांना एकत्र आणणारी, मनात कोणताही किंतू न ठेवता सलोख्याने वागणारी ही मंडळी मला *वंदनीय* आहेत.
आम्हाला मुक्काम करण्याचा खूप आग्रह झाला पण काही कारणाने आम्हाला राहता आले नाही त्यामुळे रात्रीचे कीर्तन, भजन व दुसऱ्या दिवशी देवदर्शनाची सहल इ. गोष्टींच्या आनंद आम्हाला घेता आला नाही. यापूर्वी एकदा मुक्काम व दादांबरोबर देवदर्शन झाले आहेच ..पुन्हा कधीतरी आणखी होईलच…असो.
परवा यशवंतदादा- लतावहिनींच्या लग्नाला ४७ वर्षे पूर्ण होत आहेत. काळ्याभोर सरळ रेशमी केसांच्या दुमडलेल्या लांबसडक दोन वेण्या, गोरा नितळ रंग, हसरी जिवणी, गोल, गोबऱ्या गालांचा चेहरा, मृदुल आवाज असलेली ही त्यावेळची आठवणीतील वहिनी. आणि अजूनही आहेतच. शेती-मातीशी फारसा संबंध न आलेल्या अशा ह्या (आणि आमच्या अंजूवहिनीही) म्हणजे आख्ख्या गावाचं एक आकर्षणबिंदू होत्या; कौतुकास्पदच वहिनी होत्या आणि अजूनही आहेतच.
यशवंत दादा वहिनींची उभयतांची वृत्ती समाधानी आहे. आहे त्यात सुख मानण्याची आहे. सकारात्मक दृष्टीने आध्यात्मिक वाचनाची, लोकसंग्रहाची आवड आहे. यापुढेही ती राहीलच..पण आता यापुढे तब्येतीचीही काळजी घ्यावी आणि जीवनातले उरलेले छंद, सत्कार्य यांची पूर्ती व्हावी. त्यांस्तव उभयतांना ऊर्जा व दीर्घायुष्य मिळावे ह्याच सदिच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थनाही!
*जय श्रीराम!*
पुष्पा कोल्हे
चेंबूर, मुंबई
४०००७१