*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि ग सातपुते लिखित काव्याचे सौ.गौरी काळे यांनी केलेले रसग्रहण*
*अशी कवीता येते*
〰️〰️〰️〰️〰️
कृष्णासम ही नटखट अवखळ..
लाघवी कवीता हळूच पाऊली येते..
मयुरपिसी मखमली मृदुल करांनी..
अवघे अलगदी चित्त चोरुनी नेते ..।। १ ।।
कदंब तरुच्या साऊलीत या
साक्षात बीज प्रतिभेचे फूलते…
शब्दफुलांच्या , वटवृक्षावर
भावगंधले गीत कोकिळा गाते…।। २ ।।
कालिंदीच्या ! डोहातूनी त्या
लय , ताल सप्तसुरांची येते…
राधे ! बघ सामोरी कृष्णमुरारी
धुन मंजुळ मंजुळ बासुरीची येते…।। ३ ।।
शब्दशब्द मनी भाव उमलता
वास्तव ! हॄदयातूनी ओघळते
रसिक मनांच्या गाभाऱ्यातुनी
सोज्वळतेचे रूप ! गंधाळूनी जाते…।।४ ।।
🎍🎍🎍🎍🎍🎍🎍🎍
*©वि.ग.सातपुते.(भावकवी)*
दिनांक :- 21 – 3 – 2025 .
*9766544908*
*अशी कवीता येते*
〰️〰️〰️〰️〰️〰️
‘ *अशी कवीता येते’*
*ही भावकवी वि.ग. सातपुते अप्पांची एक भावस्पर्शी कविता.*
कविता वाचताना प्रथम डोळ्यांसमोर अवतरतो नटखट अवखळ चित्तचोर श्रीकृष्ण व अवघे गोकुळ.कवितेला श्रीकृष्णाची उपमा दिली आहे .हा कवितारुपी कृष्ण हळूवार पणे येऊन आपले जग व्यापतो.
कवितेला कृष्णाची उपमा देताना विगसा तिला नटखट ,अवखळ म्हणतात.कविता लहान बालकासम कधी अडखळते,कधी अवखळ गोड हसते.अशी ही लाघवी कविता जेव्हा आपले “*मयुरपिसी मखमली मृदुल* ”
हात पुढे करुन झेपावते तेव्हा आपण पूर्णपणे तिच्यात आपले चित्त हरवून बसतो.
*कदंब तरुच्या सावलीत* म्हणजे एका निवांत आल्हाददायक क्षणी हे कवितेचे बीज मनात रुजते नि हळूहळू शब्दांची भावफुले उमलतात.भावनांच्या हिंदोळ्यावर मन झोके घेते,कल्पना फेर धरु लागतात नि कवितेची भावगर्भित गीते मन आनंदाने गाऊ लागते.या नाजुक कोवळ्या बीजाचा एक शांत सावली देणारा वटवृक्ष कधी होतो ते स्वतःलाच समजत नाही.अशी ही कविता अवखळ अलवार पावलांनी जीवनात प्रवेश करते आणी जीवनाला एक लय प्राप्त करुन देते.
*कालिंदीच्या डोहातूनी* यात एक गहन विचार आहे.आपले मन जणू कालिंदीचा डोह.यात असंख्य विचारांचे भोवरे आहेत.हा डोह जितका खोल तितकाच व्यापक.यात जितके खोल जाऊ तितके नवनवीन विचार नव्या कल्पना जन्म घेऊ लागतात.हा राधेचा कृष्णसखा आपल्या बासरीच्या मधुर स्वरांनी जसे आपले मन मोहवून टाकतो तसाच जीवनाच्या निर्णायक क्षणी कर्मयोगाचा उपदेश ही करतो.आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे कवितेतून मिळतात.कालिंदीचा डोह जणू अनेक प्रश्नांची कृष्णविवरे,जणू कालिया नाग.हा कवितारुपी कृष्ण शब्दांतून व्यक्त होत असताना आपल्याला एक उर्जा देतो.प्रश्नांचा निचरा होताना त्याच्या शब्द सुरांनी निस्सीम शांतता लाभते.
शब्दांतून भावना व्यक्त होताना आपली स्वतःची व जगाशी ओळख होते.जगण्याला एक नवी दिशा मिळते.जशी कविता आपल्या मनाचा ठाव घेऊन अपार आनंद देते तशीच काव्य रसिकांना ही ती आपलीशी वाटते.तिच्याशी नाळ जुळताना त्यांना ही कवितेत संभावना दिसतात, उत्तरे सापडत जातात.
कविता जितकी कल्पना तितकीच वास्तव.कविता मनातून उमलणारी मनांचा ठाव घेणारी,मनात घर करुन राहणारी.कविता जणू मनाचा आरसा.कविता जगण्याचे भान देते.
*विगसा अप्पांची* ही कविता तशी गूढ अर्थाने वेगळी आहे.वरवर जरी ही कवितेचा प्रवास सांगते तरी एका जीवनाचा प्रवास ही समांतर सुरु आहे.जगात मनुष्य लहान मुलाच्या स्वरुपात नाजूक पावलांनी येतो.या अवखळ बाळाला पाहताना ते मनमोहक हसते ,दोन्ही हात पसरुन आपल्याकडे झेपावते व मन त्याच्याजवळ घुटमळत राहते.
तारुण्यात पदार्पण करताना मनात भाव उमलत जातात.इंद्रधनुषी रंग आयुष्यात भरत जाताना वास्तवाचे भान येऊ लागते.अनुभवांनी समृद्ध होताना आता मानवाचे शांत परिपक्व वटवृक्षात रुपांतर झालेले असते.
आता पुढच्या प्रवासात ओढ लागते ‘स्व’च्या शोध घेण्याची.*कालिंदीचा डोह* इथे अनेक अर्थ मांडतो.
आध्यात्मिक प्रवास कुंडलिनी किंवा न दिसणारा अज्ञात पैलतीर हा सूचित करतो.या डोहात खोलवर उतरत जाताना सर्व प्रश्न सुटत जातात व समोर अवतरतो कृष्ण अवघे विश्व व्यापून ही ह्या कुडीत वास करणारा.
आता वास्तव समोर आल्यावर समर्पण भावाने त्या हृदयस्थ श्रीकृष्णाला शरण जायचे.मनुष्य समर्पक भावाने शरण जातो. देह कृष्णार्पण होताना मनांच्या गाभाऱ्यात तो आठवणींच्या रुपात,शब्दांच्या रुपात वास करतो.
*©️सौ. गौरी चिंतामणी काळे*
*खुपच सुंदर..रसग्रहण*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
प्रत्येक कवीचीच रचना ही सुंदर असते.
त्यातील गर्भितार्थ हा इतरांनी , वाचकांनी अवश्य शोधावा… मी नेहमी लिहीत असतो..मग गद्य असो की पद्य पण त्यात स्वतःला खरच आनंद झाला आहे याचाच मी *आत्मशोध* घेत असतो.. ” *मी नेहमीच म्हणतो कविता ही जगावी .! त्या भावभावभावनांमध्ये तद्रूप होवून विरघळून जावं..* म्हणजे मग अशी सुंदर रसास्वाद घेणारा प्रतिसाद मिळतो आणि मी लिहिरा होत जातो.
माझे बालमित्र श्रीकांत दिवशिकर , विनय पारखी , सौ.ऐश्वर्या डगावकर अशा अनेक प्रभृती मला लिहिण्यास प्रवृत्त करतात.
लौकरच माझ्या निवडक रचना आणि त्या सोबत आपल्या सारख्यांचे *रसग्रहण* असे एकत्रित पुस्तक प्रकाशित होईल.
मी आपला आभारी आहे.
विगसा ( आप्पा )
🙏