*”मधुभाईंच्या साहित्याशीच नव्हे तर मधुभाईंशी भावनिक दृष्ट्या जोडलेली माणसे”…: ॲड.नकुल पार्सेकर*
पद्मश्री मधुभाई आणि त्यांच्या साहित्यावर अपार प्रेम करणारी असंख्य माणसे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या देशात आणि परदेशातही आहेत… पण कोकणच्या मातीचा सुंगध सर्वदूर पसरवणाऱ्या आदरणीय मधुभाईनी भावनिक दृष्टीनेही अनेक माणसे जोडलीत. ज्याना मानवी संवेदना असतात त्यांना सहजपणे लिहिता येते.
आज सावंतवाडी शहरात संपन्न झालेल्या कोकण मराठी साहित्य समेंलनात अशीच एक घटना घडली. ग्रंथदिंडी सुरू होती त्यात समोरच मी होतो. रणरणते ऊन, समोर साधारण पंचाहत्तर वर्षाच्या एक वृध्द महिला भगिनी हातात काठी घेऊन हळूहळू चालत येत होत्या. दुरून चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. थोडा जवळ गेल्यावर लक्षात आले की त्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून देवगड येथील जेष्ठ लेखिका व कवयित्री मंदाकिनी गोडसे आहेत. स्व.भागवत बाईंमुळे मी त्यांच्या संपर्कात आलो. मी ओळखल्या ओळखल्या धावत त्यांच्यापाशी गेलो त्यांना वाकून नमस्कार केला. खूप वर्षानी त्यांची भेट झाली. लागलीच मी दिंडी त्यांना घ्यायला लावली. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव मला वैयक्तिक रित्या आत्मिक समाधान देणारे होते. दुसऱ्या सत्रात जेव्हा त्याना समजले की ज्या मधुभाईंचे दर्शन घेण्यासाठी त्या एवढ्या रणरणत्या उन्हात या वयात आल्या होत्या ते मधुभाईं प्रकृती अस्वास्थ्यामुळे येणार नाहीत, तेव्हा त्या नाराज झाल्या. मी व्यासपीठावर होतो. हळूच माझ्याकडे आल्या व मला म्हणाल्या, खरं तर आदरणीय मधुभाईं येणार म्हणून मी आले होते… पण माझे एक काम करा, मी मधुभाईंना देण्यासाठी त्यांचेच एक छोटेसे पोर्ट्रेट आणलेले आहे ते भाईंकडे कृपया पोहचते करा. व्यासपीठावर त्यावेळी मधूभाईंचे खास विश्वासू सहकारी आणि कोमसापचे कार्याध्यक्ष डॉ. प्रा. प्रदीप ढवळ होते. मी त्यांना विनंती केली की हे पोर्ट्रेट भाईना पोहचते करा. ढवळ सरांनी त्याना आश्वस्त केले तेव्हा त्यांची भावमुद्रा पहाण्यासारखी होती. वयाच्या पंचाहत्तरी नंतर रणरणत्या उन्हात सरस्वती पुत्राच्या भेटीसाठी देवगडहून येणाऱ्या मंदाताईना सलाम… अर्थात ही किमया आहे मधुभाईंची आणि त्यांच्या माणसांची सतत गुंफण करणाऱ्या अफाट कार्यशैलीची.