सावंतवाडी तालुक्यातील सांगेली खळणेवाडीतील सावंत भोसले घराण्याचे भाचे तथा गोव्यातील प्रसिद्ध शिव व्याख्याते आणि सामाजिक कार्यकर्ते अँड शिवाजी यशवंतराव देसाई यांना भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज संग्रालय सातारा महाराष्ट्राचे अधिरक्षक प्रवीण शिंदे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील सातारा राजवाडा येथील या पुरस्कार वितरण सोहळ्याला महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या सौ. प्रतिभा शेलार उपस्थित होत्या.
अँड शिवाजी देसाई यांनी भारतीय संविधान याविषयी जनजागृती करत असताना अनेक व्याख्याने दिली आहेत. तसेच शालेय विद्यार्थ्यांना “का ” या शब्दाचा उपयोग करून त्यांनी भारतीय संविधान हा विषय अनेक शाळा आणि महाविद्यालयात सांगितला आहे. हा त्यांचा कार्यक्रम खूपच लोकप्रिय ठरला. तसेच कायदा जनजागृती त्यांनी मोठे योगदान देत असताना वकिलांना सोबत घेऊन संघर्ष आणि फक्त लढ म्हण ही दोन पथनाट्य लिहून दिग्दर्शित केली. आणि त्याचे सादरीकरण वाळपईत करण्यात आले. अँड शिवाजी देसाई यांना आतापर्यंत त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. गोव्यात आणि गोव्याबाहेर त्यांची सातत्याने विविध विषयावर व्याख्याने होत असतात. वरील कार्यक्रमात त्यांचे भारतीय संविधान या विषयावर साताऱ्यामध्ये व्याख्यान झाले.
या व्याख्यान कार्यक्रमात त्यांनी बोलताना सांगितले की भारतीय संविधानासारखे दुसरे उत्कृष्ट संविधान जगात कुठे नाही. भारतीय संविधान हे भारतीय नागरिकाला आत्मसन्मानाने आणि सामर्थ्याने जगण्याची शिकवण देते. भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की या देशांमध्ये प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. धार्मिक स्वातंत्र्य हे भारतीय राज्यघटनेपेक्षा मोठे असू शकत नाही. संविधानाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले.