You are currently viewing क्रिकेट सामान्यांच्या आड जुगार

क्रिकेट सामान्यांच्या आड जुगार

पोलिसांचे कृपाछत्र?

सावंतवाडी तालुक्यातील गोवा सीमेवरील गाव वजा नगरीत क्रिकेट सामन्यांचे आयोजन गेले तीन दिवस केले गेले आहे. १५ / २० वयोगटातील अनेक क्रिकेटपटू मुले मोठ्या उत्साहाने या स्पर्धांमध्ये भाग घेतात. साखळी पद्धतीने चालणाऱ्या खेळामुळे दिवसभर मुले मैदानावरच ठाण मांडून असतात. तरुण वयातील ही मुले एक सामना संपला की पुन्हा विजयी संघ दुसऱ्या विजयी संघासोबत सामने खेळतो, त्यामुळे मैदानावर आपला पुढचा सामना कधी होणार या प्रतीक्षेत असतात. मध्यंतरीच्या काळात मोकळ्या वेळेत सामन्यांचा आनंद घेणाऱ्या या मुलांना मैदानी खेळाकडून जुगारासारख्या खेळाकडे वळविले जात आहे याचा प्रत्यय सावंतवाडी तालुक्यातील गोवा राज्याच्या सीमेवरील एका मोठ्या बाजारपेठ असलेल्या नगरीत येत आहे.
क्रिकेट सामने सुरू असल्याने मैदानाकडे पोलीस येऊ नये आणि सुरू असलेल्या जुगाराच्या फडाचा कोणाला संशय येऊ नये यासाठी पोलिसांचा आशीर्वाद घेऊनच हे जुगाराचे फड बसत आहेत. क्रिकेट सामन्यांच्या आडून काही जुगारी लोक सामने भरतात तिथेच जुगाराच्या बैठका बसवतात. त्यामुळे १५/१७ वयोगटांच्या मुलांना जुगाराचे प्रशिक्षणच मिळत आहे, किंबहुना मुले जुगाराकडे वळावीत याच उद्देशाने तिथे जुगार खेळवले जातात. त्यामुळे कोवळ्या वयातील मैदानी खेळ खेळणारी ही मुले जुगाराकडे आकर्षित होतात, त्यातून त्यांना जवळच असलेल्या गोवा सीमेवर मिळणाऱ्या स्वस्त दारूची देखील सवय लावली जाते. त्यामुळे आपल्या आयुष्याचा महत्वाच्या टप्प्यावर ही मुले व्यसनांच्या, जुगाराच्या आहारी जातात.
पोलीस चौकीपासून जवळच चालणाऱ्या या सामन्यांमध्ये क्रिकेट पाहण्याच्या हेतूने येणारी अनेक मुले आज क्रिकेट पेक्षा जास्त जुगाराकडे वळताना दिसतात, त्यामुळे भावी पिढी व्यसनाधीन होण्याची भीती निर्माण झाली आहे. आपली मुले क्रिकेट खेळायला गेली या भ्रमात असणाऱ्या पालकांना मुले कुठे खेळतात, कशाकडे आकर्षित होतात याची सुतराम कल्पना नसते, त्यामुळे पालक निर्धास्त असतात आणि मुले मात्र व्यसनांच्या आहारी जातात.
पालकांनी देखील आपली मुले कुठे खेळायला जातात, काय करतात याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
क्रिकेटच्या आडून सुरू असणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांची मेहेरनजर होत असल्याने पोलिसांच्या आशीर्वादावरच ते हे जुगाराचे आयोजन होत नाही ना? अशी शंका गाववाल्यांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे क्रिकेट सामने भरतात त्या ठिकाणी नेमके काय काय उद्योग चालतात याकडे सुद्धा जिल्हा पोलिस प्रमुखांनी आपल्या सहकार्यांना गांभिर्याने लक्ष देण्यास लावणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा क्रिकेट खेळतात याच भ्रमात असणाऱ्या पालकांना मुले बिघडली तरी त्याची कल्पना येणार नाही, आणि भावी पिढी व्यसनाधीन होऊन गैरधंदे मोकाट सुरू राहतील यात शंकाच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा