You are currently viewing केंद्रीय मंत्री नामदार श्री नितीन गडकरी जसे दिसले तसे

केंद्रीय मंत्री नामदार श्री नितीन गडकरी जसे दिसले तसे

अमरावती येथे दिनांक 22 मार्च 2025 रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे माननीय श्री नितीन गडकरी यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्यानिमित्त…

 

केंद्रीय मंत्री नामदार श्री नितीन गडकरी जसे दिसले तसे

 

नागपूरच्या वर्धा रोडवरील केंद्रीय मंत्री ना. श्री नितीनजी गडकरी यांच्या निवासस्थानी असलेल्या सभागृहात आम्ही प्रतिक्षेत बसलो होतो. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावे हे निवेदन घेऊन नितीनजींना भेटायचे ठरवले होते. त्यासाठी माझे जिवलग मित्र व सुप्रीम कोर्टाचे सीनियर ऍडव्होकेट श्री कमलाकांत चौधरी हे दिल्लीवरून मुद्दाम आले होते. आम्ही अमरावती वरून निघताना माननीय श्री नितीन गडकरी यांचे सहकारी सहाय्यक श्री मनोज वाडेकर यांना फोन केला. ते म्हणाले मी पुण्याला आहे. गडकरी साहेबांबरोबर असलेल्या सहाय्यकाचे त्यांनी नाव आणि नंबर दिले. आम्ही नागपूरला फोन केला. ते म्हणाले या साहेब गावातच आहेत. लगेच आम्ही टॅक्सीने नागपूर गाठले. गेल्या गेल्या गडकरी साहेबांचे सहाय्यक श्री सुधीर दिवे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता श्री दिलीप देशमुख यांचे भेट झाली. गडकरी साहेबांच्या जनता दरबारात प्रचंड गर्दी होती. आमचा नंबर एक तासात लागेल असा आम्ही अंदाज बांधला होता. पण झाले वेगळेच.

अचानक गडकरी साहेबांचे लक्ष माझ्याकडे व एडवोकेट कमलाकांत चौधरी यांच्याकडे गेले. त्यांनी लगेच हातांनीच इशारा करून आम्हाला जवळ बोलावले. आम्हाला नवलच वाटले. कारण त्यांच्यापासून आम्ही बरेच दूर उभे होतो. ते टप्प्याटप्प्याने एका एका व्यक्तीला त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांच्या मदतीनिशाला सूचना देत होते. त्यांनी इशारा केल्यामुळे आम्ही जवळ गेलो. गडकरी साहेब म्हणाले तुम्ही सीनियर सिटीजन आहात. तुम्हाला लाईनमध्ये येण्याची गरज नाही. काय काम आहे ते सांगा बरं.

एडवोकेट कमलाकांत चौधरी यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळाले पाहिजे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आपली भेट घेण्यास आलो आहे असे सांगितले. आमच्या मागणीचे निवेदनही आम्ही त्यांना दिले. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे नाव नुकताच गडकरी साहेब म्हणाले ते माझ्याकडे लागले एवढ्या मोठ्या माणसाला भारतरत्न दिलाच पाहिजे. मी या कामे पुढाकार घेतला तर तो माझा सन्मान आहे असे मी समजतो. फक्त तुम्ही एकच काम करा अमरावतीला परत गेल्यानंतर श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये जाऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे असा एक ठराव करून माझ्याकडे पाठवा. बाकी मी पाहतो. अतिशय विश्वासाने त्यांनी आम्हाला आश्वासन दिले. मी त्यांना तुमच्याबरोबर फोटो काढायचा असे म्हटले .त्यांनी लगेच फोटोग्राफरला बोलावले .आमच्याबरोबर फोटो काढला आणि मला सांगितले तुमचा नंबर फोटोग्राफरला द्या. तो तुमच्या क्रमांकावर हा फोटो पाठवेल. उणे पुरे पाच मिनिटाची ही भेट.

मला खरंच नवलच वाटले. ज्या कामाला आम्हाला एक तास लागणार होता. ते पाच मिनिटात झाले .पण याला कारण श्री नितीन गडकरी यांची नजरच म्हणावी लागेल. त्यांनी आमच्याकडे पाहणे काय ? आम्ही उभे असणे काय आणि त्यांनी आम्हाला ताबडतोब जवळ बोलावले काय हे सगळच आगळे वेगळे होतं. आम्ही कारपर्यंत येईपर्यंत आमच्या मोबाईलवर श्री नितीन गडकरी यांच्याबरोबर काढलेला फोटो आला होता. त्यांचा स्टाफ किती तत्पर आहे त्याचे एक जिवंत उदाहरण ते होते.

श्री नितीन गडकरी यांची माझी पहिली भेट मी जेव्हा पीएचडी मिळवली तेव्हा झाली होती. मला डॉक्टरेट मिळाल्याबद्दल त्यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला होता. पण ती लहानशी भेट. गडकरी साहेब रोज कितीतरी लोकांचे सत्कार करतात. माझे नाव किंवा चेहरा लक्षात ठेवण्याचे काही कारण नव्हते. पण आम्ही सभागृहात जाणे त्यांचे लक्ष आमच्याकडे जाणे आमच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्यांनी टिपणे आणि आम्हाला लगेच बोलावून घेणे हा एक विलक्षण योगायोग मानावा लागेल.

श्री नितीन गडकरी यांचे एक वैशिष्ट्य माझ्या अजून लक्षात आहे. त्यांच्या कार्यालयामध्ये समोरच साहेब नागपूरला केव्हा आहेत आणि नागरिकांना भेटण्याची त्यांची वेळ काय राहणार आहे याची सूचना लागलेली असते. ती नागरिकांसाठी एक चांगली सोय आहे. कुणाला विचारावं वेळ लागत नाही. भेटीला येणाऱ्यांची सोय झालीच पण त्यांच्याकडे असणारे कर्मचारी त्यांची पण सोय झाली नाही तर येणाऱ्या जाणाऱ्या साहेब केव्हा येणार हे विचारपूस करीत असतो.

श्री नितीन गडकरी यांच्या महाल मधील घरी जाण्याचा योग येईल असे कधी वाटले नाही. पण तोही योग आला. माझे दैनिक तरुण भारत मध्ये क्रमशः लेखमाला सुरू होती. विषय अर्थातच स्पर्धा परीक्षा हा होता. तरुण भारतचे तत्कालीन सहसंपादक श्री सुधाकर कहू आणि मी महाल भागात होतो. श्री कहू मला म्हणाले नितीन गडकरी साहेबांचे घर जवळच आहे. चालायचे आहे का. मला ती सुवर्णसंधी वाटली. आणि श्री सुधाकर कहू सोबत असल्यामुळे चिंता पण नव्हते. आम्ही गडकरी साहेबांच्या वाड्यावर गेलो. श्री सुधाकर कहू सोबत असल्यामुळे आम्हाला सरळ आत मध्ये प्रवेश मिळाला. साहेब घरी नव्हते. पण सौ कांचन वहिनींनी आमचे मनापासून स्वागत केले. मी दुसऱ्या वर्गापासून आयएएसचे ट्रेनिंग देत आहे हे पाहून त्यांना खूपच आनंद झाला. त्या म्हणाल्या की आपल्या नागपूरला सुरू करा. बर्डीवर आपल्या भगिनी मंडळाचा मोठा परिसर आहे. त्यातील जागा मी तुम्हाला देते. मला नवलच वाटले. त्यांची माझी पहिलीच भेट होती. पण त्या पहिल्याच भेटीत त्यांनी मला जिंकून टाकले होते. नागपूर वरची बर्डी वरची जागा आज कोणी भाड्याने द्यायला तयार नाही आणि यांनी तर मला तिथे मिशन आयएएस सुरू करण्याची परवानगी देऊन टाकली होती.

गप्पागोष्टी झाल्या. अल्पोपहार झाला आणि चहा आला. जसा त्यांचा कर्मचारी चहा घेऊन आतल्या रूम मधून बाहेर आला. कांचनताई तडक उठल्या त्या कर्मचाऱ्याजवळ गेल्या आणि त्याच्या हातातला ट्रे त्यांनी स्वतः घेतला आणि माझ्या जवळ आल्या आणि स्वतःच्या हाताने मला चहा दिला. मी पाहतच राहिलो एका केंद्रीय मंत्र्याची पत्नी इतकी विनम्र असू शकते हे खरंतर धक्कादायक गोष्ट होती. मी ती व्यक्त केली. कांचनताई म्हणाल्या अहो तुम्ही अमरावतीवरून आलेल्या आहात. आम्ही मनापासून तुमचं स्वागत केलं पाहिजे. तुम्ही कदाचित परत येणार नाही.

तुमची माझी भेट होणार नाही. येणाऱ्या व्यक्तीच्या मनापासून स्वागत करण्याची आमची पद्धत आहे. त्यांची माझी पहिलीच भेट पण त्या भेटीत त्यांनी मला जिंकून टाकले होते. श्री नितीनजी गडकरी सतत दौऱ्यात असतात परंतु वहिनी तेवढ्या समर्थपणे घराची तसेच येणाऱ्या जाण्याची दखल समर्थपणे घेतात त्याचमुळे गडकरी साहेबांना नकळत ऊर्जा प्राप्त होते हे वेगळे सांगणे न लगे.

श्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांच्या बाबतीत जे क्रांती केलेली आहे ती भारताच्या नाही जगाच्या इतिहासात लिहून ठेवण्यासारखी आहे .परवा आम्ही अखिल भारतीय साहित्य संमेलनाला पंजाबमध्ये घुमानला गेलो होतो. तिथे गडकरी साहेब आले होते आणि त्यांनी घुमान ते नांदेड अशा रस्त्याची घोषणा केली आणि ती प्रत्यक्षात आण्यासाठी ताबडतोब सूचना पण केल्या.

कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट यांच्या नावाने सभागृह बांधण्यासाठी श्री नितीन गडकरींनी यांनी जो पुढाकार घेतला तर खूपच महत्त्वाचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात असे सभागृह नाही आहे. या सभागृहाचे जेव्हा महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झाले तेव्हा मला उपस्थित राहण्याचा योग आला. गडकरी साहेबांनी आपल्या भाषणात सांगितले की मी जाता येता या सुरेश भट सभागृहाच्या बांधकामावर लक्ष ठेवून होतो. अनेक वेळा मी इथे खुर्ची टाकून बसलो. कामाच्या आढावा घेतला. एवढे सुंदर सुरेश भट सभागृह त्यांनी नागपूरला तयार केले आहे आणि आम्हाला आशा आहे की अमरावती ही सुरेश भटांची कर्मभूमी आहे. जन्मभूमी आहे. या त्यांच्या जन्मभूमी मध्ये सुरेश भटांच्या नावाने सभागृह स्थापन करण्यासाठी श्री नितीन गडकरीच पुढाकार घेणार आहेत एवढा त्यांच्याबद्दल विश्वास आहे.

दिनांक 22 मार्च रोजी महाराष्ट्रात शिक्षण संस्थेच्या क्रमांक रयत शिक्षण संस्थेनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आज श्री नितीन गडकरींचा सत्कार भव्य होत आहे ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेने पहिला मान आपल्या महाराष्ट्राचे वैभव असलेल्या श्री शरद पवार साहेबांना दिला आणि दुसऱ्या क्रमांकावर त्यांनी श्री नितीन गडकरी यांची पुरस्कारासाठी निवड करून त्यांच्या कार्याचे योग्य ते मूल्यमापन केले आहे. श्री नितीन गडकरी यांना हा राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाल्याबद्दल ते अभिनंदन करण्यास पात्र आहेत.

 

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

अमरावती

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा