दैनंदिन कामकाज, प्रलंबित गुन्ह्यांचा तपास गतिमान करा – सौरभ कुमार अग्रवाल
आचरा पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी, ऑनलाईन ई लर्निंग प्रशिक्षण पूर्ण करा…
ओरोस
आचरा पोलीस ठाण्याचे दैनंदिन कामकाज, प्रलंबित गुन्ह्यांचा तपास गतिमान करा. गुन्ह्यांची विहित वेळेत निर्गती करा. गुन्ह्यांची प्रभावी दोषसिद्धी होण्यासाठी प्रगती करा. कायद्यामध्ये झालेल्या नवीन बदलांबाबत व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञानासाठी सर्व अधिकारी व अंमलदार यांनी ऑनलाईन ई लर्निंग व शासकीय ॲपव्दारे प्रशिक्षण पूर्ण करावे, अशा सुचना जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी आज आचरा पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी घेतली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्यात अनुसरुन पोलीस ठाण्याचे आधुनिकीकरण तसेच इमारत व संपूर्ण परिसर सुशोभिकरण कामकाजाचा आढावा घेवून आवश्यक त्या सुचना दिल्या. त्याचपमाणे पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दरबार (एकत्रित बैठक) घेवून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेवून त्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.
आचरा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गाव पोलीस पाटील यांची बैठक घेवून गावात त्रासदायक, सामाजिक धोकादायक असणारे व्यक्ती, रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्या हालचाली, गावातील सार्वजनिक समस्या, धार्मिक व सामाजिक विषयांशी संबंधित माहिती, सण, यात्रा, परंपरा, अन्य मनोरंजनात्मक कार्यक्रम इत्यादींची माहिती पोलीस ठाण्यात देणेबाबत तसेच गावात राहणारे परप्रांतिय व्यक्तींच्या कामगारांच्या परिपूर्ण नोंदी पोलीस ठाण्यामध्ये करण्याच्या सुचना दिल्या. सागरी सुरक्षा व पर्यटकांच्या सुरक्षिततेवर योग्य प्रकारे लक्ष केंद्रित करणे, पर्यटकांना पोलीसांची तात्काळ मदत होणे, सागरी किनारी धोक्याच्या ठिकाणी संबंधित विभागांशी, मच्छीमार संघटना, सागर रक्षक, ग्राम रक्षक यांचेशी योग्य समन्वय ठेवून सुरक्षात्मक उपाययोजना करण्याच्याही सुचना यावेळी अग्रवाल यांनी दिल्या.